
1984 च्या काळात बजाजच्या मॉडेल्सची फारच मागणी होती. नव्या बजाज दुचाकीकरिता नोंदणी
केल्यानंतर पाच वर्षे वाट पाहावी लागत होती. तेव्हा एकच पर्याय होता तो म्हणजे सेकंड हॅंड दुचाकी खरेदी
करणे. आणि शोध सुरू झाला आयुष्यातल्या पहिल्यावहिल्या दुचाकी खरेदीचा.
1984 च्या काळात बजाजच्या मॉडेल्सची फारच मागणी होती. नव्या बजाज दुचाकीकरिता नोंदणी
केल्यानंतर पाच वर्षे वाट पाहावी लागत होती. तेव्हा एकच पर्याय होता तो म्हणजे सेकंड हॅंड दुचाकी खरेदी
करणे. आणि शोध सुरू झाला आयुष्यातल्या पहिल्यावहिल्या दुचाकी खरेदीचा.
गोष्ट आहे 1984 ची. माझी बॅंकेची नोकरी, पदोन्नतीवर अकोल्याहून जबलपूरला बदली झाली. ठरलेल्या दिवशी बसने प्रवास करून जबलपूरला पोचलो. सुरवातीला काही दिवस हॉटेलमध्ये राहावे लागणार होते. जवळच्याच एका हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला. सकाळी तयार होऊन दहा वाजता नियुक्त शाखेत रुजू झालो.
आता आवश्यक होते निवासी घर शोधणे. सुदैवाने स्थानिक सहकाऱ्यांच्या मदतीने लवकरच चांगल्या वस्तीत घर मिळाले, पण शाखेपासून जवळपास तीन किलोमीटर अंतरावर. रोज पायी किंवा रिक्षाने जाणे शक्य नव्हते. विचारांती एक दुचाकी खरेदी करण्याचे ठरविले.
सुदैवाने आमच्याच शाखेचे एक ग्राहक राजन अग्रवाल यांच्या ओळखीने एक
जुनी बजाज सुपर विकावयाचे असल्याचे कळले. मला जणू इच्छापूर्तीचा मार्गच मिळाला. वेळ न
दवडता दुसऱ्याच दिवशी दुचाकी बघायचे निश्चित झाले. त्या रात्री मी दुचाकी सवारीचे स्वप्न पाहत झोपी
गेलो.
दुसऱ्या दिवशी काम आटोपून राजनसोबत गाडीमालकाकडे दुचाकी बघायला गेलो. औपचारिक बोलणे झाल्यावर गॅरेजमध्ये ठेवलेली दुचाकी बघण्याचा
कार्यक्रम झाला. प्रथमदर्शनीच मला ती आकाशी रंगाची दुचाकी पसंत
पडली. दुचाकी चालवून बघावी, असा मालकाचा आग्रह होता.
"चालवता येते ना? मालकाचा प्रश्न.
"हो, येते ना.' मी ठोकून दिले. मोठ्या विश्वासाने दुचाकी स्टॅंडवरून काढली व किक मारून राजनला मागे
बसण्यास सांगितले. सरळ रस्त्याने थोडे अंतर ठिकठाक पार केले. समोरून येणाऱ्या कारला साइड
देण्याच्या प्रयत्नात दुचाकी रस्त्याच्या कडेला आली व तोल जाऊन आम्ही दोघेही रस्त्याच्या
कडेला गाडीसह खाली पडलो. मला माझ्या लागण्यापेक्षा दुचाकीची काळजी होती. उचलून बघतो तर
काय. साइडला एक भला मोठा पोचा. हृदयाच्या ठोक्यांची गती वाढली. आम्ही दोघेही सुरक्षित होतो.
इकडे-तिकडे बघत दुचाकी सरळ केली व किक मारली. आता गाडी राजन चालवीत
होता, परंतु आमचे संकट अजून संपले नव्हते. धडधडत्या हृदयाने परतीचा प्रवास सुरू झाला.
आम्ही दोघेही शांत. थोड्याच वेळात राजन मला म्हणाला काहीतरी गडबड झाली आहे. ब्रेक लागत नाही.
कसा तरी वेग कमी करीत दुचाकी थांबवून बघितले, तर ब्रेक पॅडल काही केल्या खाली जाईना. कसेतरी दुचाकी मालकाच्या
घरापर्यंत आणली. दुचाकीची हालत पाहून मालक काय समजायचे ते समजला. त्याला सर्व हकीकत
कथन केली. राजनच्या ओळखीतला व भला माणूस असल्याने त्याने परिस्तिथी समजून घेतली. आता प्रश्न होता
दुचाकी खरेदीचा. मी माझी निर्णय क्षमता हरवून बसलो होतो. राजनच्या म्हणण्याप्रमाणे
आपल्यामुळे दुचाकीचे नुकसान झाले आहे. एकतर दुरुस्ती करून देणे किंवा आहे त्या स्थितीत खरेदी
करणे, हे दोनच पर्याय समोर आहेत. मालकाच्या चेहऱ्यावरून त्याला हा प्रस्ताव मान्य असल्याचे दिसले.
मला तर काहीच सुचत नव्हते. शेवटी साडेसहा हजारांमध्ये सौदा निश्चित झाला व दुचाकी घरी न घेता
सरळ दुरुस्तीकरिता गॅरेजमध्ये पोचविली. कागदपत्रांची पूर्तता करून आठ दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर
दुचाकी घरी आली, ती नव्या नवरीसारखी तरोताजा होऊन.
त्यानंतर खऱ्या अर्थाने माझी यशस्वी दुचाकीयात्रा प्रारंभ झाली व नंतर संपूर्ण दहा वर्षे आम्ही एकमेकांचे
सुख-दुःखाचे भागीदार होऊन राहिलो.