कल्पवृक्ष कवी - पी सावळाराम 

महादेव ई. पंडित
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

ठाणे महानगरपालिका व जनकवी पी. सावळाराम कलासमितीच्यावतीने आज ठाणे येथील राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये सायंकाळी चार वाजता जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्कारांचे वितरण होत आहे. हा पुरस्कार सुधीर दळवी यांना तर गंगा जमुना पुरस्कार जयश्री टी. यांना देण्यात येत असून या पुरस्कार वितरणानंतर जनकवी पी. सावळाराम यांच्या गीतावर आधारित "कल्पवृक्ष कन्येसाठी' हा कार्यक्रम होत आहे. या निमित्ताने... 

"पी. सावळाराम' अर्थात दादांनी मराठी रसिकजनांवर भावगीतांच्या माध्यमातून मंत्रमुग्ध भुरळरूपी मंजूळ रेशमी शालच पांघरलेली आहे. दादा म्हणजे मराठी भावगीतांना लाभलेलं एक अद्‌भुत व अक्षय असे लेणं आहे. निसर्गाने पृथ्वीतलावर पुरुष व स्त्री अशी दोन बुद्धिवंत मनमोहक रूपे तयार केलेली आहेत. अर्थातच "सौंदर्य' हे लेणं स्त्रीकडेच जाते. मराठी कवी आणि त्यांच्या भावगीतामध्ये "सौंदर्याचं लेणं' असणार नाही असे विरळच ! दादांची जवळ जवळ सर्वच भावगीतं, भक्तिगीतं, लावण्या, प्रेमगीतं, मुलगी, सून, प्रेयसी व आई ह्या स्त्री रूपरेखेवरच ऐकायला मिळतील. 1948 च्या मेमध्ये "गंगा जमुना डोळ्यात उभ्या का?' या भावस्पर्शी गीतामुळे दादा, वसंत प्रभू आणि गानकोकिळा लतादीदी ही त्रिमूर्ती अख्ख्या महाराष्ट्रात प्रत्येक मराठीजनांच्या अंतःकरणात घर करून बसली होती. 

दादांचे लिखाणाचे काम नित्यनेमाने पुढे चालूच होते. पुढे साधारणपणे फेब्रुवारी 1951 च्या दरम्यान दादा काही कामानिमित्त लता दीदींच्या घरी गेले होते. त्यावेळी माई आपल्या लेकीला म्हणाल्या, ""लता ! अगं तुझ्या बाबांची पुण्यतिथी जवळच आलेली आहे आणि त्यांच्याकरिता एखादं काव्य अथवा गीत तयार करण्यासाठी दादांना (सावळारामांना) सांग.'' यावर त्वरित लतादीदींनी आपल्या माईला हजरजबाबी उत्तर दिले. ""अगं माई! असे सांगून कविता करणारे ते कवी नाहीत आणि ज्यावेळी त्यांच्या मनात माझे बाबा रुजतील त्यावेळी ते नक्की एखादं गीत तयार करतील आणि वाट बघूया पुढे...'' असे म्हणून ती वेळ पुढे ढकलली. पण नियतीचा चमत्कार बघा, 

एका कोवळ्या जेमतेम 20 वर्षाच्या लेकीची (लतादीदी) आणि माईंची शब्दवाणी वयाच्या पस्तीशीतल्या तरुण बहरात असलेल्या कवी मनात रुजली आणि एका नवीन अक्षय गाण्याने जन्म घेतला. त्या नव्या गाण्याचा मुखडा दादांनी लता दीदीला फोनद्वारे ऐकविला तो असा होता. 

कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला 
वैभवानं बहरून आला, याल का हो बघायालां? 

पण फोनवरून शाब्दिक उत्तर न येता संपूर्ण विश्‍वाच्या गानकोकिळेच्या कोवळ्या मधुर कंठातून कनवाळूरूपी "हुंदका' ऐकू आला आणि नंतर नंतर एकदम ओक्‍साबोक्‍सी रडण्याचा आवाज दादांना ऐकायला मिळाला. दोनच ओळीमध्ये लता दीदींना आपल्या बाबांची संस्मरणीय गोड आठवण तर आणूनच दिली आणि त्याचबरोबर लता दीदींच्या समोर साक्षातः स्व. दीनानाथांना उभे केले. आपल्या बाबांना डोळ्यासमोर बघूनच गानकोकिळेच्या डोळ्यात "गंगा जमुना'च उभ्या राहिल्या. दादांनी तयार केलेल्या चमत्कारिक मुखड्यामुळेच गोड मधुर कंठातून हुंदका बाहेर पडला. यावरूनच दादांची विचारशक्ती, त्याचप्रमाणे त्यांच्या शब्दाची जडणघडण किती उच्च कोटीची होती याची कल्पनाच केलेली बरी. लतादीदींनी हुंदके देत देत "मला आता काही सुचत नाही आणि तुमचे गाणे तुम्ही पुढे चालू ठेवा', असा हिरवा कंदील दाखविला. अगदी दादांच्या कवी मनाला रुजेल आणि भिडेल असा संदेश गानकोकिळेच्या मधूर कंठातून निघाला आणि अगदी दादांना पण अशाच हिरव्या कंदिलाची गरज होती. 

