अनुभवातून शहाणपण देणारे विद्यापीठ

अनुभवातून शहाणपण देणारे विद्यापीठ

लेह - लडाखमधील लष्कराला थंडीपासून संरक्षण करता यावे म्हणून मातीपासून बनविलेले, सौरऊर्जा वापरून जाग्यावरच उभी करता येतील अशा पर्यावरणपूरक छोट्या झोपड्या बनविण्याचे तंत्र सोनम वांगचूक यांनी विकसित केले आहे. बाहेर जेव्हा वजा 20 अंश सेल्सियस तापमान असते तेव्हा या झोपड्यांच्या आत 20 अंश सेल्सियस तापमान असते. लष्कराने या प्रकल्पात रुची दाखविली आहे. लडाखमधील विद्यार्थ्यांसाठी  सोनम वांगचूक यांनी 1988 मध्ये शिक्षण संस्था स्थापन केली. शिक्षणाच्या ठोकळेबाज कल्पनेतून बाहेर पडून, व्यवहाराच्या कसोटीवर टिकणारे, पर्यावरणपूरक, समाजभान असलेले, ज्ञान, मूल्य आणि कौशल्यावर आधारीत पदवीपेक्षा ज्ञान देणारी अशी ही संस्था आहे. 

सोनम 2009 साली प्रकाशझोतात आले.  त्यावेळी त्यांच्या पर्याची दूरदृष्टीच्या शैक्षणिक रोडमॅपने आमिरखान प्रभावित झाले होते. आमिरखान यांनी कामयाब होनेके के लिये नही, काबिल होने के लिये पढो, असे जीवनाचे तत्वज्ञान सांगणारा फुनसूक वांगडू’ थ्री इडियटस् मध्ये सादर केला रसिकांनी श्री इडियटस् डोक्यावर घेतला. सोनम वांगचूक यांचा जन्म लेहपासून 70 कि.मी. अंतरावरील केवळ 5 घरे असलेल्या छोट्या गावात झाला. गावात शाळाच नव्हती. नऊ वर्षांपर्यंत वांगचूक शाळेत गेलेच नव्हते. कायम आईला बिलगलेले वांगचूक शाळेत जायला बिलकुल इच्छुक नव्हते. शाळेमुळे शिक्षण संपेल अशी भीती त्याला वाटत होती. शेती, प्राणी, खेळणे, नदीत डुंबणे यामध्ये दिवस आनंदात चालले होते. सुरवातीच्या काळात आईनेच त्यांना मातृभाषेत प्राथमिक शिक्षणाचे धडे दिले. मातृभाषा आईच्या दुधासारखी आहे अशी त्यांची धारणा आहे. त्यानंतर श्रीनगरच्या केंद्रीय विद्यालयात शिक्षण सुरू झाले. परंतु अधिकतर काळ वर्गाबाहेर काढावा लागत असल्याने त्यांची कामगिरी आऊटस्टॅडींग होती, असे गमतीने म्हटले जायचे. एका वर्षात दोन इयत्ता पूर्ण करुन अखेरीस वांगचूक यांनी मेकॅनिकल इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केले. या सर्व काळात अर्थार्जनाकरिता दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम वांगचूक करीत असत.

लेह लडाखमधील विद्यार्थी हुषार असूनही जीवनाशी संबंध नसलेल्या शिक्षणपद्धतीमुळे 95 टक्के विद्यार्थी नापास होत असत. खरे पाहता, विद्यार्थी नाही तर शिक्षणव्यवस्था फेल झाली होती. यास्तव वांगचूक यांनी फक्त बटन, पेपर्स आणि पाठांतराशी जोडलेल्या शिक्षणाचा ढाचा बदलण्याचे निश्‍चित केले. सतत प्रयोगशील, संशोधनावर आधारीत, हिमालयाच्या पहाडी प्रदेशातील विद्यार्थ्यांना पडणारे प्रश्‍न व त्यांची उत्तरे शोधणारी शिक्षणव्यवस्था स्वत:च्या पायावर उभी केली. लडाखी विद्यार्थ्यांना पारंपारिक संगीत, नृत्य, कला, इतिहासाबरोबरच आधुनिक ज्ञान-विज्ञान उपलब्ध करून देऊन स्पर्धा स्वत:शी व इतरांशी सहकार्य करण्याची मानसिकता विकसित केली.

1988 पर्यंत लडाख खोर्‍यातील 15 हजार विद्यार्थी शिक्षणासाठी जम्मू-काश्मीर मध्ये जात असत. एका अर्थाने हे सर्व विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या निर्वासितासारखे राहतात आणि आधारभूत नसलेले शिक्षण घेवून खोर्‍यामध्ये परततात. शिक्षणात आविष्कार नाही, शोध नाही, अशी समाज व निसर्गापासून तोडणारी शिक्षणव्यवस्था टाळून लडाखच्या मातीचा संदर्भ देवून नवा सशक्त पर्याय उभा केला.

