कापसाच्या मंदी मागचे अर्थशास्त्र

विजय जावंधिया 
रविवार, 25 मार्च 2018

आज अमेरिकेत रूईचा दर प्रति किलो 1 डॉलर 95 सेंट (अंदाजे 130 रुपये किलो) आहे. म्हणजेच रूई बाजारात तेजी आहे. तरी भारतात शेतकऱ्यांना मिळणारे कापसाचे दर 4700 ते 5000 रुपये प्रति क्विंटलच आहेत. चीन, बांगलादेश, पाकिस्तानमधून भारतीय कापसाची मागणी वाढत आहे. तरी मंदी का?

अमेरिकेच्या कापूस (रुई) बाजारात 2017 साली एक किलो रुईचा दर 1 डॉलर 70 सेंटच्या ( अंदाजे 110 रुपये किलो) आसपास होता. परंतू आपल्या देशातील कापूस बाजारात शेतकऱ्यांना मिळालेला कापसाचा दर 5000 ते 5500 रुपये प्रति क्विंटलचा होता. आज अमेरिकेत रूईचा दर प्रति किलो 1 डॉलर 95 सेंट (अंदाजे 130 रुपये किलो) आहे. म्हणजेच रूई बाजारात तेजी आहे. तरी भारतात शेतकऱ्यांना मिळणारे कापसाचे दर 4700 ते 5000 रुपये प्रति क्विंटलच आहेत. चीन, बांगलादेश, पाकिस्तानमधून भारतीय कापसाची मागणी वाढत आहे. तरी मंदी का? हा प्रश्‍न सामान्य शेतकऱ्यांना पडणे स्वाभाविक आहे. 

याचे मुख्य कारण 2017 मध्ये सरकीच्या दरात विक्रमी तेजी होती. सरकीचे दर 2500 ते 2600 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले होते. खाद्य तेलाच्या दरात मंदी होती, तरी सरकीचे दर तेजीत होते. कारण सरकी ढेपीच्या (ऑईल केक) दरात तेजी होती. प्रति क्विंटल 2300 ते 2400 रुपये इतका सरकी ढेपीचा दर होता. 

देशातील रूई बाजारात 39000 ते 40000 रुपये प्रति खंडी रूईचे दर होते व 2500 ते 2600 रुपये प्रति क्विंटल सरकीचे दर होते. म्हणूनच कापसाचे दर 5500 रुपयांच्या आसपास होते. आज रूईचे दर 40000 ते 42000 रुपये खंडी आहेत. पण सरकीचे दर 1600 ते 1700 रुपये प्रति क्विंटलचाच आहे. कारण सरकी ढेपीचा दर 1500 ते 1550 रुपये प्रति क्विंटलचेच आहेत. 
एक क्विंटल कापूसापासून 34 किलो रूई व 65 किलो सरकी मिळते. एक खंडी रूई म्हणजे 1 क्विंटल 70 किलो रूईच्या दोन गाठी. म्हणजेच 10 क्विंटल कापसापासून 1 खंडी रूई (40000 रुपये) व 6.5 क्विंटल सरकी ( 1500 रुपये दराने 10000 रुपये) म्हणूनच आज 4800 ते 5000 रुपये प्रति क्विंटलचे दर बाजारात आहे. 

हमी किंमतीपेक्षा (4320 रुपये) जास्त दर असल्यामुळे कापूस आयातीकडे आपले लक्ष नाही. 2015-16 साली 22 लक्ष गाठी 2016-17 साली 30 लक्षगाठी व 2017-18 साली 17 लक्ष गाठी आयात होणार आहेत. कापसावर आयातकर शुन्य आहे. 2011साली अमेरिकेचा कापूस बाजारात 60000 रुपये खंडी रुईचा दर होता. अमेरिकेचा कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्या का करीत नाही? कारण त्यांना 30 हजार कोटी रुपयांचे अनुदान दिले जाते. हे कापसाचे अर्थशास्त्र आहे. 

( लेखक शेतकरी संघटनेचे पाईक आहेत) 

Web Title: Esakal Citizen Journalism Vijay Javndhiya Article