काखेत कळसा आणि गावाला वळसा.. 

काखेत कळसा आणि गावाला वळसा.. 

कुणीच कुणाच्या जवळ नाही, असे सगळे म्हणतात. त्यावर एकटेपणाने वाईटही वाटून घेतात, पण आधी कुणी जवळ जायचे या विचारानेच थांबतात. पहले आप, पहले आप करत गाडी सुटते. खरे तर आपल्या संस्कृतीत सगळे सणवार, हळदीकुंकू वगैरे जे आपल्या पुर्वजांनी लावून ठेवले आहेत. ते याच एकत्र येण्याच्या विचाराने. कारण या निमित्ताने भाऊ, बहीण, काका, मामा, चुलत मावस मंडळी एकत्र जमावी. एकत्र बसलो बोललो की गप्पा मध्ये सहजच घरातले आॅफिसचे, शेजार पाजारचे विषय होतात. ओघाओघाने मन मोकळं होत. बरेचदा साध्या बोलण्यातही आपल्याला आपल्या मनातल्या समस्यांची प्रश्नांची उत्तरे मिळतात. 

आजकाल देवाधर्माचे काही करायचे म्हटले की, काय ही एक कटकट असे मुलामुलींचे म्हणणे असते. त्यात थोडेफार तथ्य आहे सुद्धा. कारण सोवळे ओवळे, रिती रिवाजांचे अवडंबर फार प्रमाणात असते. मग नवीन पिढी ते काहीच करण्यास तयार होत नाही. त्यापेक्षा थोडा बदल करून तीच गोष्ट केली तर त्यांना ते रुचते. मग ते त्याकडे एक इव्हेंट म्हणुन बघतात व त्यातला आनंद घेतात. त्या कार्यात सामिल होतात. 

म्हणुनच की काय आजकाल लग्न कार्य वगैरेला आधल्या दिवशी संगीत रजनी सारखे कार्यक्रम हमखास असतात. लग्नातही मुले, मुली आनंदाने ठरवुन नऊवारी सारखे ड्रेस परिधान करतात. पुर्वी देखिल त्या काळाप्रमाणे मुहूर्तावर गाणी, हळद लावतांना गाणी तसेच लग्नातली विहिण वगैरे प्रकार म्हणजे यातलाच प्रकार होता. शेवटी भावना पोचणे महत्त्वाचे. 
आता सगळे आपआपल्या व्यापात असतात. पण केव्हातरी सुट्टी घेतो ती अशा सणवारी किंवा लग्न समारंभाला वगैरे घेतली तर त्या निमित्ताने सगळ्या नातेवाईकांना एकाच वेळी भेटणे होतेच. त्यातुन जवळिक निर्माण होते. ती घट्ट होते. शिवाय जिथे जातो तिथले आसपास फिरून एका पर्यटनाचा आनंद देखील घेऊ शकतो. 

कुणाच्याही आनंदात, दुखाःत आपण सहभागी झालो तरच कुणी आपल्या वेळ प्रसंगी येतील. शक्य ती मदतही होईल. सुरवात कोण करेल म्हणुन थांबु नका. एक पाऊल तुम्ही पुढे टाका बघा अनेक पावले तुमच्या दिशेने येतांना दिसतील. शेवटी माणुस हा प्राणी एकटा राहू शकत नाही. त्याला समुह लागतोच. तुम्ही बाहेर जातांना छान नटून सजून जाता. कुणीतरी त्यावर छान बोलले की कसे छान वाटते ना? नाहीतर घरात दागदागिने घालून सजुन बसुन रहा. बघा काही मजा वाटते का? तर मग आता ठरवा मित्रमैत्रिणीं नातेवाईक यांच्याकडे छोटा सोहळा असेल तरी जावुन त्यांचा आनंद तर वाढवायचा पण त्यातही आनंद लुटायचा. ते क्षण सोबत घेऊन आल्यावर दुसऱ्या दिवशी पुन्हा होणाऱ्या धावपळीला दुप्पट बळ मिळते की नाही बघाच. या समारंभांना वेगळ्या दृष्टीने बघा.

एकमेकांना भेटण्याची संधी म्हणुन. एकमेकांशी मोकळेपणी बोलल्यावर वेगळे समुपदेशनाला जाण्याची गरज उरणार नाही. आणि मुख्य म्हणजे आपले कुणी नाही असे वाटणार नाही. तुमच्या जवळ तुमची खुप माणसे आहेत पण तुम्ही शोध मात्र भलत्याच दिशेला घेतलात तर ती सापडणार तरी कशी? 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com