esakal | श्रावणसरी... 
sakal

बोलून बातमी शोधा

sandhya.jpg


"श्रावण' या एकाच शब्दानं मन हे आठवणी, संवेदना, भावना व अनुभव असं अनेक अंगांनी प्रफुल्लित होतं. 
श्रावण जितका हसरा तितकाच संयमी व तपस्वी. निसर्गाबरोबर आपणही मनोमन मोहरून उठतो आणि बांधून घेतो स्वतःलाच आपल्या संस्कृतीशी आणि पर्यायानं श्रावणाशी. 

श्रावणसरी... 

sakal_logo
By
- संध्या गावित, पुणे ---------------------

"श्रावण' या एकाच शब्दानं मन हे आठवणी, संवेदना, भावना व अनुभव असं अनेक अंगांनी प्रफुल्लित होतं. 
श्रावण जितका हसरा तितकाच संयमी व तपस्वी. निसर्गाबरोबर आपणही मनोमन मोहरून उठतो आणि बांधून घेतो स्वतःलाच आपल्या संस्कृतीशी आणि पर्यायानं श्रावणाशी. 


प्रत्येक ऋतूचं स्वतःचं असं एक खास वैशिष्ट्य असतं, एक वैभव असतं. पावसाळा सुरू झाला की जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे निसर्गाचं रूप पालटून जातं. डोंगरदऱ्यांतून हिरव्या छटा डोकावू लागतात. नुकत्याच सरलेल्या पावसानं चिंब भिजलेली पहाट, स्वच्छ झालेले रस्ते, घरं, झाडं, वेली, डोंगर उतारावर विविध रंगांच्या फुलांचा अंथरलेला गालिचा, गच्च हिरवे वळणदार घाट, हिरव्या गर्द डोंगर कपारीतून उसळणारे धबधबे नवचैतन्याची आणि श्रावण आल्याची ग्वाही देत असतो. "ऋतू हिरवा, ऋतू बरवा, पाचूचा मनी रुजवा' असे गुणगुणत आपणही निसर्गाच्या मैफलीकडं ओढले जातो. 

- श्रावण म्हणजे आनंदाचा खजिना, श्रावण म्हणजे निसर्गाचं सुंदर दर्शन. श्रावण म्हणजे फुलांचा रंगोत्सव. असा हा पाकळी पाकळीनं उमलणारा श्रावण जणू सौंदर्याचं लेणं घेऊनच अवतरतो. श्रावणातला रंग, गंध अनेकांना धुंद करतो. मृगाने पेरलेलं, आषाढानं पोसलेलं निसर्गधन श्रावणात हसू खेळू लागतं. सृष्टी जणू कूस बदलते. केवळ सृष्टीच नव्हे, तर या सृष्टीचं प्रतिरूप असलेली स्त्रीही श्रावणात उत्साहानं बहरलेली, सजलेली असते. आपल्या पूर्वजांनी निसर्गाचं महत्त्व जाणून सर्व पारंपरिक सणवार, पर्यावरण, निसर्ग संरक्षण, मानवी स्वास्थ्य आणि आरोग्य यांचा सुरेख संगम साधला आहे. श्रावणातले सारेच सण उत्साहाचे, व्रतवैकल्याचे आणि त्याला जोड असते नैसर्गिक सौंदर्याची. या महिन्यात श्रावणी सोमवार, शनिवार, मंगळागौर, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, कृष्णजन्माष्टमी, सत्यनारायण पूजा अशी रेलचेल असते. प्रत्येक सणाची कहाणी निराळी, व्रते वेगळी आणि त्याची फलश्रृतीही निराळीच. हे सारे सण, व्रतवैकल्ये निसर्गातील प्रत्येक घटकावर प्रेम करायला शिकवतात, त्यांचा आदर करायला शिकवितात. सणांच्या निमित्तानं पूर्वजांचं स्मरण केलं जातं. वाडवडिलांनी जोपासलेला कुळधर्म-कुळाचार पाळला जातो आणि सभोवतालचं वातावरण आनंदमय होऊन जातं. 
सण-उत्सव हे लोकांना एकत्र आणण्यासाठी, त्यांच्यात सहभावना निर्माण करण्यासाठी, रुजवण्यासाठी एक उत्तम माध्यम असतं, परंतु आजच्या वेगवान आयुष्यात प्रत्येकजण आपल्याच विश्‍वात गुंग असतो. त्यामुळे संवाद हरवला आहे, एकोपा नष्ट झाला आहे. एकत्र राहूनही नात्यामध्ये दरी निर्माण झाली आहे. पूर्वीसारखा श्रावण आता उरलाय कुठं? बांगड्या भरणं नाही, मेंदी काढणं नाही, पत्री-फुलं गोळा करणं नाही, मंदिरात जाणं नाही, एकमेकांकडं जाणं-येणं नाही. कारण हे सर्व करायला वेळच नाही. हिरव्याकंच श्रावणाचं चित्रच आता बदलत आहे. स्वार्थापोटी झाडे पाडली जात आहेत. जिकडं तिकडं कॉंक्रिटची जंगलं वाढली आहेत. मनातली श्रावणशीळ अबोल झाली. गरज आहे पर्यावरण संरक्षणाची. म्हणूनच मनाची कवाडं उघडून एकमेकांसाठी वेळ देऊया, एकोप्यानं सण-उत्सव साजरे करूयात. निसर्ग बहरला तर पुन्हा मनामनांत श्रावण बहरेल.