मैत्री दिवस.. 

सुनेत्रा विजय जोशी 
रविवार, 5 ऑगस्ट 2018

शेवटी रडायला कुणाचा तरी खांदा लागतोच आणि आनंद पण एकट्याने नाही साजरा करता येत. जर जिवाभावाचे मित्र असतील तरच जगण्याला अर्थ आहे. 

मैत्रीसाठी काळवेळेचे बंधन नाही पण आजच्या धावपळीच्या जीवनात कुठेतरी एकत्र येण्यासाठी एखादा दिवस हवा म्हणुन मैत्री दिन हवा. आणि त्यात रविवार म्हणजे कुणाला सुट्टी नाही असेही नाही. मैत्री कुणाशी व्हावी याचे काही आराखडे नाही. कुठल्याही वयाच्या व्यक्तीशी कधीही होऊ शकते. एखाद्या छंदाशी गुरूंशी आणि हो निसर्गाशी सुद्धा. आजकाल तर व्हाटस् अपवर किंवा फेसबुकवर देखिल आपली न बघितलेल्या व्यक्तींशी सुद्धा छान मैत्रीचे नाते जुळते. 

घरात पक्की मैत्रिण  असते आई. मग बहीण आणि इतर मैत्रिणी. आपल्या घरी येणार्‍या कामवालीशी सुद्धा आपले भावबंध जुळतात. खुपदा आपण कुणाशी न बोलता येणार्‍या गोष्टी तिच्याशी शेअर करतो. पण आजकाल या निस्वार्थ नात्याला पण वास यायला लागलाय. कुणाशी आपल काम पडू शकत? किंवा कुणाचा आपल्याला शिडी म्हणुन वर चढायला उपयोग होईल? कुणाचे स्टेटस आपल्याशी जुळतात हे बघुन मैत्री केली जाते अन मग आपला स्वार्थ साधल्या जातो. कालांतराने मग गरज सरो नी... असे होते. 

मैत्रीचे कलम होतच नाही. कलमावरुन आठवले मैत्री तशीच हवी कुठल कलम कुणावर केलय हे बघुन कळायला नको अशी एकरूप झालेली मैत्री. खुप कमी लोकांना हे भाग्य लाभते.प्रत्यक्ष भगवंताशी देखिल मैत्रीचे नाते असु शकते. त्यात मागणे नसावे काही. तो समजुन हवे त्यापेक्षा जास्त देतो. 

शेवटी रडायला कुणाचा तरी खांदा लागतोच आणि आनंद पण एकट्याने नाही साजरा करता येत. जर जिवाभावाचे मित्र असतील तरच जगण्याला अर्थ आहे. 

कधी सल्ला नको असतो मदतही नको असते पण मनातले ऐकायला मात्र जवळचा मित्र लागतो. तो न बोलता ऐकुन घेतो त्याच्या नुसत्या हातावर ठेवलेल्या हाताचाही खुप आधार वाटतो. आपल्या भारतात मैत्रीचे सुरेख उदाहरण म्हणजे कृष्ण सुदामा.. कृष्ण द्रौपदी पण. द्रौपदीला तो सखी म्हणुनच संबोधत असे. 
स्त्री पुरुष मैत्री पण तितकीच पवित्र असु शकते. आपल्याकडे त्या मैत्रिकडे तेवढ्या चांगल्या नजरेने बघण्याचा दृष्टीकोन मात्र समाजाला आलेला नाही. आणि काही जण त्यातील सीमारेषा जाणुन घेत नाहीत. खुप धुसर अशी ती रेषा दिसायला हवी. आज मैत्री दिनानिमित्त हे सारे मनात उमटले ते तुमच्याशी शेअर केले. प्रत्येकाचा वेगळा दृष्टीकोन असु शकतो. पण प्रेम लाभे प्रेमळाला. तसेच आपण निस्वार्थ मैत्री केली तर आपल्याला ती मिळते असा माझा अनुभव. सर्व मित्रमैत्रिणींना आजच्या दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Esakal Citizen Journalism Sunetra Vijay Joshi article