इको सेन्सिटिव्ह झोन काय खरे - काय खोटे ?

पंकज दळवी
Thursday, 10 January 2019

इको सेन्सिटिव्ह झोनबाबत दोडामार्गात अनेक संभ्रम व वादंग सध्या निर्माण झाले आहेत. निरंतर कोकण कृती समितीमार्फत यावर सविस्तरपणे पत्रकाद्वारे व शासकीय अधिकाऱ्यांच्या मुलाखती मधून संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. ​

इको सेन्सिटिव्ह झोनबाबत दोडामार्गात अनेक संभ्रम व वादंग सध्या निर्माण झाले आहेत. निरंतर कोकण कृती समितीमार्फत यावर सविस्तरपणे पत्रकाद्वारे व शासकीय अधिकाऱ्यांच्या मुलाखती मधून संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करत आहे.

दोडामार्ग तालुका सर्वांत जास्त वनक्षेत्राने आच्छादित तालुका असताना देखिल इको सेन्सेटिव्ह भागांत संरक्षित करण्यात आला नव्हता. यामागे केरळीयन रबर लॉबी - गोवा मायनिंग लॉबी व  लाकूडतोड व्यापारी लॉबी अशांचे लागेसंबंध असावेत, पण याविरुद्ध हायकोर्टाने आदेश काढला व इको सेन्सेटिव्ह म्हणून तालुका संरक्षित झाला.

दोडामार्ग, वेंगुर्ला, सावंतवाडी या तालुक्यांवर मँगेनीज, आयर्न, बॉक्साईड आदी खाणकामांचा धोका आहे. सुमारे ५४ गावात तसे नोटिफिकेशन ही निघाले होते. इको सेन्सिटिव्ह झोन होण्याबाबत आणि विरुद्ध भूमिका काही नागरीक व काही लोकप्रतिनिधी संघटना यांनी घेतलीय, यामुळे अजून संभ्रमात लोक पडत आहेत. म्हणूनच ३ ऑक्टोबर २०१८ च्या इको सेन्सिटिव्ह बाबतच्या  शासकीय राजपत्राच्यानुसार आणि महाबळेश्वर -पाचगणी येथील इको-सेनिसिटीव्ह अध्यादेशानुसार- काय सत्य आहे ते सांगण्यासाठी हा लेख प्रपंच

१) शासनाच्या अधिकृत परवानगी शिवाय जमिन उत्खनन, खाण उत्खनन करता येणार नाही त्यामूळे डोंगर पोखरणे, मायनिंग, क्रशर सारखे विघातक प्रकल्प करता येणार नाहीत. गौण खनिज म्हणजे चिरे खाणी सुरू राहतील. (फायदा-परिणाम: साहजिकच असनिये, साटेली ,भेडशी, कळणे, रेडी यासारख्या गावांची मायनिंगमुळे झालेली दुर्दशा इतर गावंची होणार नाही. जंगलतोड वाचेल जंगलीप्राण्यांना अभय मिळेल जैवविविधतेचा र्‍हास होण्यापासून सुटका मिळेल निसर्गचक्र सुरळीत चालेल.)

२) झोनमध्ये येणार्‍या भागात वाळू उत्खनन करता येणार नाही (फायदा-परिणाम: अवैधरीत्या वाळू उत्खननामूळे होणार्‍या नदीच्या वाढत्या पात्रामूळे नदीलगतच्या शेतीची  लोकांच्या जमिनीची होणारी धूव वाचेल. तसेच अचानक येणारे महापूरही थांबतील). स्थानिक गरजेपुरते परवानगी घेऊन गौण खनिज काढता येते.

३) नियमबाह्य जंगलतोड करता येणार नाही (फायदा-परिणाम: दोडामार्ग सारख्या भागात केरळीयन लोकांची चाललेली दादागिरी, अवैध धंदे, जमिनीचे होणारे अवैध खरेदीविक्री च्या काळ्याबाजाराला रोख लागेल, रबरासाठी नियमबाह्य केली जाणारी बेसुमार जंगल तोडीला चाप बसेल).

४) रेड कॅटेगरीमधील प्रकल्पउद्योग - जैवविविधतेला बाधा आणणारे प्रकल्प उभारता येणार नाहीत (फायदा - परिणाम: साहजीकच लोकांच्या जमिनी सुरक्षित राहतील).

५) औष्णिक प्रकल्प आणता येणार नाहीत, जलविद्युत प्रकल्प पर्यावरण परिणाम मूल्यांकनाने बनू शकतील.
 
६) २०,००० स्केअर मीटरपर्यंत बांधकाम करू शकतो.५० हेक्टरपर्यंत एरिया डेव्हलपमेंट १,५०,००० स्केअर मीटरपर्यँत बांधकाम होऊ शकते.

७) नवीन घर बांधता येऊ शकेल, घराची दुरुस्ती/नवीन वाढीव बांधकाम ही होऊ शकते. मालमत्तेच्या मालकीमध्ये बदल करता येईल.

८) प्रदूषणविरहीत उद्योग, बूट-चपला, रेडिमेड लेदर उद्योग, हॉर्टीकल्चर,फ्लोरिकल्चर(ग्रीन हाउस), कृषी आधारीत उद्योग, लघुउद्योग यांना परवानगी असेल. नगरपालिका - नगरपंचायत विभाग सोडल्यास मोठे डेअरी, कुक्कुटपालन, अळंबी उत्पादन आणि निसर्गपुरक उद्योग प्रकल्प चालतील.(फायदा-परिणाम- स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती होईल)

९) नवीन पर्यटन प्रकल्प झोनल मास्टर प्लॅन अनुसरून राबवता येतील, असे प्लॅन इको सेन्सिटिव्ह विभागाच्या क्षेत्राच्या क्षमतेवर अवलंबून असतील व त्यांना राज्य शासनाच्या पर्यवारण व वन मंत्रालयालाकडून परवानगी लागेल.(फायदा:परिणाम-परप्रांतीयांच्या वसाहती नवीन निर्माण होणार नाहीत)

१०)  नैसर्गीक वारसा: या झोनमुळे नैसर्गिक वारसा म्हणून मिळालेली, जंगल, कातळशिल्प, हजारो वर्षांच्या निसर्गाच्या उलथापालथीमुळे निर्माण झालेली रॉक फॉर्मेशन, धबधबे, लेणी यांची अभ्यास सहल, जंगल सफारी आयोजीत करून नैसर्गिक बदलांमुळे त्यांच्या संरक्षण-संवर्धनासाठी योजना इको सेन्सिटिव्ह झोनच्या क्षेत्रीय मास्टर प्लॅनमध्ये समाविष्ट केल्या जातील. अशा परिसरात पर्यटन विकास बांधकामासाठी-उपक्रमांसाठी राज्य सरकारद्वारे मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात येतील.( फायदा-परिणाम: पर्यटन परिसर विद्रुप होणार नाही)

महाराष्ट्रातील महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान यांसारख्या पर्यटन स्थळांच्या यादीत दोडामार्ग समाविष्ट केला जातोय, त्यामुळे बायो डायव्हर्सिटी हॉट स्पॉट म्हणून पर्यटक व निसर्ग अभ्यासकांचा ओघ वाढेल, याचा अभिमान वाटायला हवा 

( लेखक निरंतर कोकण कृती समितीचे अध्यक्ष आहेत)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pankaj Dalvi writes in Citizen Journalism