coronavirus : शेअर बाजारात काळा सोमवार

पीटीआय
Tuesday, 24 March 2020

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स तब्बल 3 हजार 935 रुपयांनी कोसळला. निर्देशांकात 2016 नंतर एकाच दिवसात झालेली ही सर्वांत मोठी घसरण ठरली आहे.

गुंतवणूकदारांनी गमावले 14.22 लाख कोटी रुपये 

मुंबई - कोरोना विषाणूमुळे शेअर बाजाराला ताप भरला असून, बाजार सोमवारी रुग्णशय्येवर पोचला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स तब्बल 3 हजार 935 रुपयांनी कोसळला. निर्देशांकात 2016 नंतर एकाच दिवसात झालेली ही सर्वांत मोठी घसरण ठरली आहे. बाजारात आज झालेल्या पडझडीत गुंतवणूकदारांचे 14.22 लाख कोटी रुपये पाण्यात गेले. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सेन्सेक्‍समध्ये आज 13.15 टक्के घसरण होऊन तो 25 हजार 985 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 1 हजार 135 म्हणजेच 12.98 टक्‍क्‍यांची घसरण होऊन 7 हजार 610 अंशांवर बंद झाला. दोन्ही निर्देशांकांमध्ये 2016 नंतर एकाच दिवसात झालेली ही मोठी घसरण ठरली आहे. आज सकाळीच बाजार सुरू होताच पहिल्या तासात सेन्सेक्‍स 10 टक्के कोसळला. यामुळे लोअर सर्किट लागून व्यवहार 45 मिनिटे बंद ठेवण्यात आले. पुन्हा बाजार सुरू झाल्यानंतरही घसरण सुरूच राहिली. 

शेअर बाजारात निर्माण झालेली अस्थिरता रोखण्यासाठी भांडवली बाजार नियंत्रक संस्था "सेबी'ने घातलेले निर्बंध पुरेसे ठरलेले नाहीत. बाजारात खरेदीचा जोर नसल्याने तो कोसळला, अशी माहिती शेअर दलालांनी दिली. शेअर बाजारातून सुमारे दोन आठवड्यांत परकी गुंतवणूकदारांनी 50 हजार कोटी रुपयांहून अधिक पैसे काढून घेतले आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने ते आणखी पैसे काढून घेण्याची भीती आहे. शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारभांडवल आज 116.09 लाख कोटी रुपयांवरून 102.13 लाख कोटी रुपयांवर आले. यामुळे गुंतवणूकदारांना आज 14 लाख कोटी रुपये गमवावे लागले. 

जगभरातील शेअर बाजार गडगडले 
कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे जगातील प्रमुख शेअर बाजारांतील पडझड सुरूच आहे. घसरणाऱ्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी ट्रिलियन डॉलरचे पॅकेज देण्यावर अमेरिकी संसदेत एकमत झालेले नाही. यामुळे आशियातील शेअर बाजारांना फटका बसला. याचबरोबर युरोपसह अमेरिकेच्या शेअर बाजारांमध्ये सत्राच्या सुरुवातीला घसरणीचे वातावरण होते. 

शेअर बाजार - घसरण (आकडे टक्‍क्‍यांमध्ये) 
वेलिंग्टन - 9.3 
हॉंगकॉंग - 3.6 
सिडनी - 6 
शांघाय - 2.5 
तैवान - 2.8 
सिंगापूर - 7.5 
जकार्ता - 4 
सोल - 3.4 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: black monday in share market