esakal | गोष्ट फुलांची
sakal

बोलून बातमी शोधा

flowers

गोष्ट फुलांची

sakal_logo
By
टीम ई सकाळ

श्याम पेठकर

फुलांच्या जखमा कितीही कोवळ्या असल्या, तरी त्या सुगंधी असतात. फुलं सुकली तरी त्यांच्या जखमा सुकत नाहीत. म्हणूनच ती आता पावसाळ्यात हिरव्यागच्च झालेल्या पुष्पहीन मोगऱ्याच्या करंट्या झुडपासारखी दिसते. ती भेटली की डोळ्यात ती सांज अनावर होते.

आपल्यालाच फुलं वेडी करतात की फुलांनादेखील आपलं वेड असतं? कळत नाही... पण, फुलांचं मौन तोडून त्यांना बोलतं करण्याइतकी जवळीक ज्याला साधते त्याच्या आयुष्याची सुरेल कविता होते. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर फुलं अशी भेटत असतात आपल्याला. फुलं ऋतूंशी बांधील असतात म्हणून त्यांचा तिटकारा करण्यात काही अर्थ नाही. फुलांची कीव करावी, इतके काही आपण बुलंद कधीच नसतो अन् आपणही ऋतूंशी फुलांइतकेच बांधील असतो. कधीतरी आयुष्याच्या अनावर गहिवरत्या वळणावर फुलांनाही आपण तितकेच हवे आहोत, हे कळतं तेव्हा, परत मागे वळता येण्याची अगतिकता रित म्हणून पाळण्याची शिक्षा भोगावीच लागते; तरीही फुलं भेटतच राहतात. जगण्यानं निब्बर झालेले डोळे फुलांची हळवी आवाहनं तोलूच शकत नाहीत. फुलं मात्र वळणदार अक्षरे गिरवीत आयुष्याची पाटी साक्षर करीत असतात.

आधी गावं फुलांनी सजलेली असायची तेव्हाची असेल ही गोष्ट... गुढानं भारलेल्या त्या चिरेबंदी वाड्यात कोपऱ्यातल्या भाड्याच्या खोल्यांत बिऱ्हाड होतं. वाड्याचे मालक वांझ झाले की वाडा असा केविलवाणा होतो. चार-दोन पैशांसाठी खोल्या भाड्याने दिल्या जातात. अशाच त्या निराश्रित झालेल्या वाड्यातल्या फरसबंदीच्या पायऱ्यांवर बसून ‘गुलबकावली’ हे पुस्तक वाचून काढलं होतं. एका फुलासाठी सात समुद्र पार करणारा शूर राजकुमार. तलवारीचं अन् राजकुमारीच्या सौंदर्याचं तळपणं सारखंच. प्राक्तनही... गुलबकावलीच्या फुलासाठी जीव वेडा झाला होता. वाड्यात बरीच बिऱ्हाडं होती. भाडेकरू म्हणून एकसंधही झालेली. या घरात शिजलेलं त्या घरातल्या जेवण-ताटात हमखास असायचं. मुलं वाढत गेली अन् वाडाही वयात आला. हे मात्र कुणाच्या लक्षातही आलं नाही. वाड्याच्या फुलांचे संदर्भ हळूच बदलले. आधी भाद्रपदात वाड्याच्या फिरकीच्या फाटकावर मोहरलेली जाई-जुईची फुलं गौरी-गणपतीच्या हारासाठीच वेचली जायची. तगरीची टपोरी शुभ्र फुलं गंधहीन असली, तरीही त्यांना भावनांचे अनवट संदर्भ नक्कीच असतात.

आता ती सांजेला वाड्याच्या परसदारी असलेल्या भल्या मोठ्या कडुलिंबाच्या झाडाखाली जुईचे गजरे विणत बसलेली. गणपतीचे हार हळुवार वळण घेत गजऱ्यापर्यंत आलेले. तोदेखील मग तिच्याजवळ बोलत बसायचा. मैदानात खेळून आलेला अन् दमलेलादेखील. आपल्याच ओठांवर वाढणाऱ्या काळसर कोवळ्या लवीत हरवलेला. एका लयीत गजरा ओवणाऱ्या तिच्या हातांच्या लयबुट्टीदार वळणांकडे तो बघत राहायचा अन् ती त्याच्या डोळ्यांत दिसणाऱ्या फुलांकडे बघत राहायची. तिच्या पापण-काठांवर आता कळ्या तटतटून आलेल्या. तो तिला ओंजळभर फुलं मागायचा. ती उगाच फुरंगटायची. तिच्या ओच्यातली फुलं त्याच्या ओंजळीत दिसायची; मग बरीच रात्र झाल्यावरही. आता फुलांचे हे असले बदललेले संदर्भ कुणाच्या लक्षातच येऊ नयेत, असेही नसते. ज्यांचं अंगण असतं, ज्यांनी फुलझाडे लावलेली असतात, त्यांना ऋतू कळतात अन् ऋतूंनी वेडावलेले फुलांचे हळवे संदर्भदेखील कळतात...

बकावलीचं गोष्टीचं पुस्तक वाचूनही जाईच्या फुलांचे हे आर्त संदर्भ कळण्याचे आपले काही वय झालेले नव्हते. भाऊला मग वडिलांनी दूर नागपुरात मामाकडे शिकायला पाठवून दिले अचानक. तिचाही साखरपुडा झाला. घाटदार वेणीत माळलेला भला मोठा गजरा लेवूनही तिच्या डोळ्यात मात्र भादव्यातल्या त्या सांजांना पेटणारा मोगरा मात्र आता दिसत नव्हता. हे सारे असे का घडले अन् मोठी माणसं अशी वाड्याच्या करारी दगडासारखी त्या काळात का बोलत होती, हे तेव्हा आपल्याला कळले नाही. भाऊलादेखील कळावे इतके फुलांचे कोवळेपण पेलण्याचे त्याचेही वय नव्हते...

आता भादव्यात जाई-जुई बहरतात, तेव्हा गजऱ्यात जखमी झालेल्या त्या फुलांची याद येते. फुलांच्या जखमा कितीही कोवळ्या असल्या तरी त्या सुगंधी असतात. फुलं सुकली तरी त्यांच्या जखमा सुकत नाहीत. म्हणूनच आता पावसाळ्यात हिरव्यागच्च झालेल्या पुष्पहीन मोगऱ्याच्या करंट्या झुडपासारखी ती दिसते. भाऊदेखील चाफ्याच्या पानं गाळून करंट्या झाडासारखा दिसतो; तरीही ती भेटली की दोघांच्याही डोळ्यात ती सांज अनावर होते. ती हळूच भाऊच्या हातावर तिच्याकडे असतील ती फुलं टाकून जाते...

फुलांच्या या असल्या काही गोष्टी त्याच वाड्यातल्या... फुलांचे असले काही संदर्भ आणखी ओवायचेत आपल्याला या सदरात. फुलांच्या वाटेने जाणे तसे कठीण असते. फुलं ओढतात आपल्याला त्यांच्याकडे. वेचाविशी वाटतात. आळीन-माळीण मग असल्या फुलंवेड्यांना खालचे- वरचे वेचून घ्यायला सांगते. तसलीच काही फुलं मी वेचलेली तुमच्या ओंजळीत टाकेन म्हणतो!

pethkst.shyamrao@gmail.com

(लेखक प्रसिद्ध नाटककार, पटकथाकार, संवादलेखक असून, ललितबंधातील भावस्पर्शी लिखाणासाठी प्रसिद्ध आहेत.)

loading image