तंदुरुस्त रहा आणि सणांचा मनमुराद आनंद लुटा !

सर्वेश शशी
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

पुणे : सणासुदीचे व उत्सवाचे दिवस जवळ येऊन ठेपले आहेत आणि आता जल्लोष व आनंदाचा काळ सुरु होत आहे. गोडधोड पदार्थ आणि जिभेचे चोचले पुरविणारे पदार्थ यांच्याशिवाय कोणताही सण-उत्सव अपुराच असतो. या कालावधीत तुमच्यासमोर वाढून ठेवलेल्या मेजवानीकडे दुर्लक्ष करणे, तिचा आस्वाद न घेणे हे अक्षरशः अशक्यप्राय असते. तथापि, स्वतःवर थोडेसे नियंत्रण ठेवून, तुम्ही अतिरिक्त कॅलरीज टाळू शकता. कसे? त्याच्या या काही टिप्स:

पुणे : सणासुदीचे व उत्सवाचे दिवस जवळ येऊन ठेपले आहेत आणि आता जल्लोष व आनंदाचा काळ सुरु होत आहे. गोडधोड पदार्थ आणि जिभेचे चोचले पुरविणारे पदार्थ यांच्याशिवाय कोणताही सण-उत्सव अपुराच असतो. या कालावधीत तुमच्यासमोर वाढून ठेवलेल्या मेजवानीकडे दुर्लक्ष करणे, तिचा आस्वाद न घेणे हे अक्षरशः अशक्यप्राय असते. तथापि, स्वतःवर थोडेसे नियंत्रण ठेवून, तुम्ही अतिरिक्त कॅलरीज टाळू शकता. कसे? त्याच्या या काही टिप्स:

जेवण कधीही टाळू नका :
कॅलरीचा अतिरीक्त भार होण्यापासून स्वतःला वाचवायचे असेल, तर,जेवण कधीही टाळू नका. दोन खाण्याच्या मध्ये खूप मोठे अंतर पडू देऊ नका. थोड्या थोड्या वेळाने थोडं थोडं खात राहा. यामुळे शरीराची चयापचय क्रिया व्यवस्थित सुरु राहते आणि भूक ही कायम काठावरच रोखली जाते. सर्वात महत्वाचे म्हणजे थोडं थोडं खा. रात्रीच्या जेवणात हलका आहार घेणेच इष्ट.

जर रात्री उशिरापर्यंत जागरण होणार असेल आणि पार्टी असेल, तर रात्रीचं भोजन – शक्यतो हलका आहार घेतल्याशिवाय घरातून बाहेर पडू नका. यामुळे बाहेर गेल्यानंतर उत्सव साजरा करताना जादाच्या कॅलरी पोटात जाण्यापासून स्वतःला रोखण्यात तुम्हाला मदत होईलच, शिवाय अतिरिक्त खाणे देखील टाळले जाईल.

पुरेसे पाणी प्या:
कोणताही आहार घेण्याआधी एक ग्लासभर पाणी प्या. यामुळे शरीरातील आर्द्रता टिकून राहण्यास मदत होईल. पाणी प्यायल्यामुळे तुमच्या खाण्याच्या इच्छेवर अंकुश राखला जातो, ही वस्तुस्थिती आहे.

फळे आणि भाज्या यांचे सेवन करा :
फळांची डिश हा वजन व्यवस्थित राखण्याचा सर्वोत्तम पर्याय आहे. यांच्या सेवनामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात, शिवाय फळांमधील विषारी द्रव्य प्रतिबंधक घातक कॉलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यातही सहाय्यभूत ठरतात.

अतीगोड पदार्थांपासून कटाक्षाने लांब राहा :
कर्बोदकांनी ओसंडून जाणारे पदार्थ हे शरीराचे खरे शत्रू असतात. त्यांच्यापासून कटाक्षाने चार हात लांब राहा. वजन वाढण्यासाठी हेच पदार्थ सर्वाधिक कारणीभूत असतात. सर्व प्रकारचे केक, पेस्ट्रीज, मिठाई व जंक फूड जे तुम्हाला अगदी हवेहवेसे, खावेसे वाटतात आणि तेच खरे धोकादायक असतात. तुम्ही हे पदार्थ खा. परंतु मर्यादित प्रमाणात. उकडलेल्या भाज्या, शेंगदाणे इत्यादी पदार्थ कमी कॅलरीवाले तर असतातच शिवाय त्यांच्यात आरोग्यदायी जीवनसत्व देखील असते. त्यामुळे त्यांचे सेवन आहारात अधिक करा. यामुळे तुमची ऊर्जेची पातळी वाढेल आणि तुम्हाला कसल्याही बंधन व अडसराशिवाय सणासुदीचा आनंद लुटता येईल.

सणासुदीच्या दिवसातील जेवण हे जणूकाही आपले आयुष्यातील शेवटचे भोजन आहे, अशा पद्धतीने खाऊ नका. उलट जर विचारपूर्वक त्याचे सेवन केले, तर अनावश्यक कॅलरीपासून दूर राहालच, शिवाय जिभेच्या आस्वादाला देखील कुठेही कमतरता येणार नाही.

तंदुरुस्त रहा आणि सणांचा मनमुराद आनंद लुटा!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stay fit and enjoy the celebration of festivals!