थोडे थांबून जगा ना.. 

सुनेत्रा विजय जोशी
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

प्रतिक्षेनंतर मिळालेल्या गोष्टीचा आनंद जास्त असतो. घाईत जगु नका. गेलेले क्षण कितीही किंमत मोजली तरी परत नाही जगता येत. प्रत्येक टप्प्यावर क्षणभर थांबा एक आनंद तुमची वाट बघत असलेला सापडेल. 

आजकाल जमाना फास्ट झालाय. फास्ट फुड, फास्ट लोकल, फास्ट ग्रोथ, फास्ट श्रीमंती. अगदी फास्ट जगणे अन फास्ट मरणेही. वेळ असा कुणाकडे कशासाठी नाहीच. जो तो धावतोय. 
अगदी साधी गोष्ट बघा ना. झाड लावल की अमुक खत घाला फास्ट ग्रोथ. फळ आले की त्याला अमुक एक इंजेक्शन द्या रातोरात फळ मोठे. मध्यंतरी भोपळ्याच्या रसाने काही जणांना अ‍ॅलर्जी आली तेव्हा हे कळले. खरे तर प्रत्येक गोष्टीला विशिष्ट वेळ हा लागतोच पण आपल्याला सगळेच झटपट हवे असते. 

लहान मुलांचेही तसेच. अडीच वर्षे होत नाही ते घाल शाळेत. शाळा म्हणजे प्ले ग्रुप हो. म्हणजे आईवडील आपल्या प्ले ग्रुप मध्ये जायला मोकळे. इथे सरसकट आईवडीलांना म्हणत नाही पण बहुतांशी. काही पालक खुप जागरुक पण असतात. त्या एवढ्याशा जीवाला नाच गाणे चित्रकला सगळे शिकवण्याची घाई. नुसते शिकवण्याची नाही तर स्पर्धेत उतरवुन नंबर मिळवण्यासाठी घाई. नुसती चढाओढ लागलेली दिसते. शिवाय टी व्ही शोज आहेतच त्याला खतपाणी द्यायला. झटपट प्रसिद्धी आणि पैसापण. 

पण या सगळ्यात हे कसे कुणाला कळत नाही की झटपट लहानपण संपणार म्हणजे झटपट तरुणपण येणार व झटपट म्हातारपण पण येणार. झटपट तुम्ही संपणार पण. म्हणुनच की काय पुर्वी म्हातारपणी होणारे आजार तरुणपणीच मागे
लागत आहेत. पस्तीस होत नाही तो चष्मा डोक्यावरचे केस कमी होणे. ब्लड प्रेशर आणि हृदयविकार  वगैरे.

माझ्या माहितीत एक जण आहेत नोकरीला लागले लगेच घर गाडी घेतली. आजकाल कर्ज मिळणे फारच सोपे झाले आहे म्हणुन मग हप्ते आणि घरातला खर्च याचा मेळ जमेना अन मग एका बेसावध क्षणी आत्महत्या केली. काय उपयोग झाला त्या घाईचा.

प्रतिक्षेनंतर मिळालेल्या गोष्टीचा आनंद जास्त असतो. घाईत जगु नका. गेलेले क्षण कितीही किंमत मोजली तरी परत नाही जगता येत. प्रत्येक टप्प्यावर क्षणभर थांबा एक आनंद तुमची वाट बघत असलेला सापडेल. प्रत्येक वेळेची आपली एक गंमत असते.

लहानपणची मजा मोठे झाल्यावर कशी उपभोगता येणार? नोकरी लागल्यावर पै पै साठवुन एक एक वस्तू घेण्यात काय मजा असते. हे आता नोकरी लागल्या लागल्या फ्लॅट बुक करणाऱ्या किंवा मोटार घेणार्‍या आजच्या पिढीला कसे कळणार? मान्य आहे ते लगेचच खुप कमावतात पण तरीही सगळ्या गोष्टीची इतकी घाई कशाला? पेय जसे चवीचवीने घोट घोट घेण्यात मजा आहे. तसेच आयुष्य पण सावकाश चवीचवीने जगा की. पण नाही दुसरा कुणीतरी आपल्या आधी काही करेल म्हणुन आपण आधी अमुक एक ती गोष्ट करायची यासाठी घाई.

आयुष्य पण तसच फास्ट प्रेम, फास्ट लग्न आणि हो फास्ट काडीमोड सुद्धा.अर्थात हे सगळ्यांना लागु नाही पण असे प्रकार घडण्याची सुरवात मात्र झाली आहे. 

जीवन हे गतिशील आहे. ते गतिमान झालय. गाडी चालवताना देखील दुसर्‍यापेक्षा फास्ट जाण्याच्या नादात किती अपघात होतात. त्यात अपंगत्व येत किंवा कधीकधी आपल्या आणि समोरच्या व्यक्तीच्या देखील जीवावर बेतत. वेग हवाच जीवनाला, पण इतकाही नको की जीवनच संपेल. एक संयमित गतीने चालण्यातच जीवनाची मजा आहे आहे. काही तर या वेगाचे थ्रील अनुभवण्याच्या क्षणिक मोहाने जीवनाला मुकतात. त्यांना हे कळत नाही की ते एकटे संपत नाहीत तर मागे राहिलेल्या लोकांचे पण जीवन संपल्यागत होते. त्या दुःखाने श्वास सूरू असले तरी त्यात जीव नसतो. फास्ट जाण्याच्या नादात आपल्या माणसांचे हात कधी सुटतात याचा पत्ता लागत नाही. आणि शेवटी धावुन धावुन दमला थकला तर एकटेपणा जाणवतो तो वेगळाच. 
वेग आवरा 
स्वतःला सावरा
अन्यथा धावुन धावुन
जीव होईल कावराबावरा.. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Esakal Citizen Journalism Sunetra Vijay Joshi article