मैत्री : अर्धशतकाची ! 

t.jpg
t.jpg

एका निवांत संध्याकाळी शांतपणे बसले असता मन आठवणींच्या भूतकाळात कधी मागे गेले ते कळलेच नाही. मागे वळून पाहता एखाद्या चित्रपटासारख्या सर्व आठवणी डोळ्यांसमोर तरळू लागल्या. तो काळ, आपल्या मैत्रिणी, ओढवलेले सुख-दुःखाचे प्रसंग सारं काही भरभर आठवू लागलं आणि मध्यरात्र केव्हा सरली हे कळलही नाही. मग या आठवणी लिहायचं ठरवलं. 
1970 ते 74 या काळात किर्लोस्कर बेअरिंग डिव्हिजन महिला उद्योग लिमिटेड या कंपनीत नोकरीला लागले. पगार 60 रुपये. गरजू, विधवा, घटस्फोटित अशा महिलांना त्या काळात यमुताई किर्लोस्करांनी फार मोठा मदतीचा हात दिला व महिलांना सक्षमपणे स्वतःच्या पायावर उभे केले. त्यांना त्यांच्या आयुष्याची ओळख करून दिली. इंडस्ट्रीमध्ये प्रथमच महिला दोन पाळ्यांमध्ये काम करू लागल्या. काम अत्यंत वेगळ्या स्वरूपाचं होतं. जीवनातील एक आव्हान आम्ही स्वीकारलं व नव्या आयुष्याला सुरुवात केली. मग सर्व आयुष्य ताठ मानेने, कतृत्वाने जगलो. नंतर कुमारिकांची ही भरती कंपनीत झाली. सर्व वयोगटांतील महिला एकदिलाने काम करू लागलो. हळूहळू एकमेकींना आपली सुख-दुःखेही सांगू लागलो. आम्ही 250 महिला काम करीत होतो. प्रत्येकीचं दुःख वेगळं होतं; पण त्यातून खूप शिकायला मिळालं. जगाचे टक्के टोणपे कळले. नवनवे अनुभव आले. भीती विसरूनच गेलो आणि एकमेकींच्या मैत्रीत एकरूप झालो. मैत्रीची ही गुंफण इतकी घट्ट विणली गेली की, आज आमच्या मैत्रीला 50 वर्षे झाली. 
अजूनही आमची मैत्री टिकून आहे. आयुष्याचे अनेक चढउतार या मैत्रिणींनी पाहिले; पण डगमगलो नाही. एकीला लागले तर सर्वांचे डोळे डबडबायचे. अशी ही मैत्री आठवताना मन भरून येते. पगार थोडा होता; पण माणुसकी, प्रेम, सहकार्य, एकमेकींविषयी आदर मनात भरून आहे. गेले ते दिवस, आता सर्व पैलतीरावरच जगत आहोत; पण आनंदाने,समाधानाने. मैत्रिणींची मुलेदेखील मोठमोठ्या हुद्यावर आहेत. हे पाहून अभिमानाने छाती फुलते. 
काळाने आम्हाला प्रथम माणूस म्हणून पायावर उभे केले. "साथी हात बढाना' या ओळींनी खूप काही सांगितलं. 
आजही आम्ही मैत्रिणी दर तीन महिन्यांनी संभाजी बागेमध्ये भेटतो. खूप गोष्टी करतो. एकमेकींचे वाढदिवस, ट्रीपला जाणे, विचारांची देवाणघेवाण, वाचन, भजन, सिनेमा, नाटकाचा आनंद घेतो व सुखाने, समाधानाने, आनंदाने जगत आहोत. कारण जिद्द, ध्येय, निष्ठा, प्रेम या साऱ्यांमधून मिळालेला आनंद वेगळा असतो आणि म्हणून समाधानी आहोत. पैलतीरी असूनही आनंदात आहोत. सुख, समाधान कुठेही विकत मिळत नाही. ते प्रत्येकात दडलेले असते. कसे शोधायचे ते आपण ठरवायचे असते आणि ही जिद्द, धैर्य आम्हाला यमुताईंनी दिले. आम्ही सर्व त्यांच्या ऋणी आहोत. आम्ही आजही सगळ्या त्याच ओढीने एकमेकींना भेटतो आणि "आनंदाचे डोही आनंदची तरंग' असे गुणगुणतो. अशी ही आमची मैत्री आणि माझ्या साऱ्या सख्यांना परमेश्‍वर उदंड आयुष्य देवो व आमची ही मैत्री जन्मजन्मांतरी अढळ राहो, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थना. मैत्रीच्या 50व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या मैत्रीला सलाम! 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com