वैयक्तिक माहितीच सरकारी कार्यालयात चव्हाट्यावर 

अजित नाडगीर 
Wednesday, 7 November 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

हडपसर : हल्ली खासगी माहितीचा गैरवापर करून आर्थिक फसवणुकीचे प्रकार होत असतात. खरंतर यात कितीही काळजी घेतली, तरी संधिसाधू लोक फायदा घेतात. लोकांची बॅंक खात्याची माहिती घेण्यासाठी ही मंडळी फिशिंग मेल पाठवतात, कधी जन्मतारीख, तर कधी पत्ता, दूरध्वनी, भ्रमणध्वनी यांची माहिती काढून घेतात. जेवढी माहिती जास्त तेवढं आर्थिक गैरकारभार करणाऱ्यांची ताकद वाढते. पण, एखाद्याची इत्थंभुत माहितीच चव्हाट्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी लावली असेल, तर त्याचा किती गैरवापर होऊ शकतो. 

असाच प्रकार हडपसर टपाल कार्यालयात चालू आहे. बचत खाते उघडण्यासाठी अर्ज कसा भरावा, याचा नमुना अर्ज लावला आहे. पण येथे अर्ज चक्क एका बचत खातेदाराने दिलेला अर्ज नमुना म्हणून लावला आहे. त्या व्यक्तीची सर्व महत्त्वपूर्ण माहिती सार्वजनिक केली आहे. ही माहिती सार्वजनिकरीत्या मांडण्यापूर्वी त्या व्यक्तीची संमती घेतली होती का? सरकारी कार्यालयातच संमतीविना वैयक्तिक माहिती अशी सार्वजनिक केली जात आहे. असेच प्रकार जर सर्व कार्यालयात घडत असतील, तर ही चिंताजनक स्थिती आहे. नमुना अर्ज फक्त उदाहरण म्हणून असतो. त्यामुळे नमुना अर्ज दाखवताना नाव (अ ब क), दूरध्वनी/भ्रमणध्वनी (12345), पॅन कार्ड क्रं, (PAN12345) इत्यादी स्वरूपात दाखवू शकता. नाव, गाव, पत्ता, आधार, पॅन ही कुठलीही माहिती सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करू नये. तरी संबंधित प्रशासनाने याची दखल घेऊन तातडीने कारवाई करावी. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Personal information in the government office