दादांसारख्या प्रचंड प्रतिभाशक्ती लाभलेल्या मार्गदर्शक कवीला त्याचप्रमाणे सरस्वतीचे वरदान लाभलेल्या दादांना दीनानाथांच्या पुण्यतिथी दिनी पूर्ण गीत तयार करणे सहज शक्‍य झाले. आणि हा "एक दैवी चमत्कार' समजला तरी त्यामध्ये वावगे दिसण्याचे कारणच नाही. 

दादांनी "कल्पवृक्ष कन्येसाठी' हे गाणे दीनानाथ व माई मंगेशकरांचे कुटुंब अग्रस्थानी ठेवून केलेले आहे. शेतीप्रधान देशात लतादीदींचे कुटुंब असो किंवा इतर कोणतेही कुटुंब असो, मग ते शेतकरी असो, गरीब असो, भटके असो किंवा मध्यमवर्गीय असू द्या किंवा त्याच्याही पुढे जाऊन मी असे म्हणेन ते श्रीमंत किंवा अतिश्रीमंतसुद्धा असो; पण त्यातील नात्यांचे बंध, प्रेम, माया, ओढ आणि अगतिकता तेवढीच अनमोल, अक्षय आणि समतोल असते. अगदी हेच समतोल बंध दादांनी सन 1951 च्या एप्रिलमध्ये मनात रुजविले आणि एका चिरंजीव तसेच अक्षय गीताला जन्म दिला. विश्‍वातील कोणत्याही कन्येचा बाबा आणि तिच्या विवाहानंतर भविष्यात होणारा तिचा "सासरा' आताच्या आधुनिक रीतीरिवाजाप्रमाणे "बाबा अथवा पापा' याच व्यक्तिरेखा स्व. दीनानाथांच्या माध्यमातून साकारून दादांनी हे अक्षय गाणे तयार केलेले आहे किंवा असावे असे मला वाटते. अगदी हेच "बाप-लेकींचे' महत्त्वाचे मधूर बंध दादांच्या दूरदर्शीय व मार्गदर्शक नजरेने टिपलेले आहेत. 

कोणाच्याही घरी मुलीने जन्म घेतला तर "पहिली बेटी तुपात रोटी' तसेच "लक्ष्मीने घरी जन्म घेतला' असे अनेक सुविचार कानावर पडतात. निसर्गाच्या ऋतुचक्राप्रमाणे "लेकीवरच' बाबांचा लळा लागलेला असतो आणि घरोघरी हेच साम्य आपल्या निदर्शनास मिळेल. 

बाबा नेहमी लेकीचे कौतुक करत असतात आणि त्यांच्या तोंडात फक्त "माझी लेक' हेच दोन शब्द रुळलेले असतात. त्याचप्रमाणे माता "माझी लेक मोठी होणार' असे म्हणतात. मुळातच निसर्गाने "स्त्री' ह्या व्यक्तिरेखेला जन्मासोबतच सौंदर्य, कोमलता, प्रचंड सहनशक्ती बरोबरच प्रचंड गुणवत्ता आणि त्यागी वृत्ती बहाल केलेली आहे. पृथ्वी तलावर "स्त्री' ही एक अक्षय मानवी शक्ती आहे. मुली वयाच्या 20 ते 30 या कालावधीमध्ये आपले जन्मस्थान सोडून परक्‍या घरी संसारासाठी जातात आणि त्यानंतरच्या त्या सासरच्या घरचे भाग्य उजळवितात. जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीला जेमतेम 20 ते 30 वर्षेच फक्त स्वतःच्या जन्म घरी वास्तव्य मिळते याचे कारण सर्वश्रुत आहे हे म्हणजे निसर्ग नियमाप्रमाणे मुलीचा विवाह केला जातो. अगदी अनादी कालापासून मुलीला "परधन' मानले जाते. 