माती, लाकडांनी पर्यावरणपूरक, सौरऊर्जेवर आधारीत शाळा उभ्या केल्या. विद्यार्थी शिक्षक व स्वयंसेवकांनी स्वत:ची व्यवस्था उभी केली. विसरल्याबद्दल दोष देण्यापेक्षा विसरता येणार नाही, अशी अध्यापन पध्दती शोधून काढली. नागरी सुविधा उपलब्ध नसलेल्या लडाखी प्रदेशात विद्यार्थी स्वत:च व्यवस्थापन करुन शाळा चालवितात व त्याची देखभाल देखील करतात. वांगचूक यांनी शिक्षणात परिवर्तन आणून नापास विद्यार्थ्यांचे प्रमाण 95 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर आणले. ऑपरेशन न्यू होप संस्थेमध्ये नव्या प्रयोगातून शिक्षणात परिवर्तनाची दिशा निश्‍चित केली. सरकारी शाळा बदलण्याऐवजी प्रथम 1, नंतर 30 आणि आता 30 गावांत शाळा सुरू करुन शिक्षणाला शाळेच्या बाहेर काढले. सोनम रोज नवनव्या कल्पना मांडणारे इंजिनिअर आणि प्रयोगशील शिक्षणतज्ज्ञ आहेत.

उत्तरेच्या अति टोकाला तीन साडेतीन हजार फूटांवर असलेल्या लेह लडाख च्या पहाडी प्रदेशात सतत बर्फवृष्टी चालू असते. परंतु एप्रिल - मेमध्ये पाण्याची तीव्र टंचाई असते. गरज ही शोधाची जननी या उक्तीप्रमाणे सोनम एके दिवशी पूल ओलांडत असता त्यांना पुलाखाली बर्फ चिकटलेला दिसला. हा बर्फ वातावरणातील उष्णतेने वितळत नाही तर सूर्यकिरणामुळे वितळतो हे लक्षात आल्यावर कृत्रिम हिमनदीपासून आईस स्तूप या लाखो लिटर्स पाणी साठविण्याच्या क्षमतेचे तंत्र विकसित करण्यात आले. लडाख खोऱ्यातील पाणी टंचाईवर मात करण्यात आली. सोनम वांगचूक यांच्या पाणीटंचाईवरील आईसस्तूपच्या अलौकिक प्रतिभेच्या शोधाला प्रतिष्ठेचा 67 लाख रुपयांचा रोलेक्स पुरस्कार 2016 साली लॉस एंजेलिस येथे सन्मानाने देण्यात आला. या रकमेतून त्यांच्या स्वप्नातील विद्यापीठ आकार घेत आहे. त्यामध्ये पदवी नव्हे, शिक्षण मिळेल स्वत:च्या पायावर उभे राहण्याकरिता कौशल्यावर आधारीत पर्यावरणपूरक अपारंपारिक शिक्षणासाठी 200 एकर जमिनीवर 800 कोटी रुपये खर्च करुन फयांग व्हॅलीमध्ये हिमालयन इन्स्टिटयूट ऑफ अल्टरनेटीव्ह हे सोनम यांच्या स्वप्नातले विद्यापीठ आकार घेत आहे. मिलापच्या सहकार्याने 14 कोटी जमा झाले आहेत. संस्थेमध्ये मान्यताप्राप्त कोर्सेस तसेच कौशल्यावर आधारीत पदवी विरहित अभ्यासक्रम उपलब्ध राहतील. सततच्या प्रयोगातून पर्यावरणपूरक अशी आधारभूत प्रवाही शिक्षणव्यवस्था उभी करण्याचा सोनम यांचा प्रयत्न आहे. आधारभूत पर्यटन, लडाखच्या परंपरेशी सुसंगत स्थापत्यशास्त्राचे शिक्षण तसेच पर्यावरणपूरक ग्रीन शहरे उभी करण्याची दिशा या विद्यापीठामधून मिळेल असा सोनम यांचा विश्वास आहे.

माती आणि लाकडापासून स्वत:च बनविलेल्या शाळेच्या मोकळ्या खिडकीतून पहाटे आलेला स्वच्छ सूर्यप्रकाश अंगा-खांद्यावर घेत लडाखच्या पहाडी प्रदेशातील विद्यार्थी मातृभाषेतून, अनुभवातून शहाणपण शिकत नव्या स्वप्नांना सामोरा जात आहे. नवनव्या प्रयोगातून संशोधनातून शिक्षण आणि त्यातून प्रचिती आणि पुन्हा शिक्षण अशा प्रकारे शिकण्यातून जगण्याचा आत्मविश्वास देणा-या विद्यापीठाचा सोनम वांगचूक पुढील महिन्यापासून शुभारंभ करीत आहेत. शिक्षण क्षेत्रातील नव्या आशावादी पहाटेचं आपण स्वागत करुया!

(लेखक शिक्षणक्षेत्रातील व्यवस्थापनाचे अभ्यासक आहेत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com