...तर मानव प्राणी रांगेत असेल 

lokesh bapat
lokesh bapat

मानवी जीवन सुखकर व सुकर करायला पृथ्वीवरील मुंग्यांपासून ते महाकाय हत्तीपर्यंत प्रत्येक प्राण्याचे अस्तित्व असणे खूप गरजेचे आहे. यातील एक घटक जरी कमजोर पडला, तर भविष्यात पूर्ण पर्यावरण कोलमडून पडेल. त्याचा परिणाम स्वतःला बुद्धिमान समजणारा मानव नावाचा प्राणी उद्या त्याच रांगेत उभा असणार आहे.

जसा जसा काळ पुढे जातो तसे काळाच्या ओघात आपण अनुभवलेल्या किंवा पाहिलेल्या अनेक गोष्टीही मागे पडत जातात किंवा नष्ट होत जातात. आता व्यवसायाचा भाग पहिला तर लक्षात येईल की प्रगतीच्या ओघात आपण लहानपणी पाहिलेले कल्हईवाले गेले, डबेवाला गेला, बोहरीण गेल्या, मोची गेले, लोहार गेले, चाकू सुरी यांना धार देणारे गेले, त्यांचे व्यवसाय संपुष्टात आले. मग या समाजाने कोठे ना कोठे काळाशी तडजोड करत आपल्या व्यवसायात बदल केला, तर काही आजही आर्थिक परिस्थितीचा सामना करत दिवस काढत आहेत.

काल रात्री नेहमीप्रमाणे कुटुंबासह गप्पागोष्टी करताना माझी मुलगी अचानक ओरडली. आई अगं... टेबलावर कशाला तरी मुंग्या आल्या आहेत. आत जाऊन पाहिलं तर टेबलावर अगदी छोट्या आकाराच्या लाल रंगाच्या मुंग्या अगदी संथगतीने इकडून तिकडे जात होत्या. डोक्‍यात एकदम प्रकाश पडला, आमच्या लहानपणी लाल मुंग्या त्यांचा आकार, त्यांची चपळता आणि त्यांचे कडकडून चावणे याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल. घरच्या अंगणात, मैदानात, डोंगरावर, रस्त्याच्या बाजूला, अनेक ठिकाणी यांची मोठी वारुळे असायची. एकदम लक्षात आले की हा मानवी विकास, पर्यावरणातील आपला अतिहस्तक्षेप आणि आपणच निर्माण केलेली ही नानातऱ्हेची प्रदूषणे. यात मोठी गिधाडे, चिमण्या, बगळे, कावळे वगैरे यांच्या प्रजाती गेल्या काही वर्षांत नष्ट होत चालल्या आहेत.

आज केवळ मोठे पक्षी-प्राणी नाही तर आपण सगळ्यांनीच लहानपणी अनुभवलेल्या मुंग्या, फुलपाखरे, डोंगळे, मुंगळे, बेडूक, माशा, रेशमी कीडे, गोगल गाई, नाकतोडे असे छोटे, छोटे कीटक प्राणी बालपणी आपल्या कायमच अवतीभोवती असायचे. मग एकदम लक्षात आले की यांनी आपली अचानक साथ कधी, केव्हा आणि कुठे सोडली, हे कोणाला आठवते आहे का? आज तर यातल्या अनेक प्रजाती दिसेनाशा झाल्या आहेत. काही दुर्मिळ होत गेल्या, अनेक नष्ट झाल्यात किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

या छोट्या-छोट्या प्राणी-पक्ष्यांच्या संवर्धनाचे काय?
आपले संपूर्ण मानवी जीवन सुखकर व सुकर करायला किंवा व्हायला पृथ्वीवरील मुंग्यांपासून ते महाकाय हत्तीपर्यंत प्रत्येक प्राण्याचे अस्तित्व येथे असणे खूप गरजेचे आहे. ही एक फार मोठी नैसर्गिक साखळी आहे. या साखळीतला एक घटक जर कमजोर पडला, तर भविष्यात पूर्ण पर्यावरण कोलमडून पडेल. याचाच अर्थ जर आपल्या कृतीमुळे सर्व प्राणी, पक्षी, झाडे, कीटक यांच्या प्रजातीच्या प्रजाती नष्ट होत जातील किंवा गेल्या तर हा स्वतःला बुद्धिमान समजणारा मानव नावाचा प्राणी उद्या त्याच रांगेत उभा असणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com