माझी परसबाग ; पुण्यातील टेरेसवर तब्बल १३० झाडे ; पहा कशी बहरलीये परसबाग

जितेंद्र मैड
Saturday, 25 April 2020

पुणे ः लाॅकडाउनमध्ये वेळ कसा घालवायचा असा प्रश्न सर्वांना पडला असेल. प्रत्येकजण आपआपल्या परिने हा वेळ घालवत आहेत. कोथरूडमधील अशोक आगरकर यांनी टेरेसवर परसबाग फुलवली आहे. त्यांनी विविध फुलांची आणि शोभेची १३० झाडे लावली आहे. आणि सध्याचा वेळ ते  झाडांच्या सानिध्यात घालवत आहेत.  

घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध दरवळायला हवा. बालपणापासूनच मला फुलझाडांचे वेड होते. त्यावर बागडणारी फुलपाखरे, छोटे पक्षी माझ्या मनाला प्रसन्न करतात. कोथरुड येथील आझादनगरमध्ये राहणारे अशोक आगरकर सांगत होते. 
आगरकर यांनी टेरेसवर तब्बल १३० विविध फुलांची, शोभेची झाडे लावली आहेत. बेल, तुळस, जाई, जुई, मोगरा, गुलाबाच्या सुवासाने टेरेस दरवळत आहे. 

लॉकडाउन असल्यामुळे नातवंडे घरीच आहेत. वनस्पती शास्र, जीव शास्र, शेती शास्र अशा विषयांची हसत खेळत त्यांना ओळख करुन द्यायची संधी त्यानिमित्ताने मला मिळाली. तसेच झाडे कशी लावतात, त्यांची निगा कशी राखतात, त्यांची छाटणी कशी व केव्हा करायची, पाणी कसे द्यावे, खत कसे बनवायचे आदींचे शिक्षण सुरु असल्याचे आगरकर यांनी सांगितले. 

 
बाग फुलवताना घ्या अशी काळजी 

1. कुंडी प्लॅस्टिकची घेण्याऐवजी मातीची असावी. 
2. प्रथम कुंडीमध्ये नारळाच्या शेंड्या टाकाव्यात. नंतर माती टाकावी. रोपाची मुळे दुखावणार नाही अशा पध्दतीने त्यापासून प्लॅस्टिक विलग करावे. हळुवारपणे रोपटे कुंडीत ठेवावे. परत आजूबाजुने माती टाकावी. थोडे पाणी टाकावे.  
3. दिवसातून दोनवेळा विशेषतः सकाळी व संध्याकाळी पाणी द्यावे. 
4. गुलाब वा इतर फुलांसाठी सेंद्रिय खत मिळाले तर उत्तम. 

5. टेरेसवर छोट्या ड्रममध्ये पालापाचोळा साठवून त्याचेही खत बनवता येते. टेरेसही स्वच्छ राहते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: my terrace garden ; ashok aagrkar has created a nice garden on terrace