मुलीच्या लग्नाच्या बाबतीत "अंगणातील तुळस अंगणातच लावावी' याच गोड व अक्षय रूढीनुसार घरचे कुटुंबप्रमुख अर्थातच "बाबा' आपल्या कन्येचा विवाह एका साजेशा अंगणामध्ये तिला शोभेल असा जोडीदार बघून तिच्या संसाराची मोट बांधून ती तिच्या खांद्यावर ठेवून देतात. लग्नकार्याचा समारोप विधी म्हणून अगदी जड अंतःकरणाने "कन्यादानाचा' कार्यक्रम पार पाडतात. त्याच क्षणी मुलीची पाठवणी सासरच्या बाबांच्या घरी करतात. माहेरी रुजलेलं ते रोपटं सासरी पूर्वीच्या माहेरच्या संस्काराच्या जोरावर तसेच देखभालीवर व मशागतीवर मोठं होतं, बहरतं आणि त्याला फुले व फळे येतात. दोन्ही बाबांच्या घरचं वैभव बहरून येतं. बहुतांशी आपल्या कन्येचा बहरलेला संसार किंवा वैभव न्याहाळण्यास तिचे बाबा त्याचप्रमाणे आपल्या सुनेचा वैभवाने बहरलेला संसार बघण्यास तिचे नवीन बाबा किंवा पप्पा (सासरे) हजर असतीलच असे नाही. म्हणूनच विश्‍वातील प्रत्येक कन्या लता दीदींच्या रूपाने किंवा तिच्या माध्यमातून आणि अंतःकरणातूनच साद घालते. अहो बाबा ! तुमच्या पुण्याईतून बहरलेला वाडा पाहण्यास एकदा तरी या पृथ्वीतलावर या ! अगदी याच ओळी दादांनी गाण्याच्या रूपात मराठी रसिक जनासमोर एका अक्षय गीताद्वारे मांडलेल्या आहेत. 

"कल्पवृक्ष कन्येसाठा लावुनिया बाबा गेला...' 

कल्पवृक्ष म्हणजे इंद्रलोकांतील इच्छित वस्तू देणारा काल्पनिक वृक्ष. बाबा नेहमी आपल्या कन्येसाठी अगदी तिच्या जन्मापासून ते त्यांचे आयुष्य असेपर्यंत लेकीला खेळण्यासाठी भातुकलीची खेळणी, शाळेसाठी वह्या-पुस्तके, जेवणपाण्यासाठी भाजी भाकरी व अन्न धान्य, कपडेलत्ते, दागदागिने, साडीचोळी तसेच अनेक सौंदर्य वस्तू मिळेल त्या ठिकाणाहून खरेदी करतात आणि नैसर्गिक ऋतुचक्राप्रमाणे वर्षानुवर्षे येणाऱ्या प्रत्येक सणासुदीला त्या त्या वस्तू अगदी आनंदी अंतःकरणाने भेट देत असतात. घरी वंशाचा दिवा असला तरी दूर वास्तव्य असलेल्या कन्येचाच नेहमी ध्यास लागलेला असतो आणि तिचे खूपच आकर्षण असते त्याचप्रमाणे नेहमी लेकीचाच गोड व मधूर असा लळा जडलेला असतो. 

आपल्या मुलीची विवाहानंतर सासरी पाठवणी करताना पुरुषरुपी कठीण हृदयसुद्धा अगदी लोण्यासारखे मुलायम बनते आणि बाबांच्या डोळ्यातून "गंगा-जमुना' वाहू लागतात. विश्‍वातील प्रत्येक कन्येचे बाबा तिच्यासाठी "कल्पवृक्ष' असतात हे अगदी खरेच आहे. 

दादांचे ध्वनिमुद्रित झालेले गीत "कल्पवृक्ष कन्येसाठी' या शीर्षकाखाली झालेले आहे ते असे - 

कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला 
वैभवाने बहरून आला, याल का हो बघायला ।। धृ।। 
तुम्ही गेला आणिक, तुमच्या देवपन नावा आले 
सप्तस्वर्ग चाल येता, थोरपन तुमचे कळले 
गंगेकाठी घर हे आपुले, तीर्थक्षेत्र काशी झाले। 
तुम्हाविण शोभा नाही, वैभवाच्या देवळाला।।1।। 
सूर्य, चंद्र, तुमचे डोळे दुरूनीच हो बघतात 
कमी नाही आम्हा काही, कृपा दृष्टीची बरसात 
पाच बोटे अमृताची, पंचप्राण तुमचे त्यात 
पाठीवरती फिरवा हात, याल का हो बाबा एकच वेळा।।2।। 

दादांनी लिहिलेल्या मूळ गाण्यात तीन अंतरे होते, पण ध्वनिमुद्रिकेच्या वेळेच्या बंधनानुसार त्यातील मधला एक अंतरा गाळलेला आहे तो खाली देत आहे. 

तिन्ही सांजा येऊन मिळता, सांजवात लावत असता 
हात जोडलेले तुम्हा, माई सांगे तुम्ही गीता 
दुःख मित्र तुमचा प्यारा, आठवण देऊन जाता 
मिठी आईची ती कंठी, थांबेनात अश्रुमाला 
तुमच्याच मूर्तीला हो आम्ही घालू अश्रुमाला।।3।। 

मूळ गाण्यातील गाळलेल्या अंतऱ्यामध्ये दादांच्या गाण्यातील कन्येने अश्रूच्या माला आपल्या जन्मदात्या पित्याला अर्पण केलेल्या आहेत. मुलीच्या "अश्रूंना' फुलांची उपमा देणारा कवी खरोखरच क्षितिजापलीकडील असला पाहिजे. 

Email: mip@pioneerengineers.co.in 
mip-68@hotmail.com 

Web Title: Mahadev E Pandit article