
पुणे ः नामांकित पॅथॉलॉजिस्ट डॉ. अजित गोळविलकर यांचे नुकतेच कॅनडा येथे निधन झाले. त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व व वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा.
आयुष्यात क्वचितच अशी माणसं भेटतात, की ज्यांच्यामुळे आपल्याला एक कायमचं हक्काचं, भरवशाचं ठिकाण मिळतं. माझ्या भाग्यवंत आयुष्यात परमेश्वरानं अशाच एकाची गाठ घालून दिली, जो उणीपुरी चाळीस वर्षं माझ्याबरोबर होता. कोणत्याही वेळी हाक मारावी आणि त्याच्याकडून, त्याच्या संपूर्ण कुटुंबाकडून प्रतिसाद यावा, अशी जवळीक आमच्यात निर्माण झाली. तो आपला माणूस म्हणजे डॉ. अजित गोळविलकर.
अजितची आणि माझी ओळख 1978 मध्ये झाली. तेव्हा आम्ही प्रसाद चेंबर्स, कर्वे रस्ता येथे शेजारी होतो. नव्यानंच सुरू केलेला वैद्यक व्यवसाय, काम फार नसायचं. त्या वेळी मारलेल्या गप्पांतून पुढे गाढ मैत्रीची बीजं रुजली. त्याची कष्टाळू वृत्ती, कामाच्या दर्जाचा आग्रह, प्रत्येक पेशंटचं पूर्ण समाधान होईल असं वागणं, ही वैशिष्ट्यं नजरेत भरली. अजितचं काम सातत्यानं वाढत होतं. बघता बघता भांडारकर रस्त्यावर मुख्य लॅब आणि इतर अनेक ठिकाणी संकलन केंद्रे असा पसारा वाढू लागला. त्यानंतर त्याच्या कर्तृत्वाचा आलेख सतत चढत्या कमानीचा राहिला. "क्वाएटली अँबिशियस' असं मी त्याचं वर्णन करीन.
शहरात कुठल्याही मोठ्या हॉस्पिटल्समध्येही होणार नाहीत अशा तपासण्या माझ्या लॅबमध्ये होतील आणि त्यासुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाचे रिपोर्ट देतील, असा त्याचा कायमच प्रयत्न असे. अजितनं स्वकर्तृत्वावरच लॅबचा प्रचंड विस्तृत पसारा उभा केला आणि एक उत्कृष्ट नीतिमत्तेचा पॅथॉलॉजिस्ट म्हणून शहरात आणि बाहेरही नाव कमावलं.
समोरच्या माणसाची चौकशी तो इतक्या आस्थेनं करत असे, की तो अडचणीतला माणूस आपोआप निवांत होई. लॅबचे कर्मचारी म्हणजे आपलेच कुटुंबीय अशी त्याची भावना सदैव होती. बाहेरच्या वॉचमनपासून सहकारी पॅथॉलॉजिस्टपर्यंत, गरिबातल्या गरीब पेशंटपासून व्हीआयपी व्यक्तींपर्यंत (किर्लोस्कर, फिरोदिया, छाब्रिया, अगदी अमिताभ बच्चनसुद्धा) कोणालाही त्याच्याशी संपर्क करायला मुक्तद्वार होतं.
अजित हा अत्यंत कुटुंबवत्सल गृहस्थ होता. आपली पत्नी शीला आणि मुली डॉ. अवंती आणि डॉ. विनंती यांच्यावर त्याचं नितांत प्रेम होतंच.
अजितला अनेक मानसन्मान मिळाले. कधी आपल्या विषयातील महत्त्वाच्या परिषदांसाठी, तर कधी पर्यटनाचा छंद म्हणून, देशविदेशांतील प्रवासातून अत्यंत सुंदर अभिरुचीसंपूर्ण मूर्ती गोळा करून त्यानं आपलं फार्म हाउस प्रेमानं सजवलं, परंतु तिथे जाऊन राहण्याचा निवांतपणा त्याला कधी मिळाला नाही. मराठी भावगीतं, नाटकं, बॉलिवूड सिनेमे ही त्याची आवड पुरवायलासुद्धा त्याला फार क्वचित सवड मिळाली.
"चिंता करतो विश्वाची' या तत्त्वानुसार वागणाऱ्या या माणसाला अति उच्च रक्तदाब होता. बेशुद्धावस्थेतच त्याला मरण आलं. "द किंग इज डेड, गॉड सेव्ह द किंग' असं म्हणतात, त्याचा प्रत्यय मला येत आहे.