चिमण्या माझ्या सख्या 

शुभांगी दीपक खटावकर
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

चिमण्यांच्या संख्येत वाढ झाली पाहिजे व त्यांची व्यवस्था झाली पाहिजे यासाठी एक वेगळा प्रयत्न सुरू केला आणि पाहता पाहता त्याला एक छान रूप आलं. मूठभर तांदूळ घेऊन सुरू झालेल्या या प्रवासाने माझे आणि चिमण्यांचे एक आगळे-वेगळे नाते तयार झाले. रोज येऊन मला भेटणाऱ्या त्या 25-30 चिमण्या माझ्या सख्याच बनल्या. 

माझे माहेर कऱ्हाडचे. लग्न होईपर्यंतचे आयुष्य अपार्टमेंटमध्येच गेले. त्यामुळे तेथे चिमण्या अगदी क्वचित पाहायला मिळत. पक्षी आणि चिमण्या पाहण्यासाठी बाहेर फिरायला तरी जावे लागे किंवा प्रीती संगमावरील बागेत तरी जावे लागे. लग्न होऊन विट्यात आले. सासरचे घर ऐसपैस. तेथे अंगणात वेगवेगळी झाडे लावलेली आणि जपलेली. त्यामध्ये नारळ, चिक्कू, आंबा आणि इतर फुलझाडे. मी येथे आले आणि या निसर्गात रमून गेले.

हळूहळू येथील बाग फुलत गेली आणि मीही या घराशी समरस झाले. अंगणातील चिकूचे झाड मोठे झाले. त्याच्या खालीच तुळशी वृंदावन. रोज तुळशीला नमस्कार करताना कधी-मधी एखादी चिमणी चिवचिवत येऊन बसलेली दिसे. तुळशीला वाहिलेल्या अक्षता टिपताना दिसल्या. वर्षभरापूर्वी मनात कल्पना आली, या चिमणीसाठी आपणच मूठभर तांदूळ ठेवले तर... मनात आलेला विचार तातडीने अमलात आणण्यास सुरुवात केली.

 

सुरुवातीला दोन-तीन चिमण्या येऊ लागल्या. तांदूळ खाताना त्यांचा चिवचिवाट वाढू लागला. त्यांचा आवाज सवयीचा आणि आवडीचा बनला. मग हळूहळू चिमण्यांना तांदूळ ठेवण्याचा नित्यक्रम झाला. वर्षभरात चिमण्यांची संख्याही वाढू लागली. येणाऱ्या चिमण्यांना आमच्या कुटुंबाबद्दल विश्‍वास वाटू लागला. त्यांची संख्या वाढू लागली. घराचं अंगण खेळतं राहू लागलं. चिमण्यांसाठी चार प्लेट तांदूळ भरून ठेवण्यास सुरुवात केली. दिवसभरात चिमण्या येतात आणि उदरभरण करतात. 

येणाऱ्या चिमण्यांध्ये तपकिरी, काळ्या, पिवळ्या रंगाच्या आहेत. यामध्ये आता सुगरण पक्ष्याचीही भर पडली आहे. त्यांच्या चिवचिवाटाने दिवसाची सुरुवात होते आणि समाधान लाभते. त्या चिमण्यांना चिवा, चिऊताई अशा हाका मारताना माझ्या सख्याच मला भेटत असल्याचा आनंद मिळतो. एखादे दिवशी तांदूळ ठेवण्यास वेळ झाला तर काही चिमण्या स्वयंपाकघराच्या खिडकीत येऊन जणू सांगतातच, "प्लेटमधील तांदूळ संपलेत... आम्हाला भूक लागली आहे.' मी, माझे यजमान, सासू-सासरे, दोन मुले या आमच्या कुटुंबाचा या माझ्या सख्या अविभाज्य भागच बनलेल्या आहेत. "पशु-पक्षी गुणवंत, त्यास कृपा करती भगवंत' याचा अनुभव मला मिळू लागला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shubhangi Khatavkar writes in Esakal Citizen Journalism