`जेम्स बॉंड इन मोशन` 

-उदय बिनीवाले, कोथरूड, पुणे 
Friday, 23 August 2019


वर्ल्ड कप क्रिकेट 2019 च्या निमित्याने नुकताच इंग्लंडला जाण्याचा योग आला. त्या वेळी अनेक विशेष ठिकाणे पाहण्याची संधी मिळाली. "लंडन फिल्म म्युझियम' हे त्यातीलच एक. ब्रिटिश गुप्तहेर 007 जेम्स बॉंडच्या चित्रपटात वापरण्यात आलेल्या शंभरपेक्षा जास्त वस्तूंचा समावेश या संग्रहात आहे. 

वर्ल्ड कप क्रिकेट 2019 च्या निमित्याने नुकताच इंग्लंडला जाण्याचा योग आला. त्या वेळी अनेक विशेष ठिकाणे पाहण्याची संधी मिळाली. "लंडन फिल्म म्युझियम' हे त्यातीलच एक. ब्रिटिश गुप्तहेर 007 जेम्स बॉंडच्या चित्रपटात वापरण्यात आलेल्या शंभरपेक्षा जास्त वस्तूंचा समावेश या संग्रहात आहे. 

 

"माय नेम इज बॉंड- जेम्स बॉंड' अशी बेदरकारपणे डायलॉगबाजी करत, किंचित गुढघ्यात वाकून अचूकपणे रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडणे, अशा स्टाइलमध्ये, 70-80 च्या दशकापासून लेखक इयान फ्लेमिंगचा गुप्त हेर जेम्स बॉंडने चित्रपट सृष्टीत धुमाकूळ घातला होता. जगभरातील करोडो प्रेक्षकांना आपल्या चपळ हालचाली, कुशाग्र बुद्धिमत्ता, जबरदस्त व्यक्तिमत्त्व आणि अत्याधुनिक उपकरणे यांचा वापर करून अक्षरशः वेड लावले होते. प्रतीपक्षातील हेर, गुंडांना क्षणार्धात चकवा देऊन त्यांना नामोहरम करणे, तसेच सुंदर ललनांच्या सान्निध्यात तितक्‍याच सहजपणे रममाण होणे आणि तथाकथित ब्रिटिश गुप्तहेर म्हणून प्रचंड दबदबा निर्माण करून आपले उद्दिष्ट व कामगिरी यशस्वीपणे पार पाडणे हे या व्यक्तिरेखेची वैशिष्ट्ये होत. 

जेम्स बॉंडची थरारक भूमिका सीन कॉनेरी, डेव्हिड निवेन, जॉर्ज लेझीनबे, रॉजर मूर, टिमोथी डाल्टन, पिअर्स ब्रोन्सन आणि डेनियल क्रेग यांनी साकारली असून, या ऍक्‍शन चित्रपटांनी 50 वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. 

बॉंड चित्रपटांच्या अफाट लोकप्रियतेमध्ये महत्त्वाचा वाटा आणि आकर्षण ठरले आहे ते म्हणजे या गुप्तहेराने वापरलेल्या मोटारी आणि तांत्रिक उपकरणे. वेगवेगळ्या चित्रपटासाठी प्रसंगानुरूप, खऱ्या मोटारीमध्ये प्रत्यक्ष बदल केले असून, त्यामध्ये अनेक अत्याधुनिक उपकरणे बसविली गेली आहेत. 
सगळ्यात महत्त्वाचे आणि विशेष बाब म्हणजे लंडन येथील या संग्रहालयात सर्व मोटारी, मोटार बोट, इतर तांत्रिक सामग्री काळजीपूर्वक आणि मूळ स्थितीत अतिशय उत्तमपणे जतन करून ठेवल्या आहेत. प्रेक्षक आणि रसिक हे सर्व पाहून थक्क होतात. 
मध्य लंडन, कॉव्हेन्ट गार्डन येथे "बॉंड इन मोशन' हे संग्रहालय आहे. या ठिकाणी बॉंड चित्रपटातील मूळ मोटारींसह अन्य तांत्रिक सामग्री, पोशाख अशा जवळपास 100 वस्तूंचा संग्रह अतिशय सुस्थितीत स्वरूपात पाहायला मिळतो. प्रत्येक वस्तूची माहिती तसेच काही ठिकाणी चित्रपटातील दृश्‍ये व्हिडिओद्वारे प्रदर्शित करण्यात आली असून, त्यामुळे याची रंगत आणखीनच वाढते. 1962 पासूनच्या एकंदर 24 बॉंड चित्रपटातील या वस्तू आहेत. 
लंडनला जाणाऱ्या सर्वांनी जरूर या संग्रहालयाला भेट द्यावी आणि ऐक वेगळे आणि प्रेक्षणीय ठिकाण अनुभवावे, असे वाटते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jems bond in motion