पळसंबे – बोरबेट इतिहास पाऊलखुणा

मृदुला पाटील
Wednesday, 23 January 2019

कोल्हापुर ते गगनबावडा रोडवरील आसळज गावापासुन तीन ते चार किलोमीटरवर पळसंबे हद्दीत ओढ्याच्या पात्रात टुमदार लेणी पाहायला मिळतात. रोडवरून डावीकडील बाजुस  सह्याद्रीच्या कुशीत, गर्द वनराईत लपलेला हा ओढा आपल्याला आकर्षित करतॊ. 

कोल्हापुर ते गगनबावडा रोडवरील आसळज गावापासुन तीन ते चार किलोमीटरवर पळसंबे हद्दीत ओढ्याच्या पात्रात टुमदार लेणी पाहायला मिळतात. रोडवरून डावीकडील बाजुस  सह्याद्रीच्या कुशीत, गर्द वनराईत लपलेला हा ओढा आपल्याला आकर्षित करतॊ. 

लेण्याचे ठिकाण हे प्राचीन तात्कालिन व्यापारी मार्गाचा हा भाग असावा. या सर्व लेण्या जांभ्या दगडात कोरल्या आहेत. या लेण्या ऒढ्याच्या पात्राच्या वरील बाजुस असाव्यात परंतु कालांतराने  पात्राशेजारील दगडांचे सख्खलन होऊन ही लेणी पात्रात आली असावी. या लेण्यांमध्ये अर्धउठावातील स्तुप दिसुन येतात. या खडकांमधील तावदानांमध्ये वेदिका असणारे अर्धउठाव स्तुप सर्वत्र आढळतात. या प्रवाहाच्या वरच्याबाजुस छॊटे चैत्यगृह व विहार आढळते. या चैत्यगृहावरील छतावर इतर चैत्यगृहांची अर्धउठावातील प्रतिकृती (स्तुप व जाळीदार खिडक्या)आहेत. विहार व चैत्यगृहातील छत व तुळया आजही जुन्या वास्तुशिल्पाची प्रचिती देतात. विहारातील प्रकाशयोजना अतिशय नेटकी असुन चारही बाजुस दरवाजे असुन स्वच्छ व शांत सुर्यप्रकाश येथे नियमीत प्रकाशीत करतॊ. सकाळ असो वा दुपार इथे प्रकाश नियमीतच असतो. तो प्रखर ही नसतो किंवा कमी ही नसतो. विहारात तसेच चैत्यगृह येथे पावसाचे पाणी आत येऊ नये, याकरिता प्रत्येक दरवाजा समोर खांबांची रचना आहे. येथील लेण्याचे छत गजपृष्ठाकार असुन त्यामुळे पावसाळ्यात छतावरुन वाहणारे पाणी सहज वाहुन जाते; त्यामुळे पाण्याचा प्रवाह बोथट होऊन वास्तुची कमी प्रमाणात हानी होते.

येथे ठिकठिकाणी पोडी (पाण्याचे कुंड) दिसतात. लेणी कोरत असताना खडकातील पाण्याची पातळी समतल राहुन नियमीत  स्वच्छ पाण्याचा पुरवठा होण्याच्या दृष्टीने या पोडी दिसुन येतात. काही पोडी या  विहाराच्या आजुबाजुच्या खडकात दिसतात. यावरुन हे खडक पुर्वी एकसंघ होते, नंतर विभक्त झाल्याचे दिसतात.

पळसंबे येथुन काही अंतर गेल्यानंतर बोरबेट गावाच्या टोकाशी असणाऱ्या डोंगरावर चढाई करुन वर गेल्यास आपण बोरबेट पठारावर पोहोचतॊ. या पठारावर हिनयान पद्धतीची लेणी आहे. सध्या येथे मोरजाई देवीचे मंदीर आहे. येथे अनेक वीरगळी, सती शिळा आहेत..या लेण्यापर्यंत पठारावरुन जात असता तीन दगडी चौकटी लागतात. येथे दरवाजा किंवा तटबंदीचे अवशेष अस्तित्वात नाहीत मात्र या चौकटी मात्र दिमाखात उभ्या आहेत. लेण्याच्या प्रवेशद्वाराजवळ दिपमाळ तसेच दगडी समाध्या इतिहासाचे साक्षीदार उन वारा सहन करत उभी आहेत. येथे अनेक दगड अस्ताव्यस्त पसरले आहेत. त्यावरुन ते तटबंदीचे दगड असावेत, असे निदर्शनास येते. 

इ. स. पुर्व दुसऱ्या शतकात सातवाहन काळात बौद्ध भिक्षुक, सार्थवाहक यांनी स्थानिक आदिवासीचे (स्थानिक लोकांचे) नागरीकरणाचे प्रयत्न केले. व्यापारीदृष्टीने  त्यांना ज्ञान दिलेः पळसंबा हे पळस व आंब्यापासुन रेशमी कापडाकरिता केशरी रंग बनविण्याचे व निर्यात करण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्या अनुशंगाने पळसंबे कदाचित चिंतनाचे व बोरबेट हे व्यापारी ठिकाण असण्याची शक्यता आहे. या दोन्ही लेण्या कोकणात आढळणाऱ्या इतर लेण्याप्रमाणे कडा ठाणाळे/ पन्हाळे काजी प्रमाणे साधे आहे. हे निर्मनुष्य ठिकाण मनाला शांतता प्रदान करते तसेच हिनयान इतिहासात आपल्याला डोकावयाला लावते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mrudula Patil writes in Citizen Journalism