कृतज्ञता सोहळा 

- रजनी पांडव, पुणे 
Monday, 29 July 2019

एखादा दिवस खूप छान असतो. अगदी मनाच्या गाभाऱ्यात, कोपऱ्यात जपून ठेवण्यासारखा. याचा अनुभव मी नुकताच घेतला. 
मुले परदेशात असताना इकडे आई-वडिलांना जगण्यासाठी मित्रपरिवाराचा आधार मिळतो. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सोहळ्याचे आयोजन केले जाते, ही त्या मुलांवर केलेल्या संस्काराची पावतीच. त्या सोहळ्याचा घेतलेला अनुभव... 

एखादा दिवस खूप छान असतो. अगदी मनाच्या गाभाऱ्यात, कोपऱ्यात जपून ठेवण्यासारखा. याचा अनुभव मी नुकताच घेतला. 
मुले परदेशात असताना इकडे आई-वडिलांना जगण्यासाठी मित्रपरिवाराचा आधार मिळतो. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सोहळ्याचे आयोजन केले जाते, ही त्या मुलांवर केलेल्या संस्काराची पावतीच. त्या सोहळ्याचा घेतलेला अनुभव... 

वीस वर्षांपूर्वी पुण्यात आल्यानंतर एक वर्षभरच एका सोसायटीत राहिलो. त्या एका वर्षाने मला खूप काही दिले. तिथे आयुष्याची प्रेमाची, मायेची माणसे मिळाली. मैत्रिणी मिळाल्या. तिथे राहणारी सगळीच ज्येष्ठ नागरिक. त्यांची मुले, मुली पंखात बळ आल्यावर लग्न होऊन आपापल्या घरट्यांत, देशात-परदेशांत स्थायिक झालेली. वर्षभर त्या सोसायटीत भाड्याने राहून आम्ही फ्लॅट घेतला व इकडे आलो. 

मध्यंतरी सकाळी दहा वाजता फोन खणखणला. हातातले काम बाजूला करून फोन घेतला. "हॅलो काकू, मी विनीता परांजपे यांची सून बोलतेय. उद्या आई-बाबांच्या लग्नाचा 50 वा वाढदिवस आणि बाबांची पंचाहत्तरी असा कार्यक्रम प्रतिज्ञा हॉलमध्ये ठेवलाय. तुम्ही आईच्या मैत्रिणी, उभयतांनी यायचेय आणि अजून एक, सोबत पुष्पगुच्छ, कार्ड वगैरे काही आणू नका. अन्‌ बाय करून फोन ठेवला. 

विनीता अतिशय बुद्धिमान, हजरजबाबी असलेली. प्रत्येक विषयावर भरभरून बोलणारी. घरातील सर्वांची आस्थेने चौकशी करणारी. ती मला जिवाभावाची सखी वाटते. आंतरिक आनंद देते. 
ठरल्या वेळी आम्ही तिथे पोचलो. हॉल फुलांनी सजविलेला होता. सुहास्यवदनाने तिच्या दोन्ही सुना येणाऱ्यांचे स्वागत करून आसनस्थ होण्यास सांगत होत्या. तेवढ्यात थंडाईचे ग्लास आले. तिच्या धाकट्या सुनेच्या भावाने अकॉर्डियनवर गाणे वाजवण्याचा कार्यक्रम सुरू केला. नंतर केक कापला. तिच्या मोठ्या नातीने आजी-आजोबांचे लहानपणीचे ते या वयापर्यंतचे काढलेले फोटो एकत्र करून त्यांची बोलकी डीव्हीडी बनवली होती. त्या फोटोंना साजेसे, समर्पक गाणीही त्यात पेरली होती. त्यानंतर आजोबांना 75 प्रज्वलित दिव्यांच्या तबकाने औक्षण केले. विनीताच्या सत्तर वर्षांच्या मामींनी गाणे म्हटले. अंजली लागूने (लागू बंधू मोतीवाले) तिच्यावर तयार केलेले अप्रतिम काव्य सुरात गायले. मीही लिहून नेलेला लेख वाचून दाखवला. विशेष नोंद घ्यायची म्हणेज विनीताच्या परदेशी स्थायिक झालेल्या मुलाने भाषण केले. तो म्हणाला ""आम्ही आमच्या आई-वडिलांसाठी हा सोहळा केला आहेच, पण आम्ही दोन्ही मुले परदेशी लांब असल्यामुळे या दोघांना (आई-वडील) जगण्यासाठी व करमणुकीसाठी जो सपोर्ट ग्रुप आहे त्यांच्यामुळे त्या दोघांचे जगणे सुसह्य होते. मोलाची साथ मिळते. त्या मित्र-मैत्रिणी व नातेवाईक यांच्यासाठीही "कृतज्ञता सोहळा' आहे.'' त्याचे हे शब्द खूप काही सांगून गेले. त्यानंतर सुग्रास भोजनाचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. 

आज काल सर्वांचेच जीवन धावपळीचे झाले आहे. जीवनाला कमालीचा वेग आलेला आहे. संसाराची दोन चाके पती-पत्नी आपल्या मिळकतीसाठी रुपयाच्या चाकावर धावत असल्यामुळे संसारालाही विलक्षण गती प्राप्त झाली आहे. तरीसुद्धा त्यातून वेळ काढून, नियोजन करून तिच्या मुलांनी व सुनांनी आपल्या आई-बाबांवरील प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी सर्वांना एकत्र आणून असा कार्यक्रम साजरा करण्याचे योजले व त्यांच्यावरील झालेल्या संस्काराची प्रचिती दिली. त्याबद्दल त्यांचे नक्कीच कौतुक. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gratatude Ceremoney