esakal | Coronavirus - अमेरिकेतील नोकऱ्या धोक्यात, पण भारतीयांना हे क्षेत्र तारणार...थेट रिपोर्ट
sakal

बोलून बातमी शोधा

Gokul bankar

जगावर अधिराज्य गाजवणारा सर्वसंपन्न, बलाढ्य देश अमेरिका. सुख-समृद्धी आणि शांततेचे जीवन जगण्यासाठी अमेरिकेत जाऊन स्थायिक होण्याचे ध्येय लाखो भारतीय ठेवतात. पृथ्वीवर कुठलेही नैसर्गिक किंवा मानवी संकट आले तरी अमेरिकेतील जीवन सुरक्षित आहे, असा विश्वास आतापर्यंत प्रत्येकाला वाटत होता; पण कोरोना विषाणूने सर्व चित्र बदलले आहे.

Coronavirus - अमेरिकेतील नोकऱ्या धोक्यात, पण भारतीयांना हे क्षेत्र तारणार...थेट रिपोर्ट

sakal_logo
By
योगेश सारंगधर, औरंगाबाद

अमेरिकेत सध्या तीन लाखांहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून, दररोज शेकडो मृत्यू होताहेत. लोक बेरोजगारही झालेत. आगामी काळातही हे संकट अधिक गडद होणार आहे. अमेरिकेत लाखो भारतीय राहतात. त्या देशात अमेरिकन लोकांनाच त्यांच्या भविष्याची चिंता भेडसावत असताना भारतीयांचे काय होणार? असा प्रश्न अनेकांना पडलाय. या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ने जगभरात राहत असलेल्या काही भारतीयांचा अनुभव जाणून घेतला. अमेरिकेतील आयटी कंपनीतील भारतीय अभियंता गोकुळ बनकर यांच्याशी साधलेला हा संवाद... 

प्रश्न : अमेरिकेत आज काय स्थिती आहे? 
बनकर : सध्या बाहेर पडल्यास कारवाई होत नाही; पण नागरिकांनीच स्वयंशिस्त लावून घेतलीय. गरजेचे उद्योग-व्यवसाय सध्या सुरू आहेत. हॉटेलमध्ये जाता येत नाही; पण पार्सल मागविण्याची सुविधा आहे. अनावश्यक कामाशिवाय कुणीही घराबाहेर पडत नाही. बहुतांश कंपन्यांचे ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू आहे. सोशल डिस्टन्सिंग न पाळल्यामुळे काही लोकांवर कारवाई झाली आहे.

प्रश्न : सध्याची दिनचर्या कशी आहे व खबरदारी कशी घेतलीय? 
बनकर : मी सॅनफ्रॅन्सिको भागात राहतो. या ठिकाणी आयटी कंपन्यांमध्ये ३५-४० टक्के भारतीय राहतात. माझे ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू आहे. किराणा साहित्य व गरजेच्या वस्तू घरात भरून ठेवल्यात. त्यामुळे बाहेर जाण्याची गरज भासत नाही. काही कारणांनी बाहेर गेलो तरी सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेतली जाते. कुणीही एकमेकांजवळ येत नाहीत. बाहेरून घरात काही वस्तू आणल्या तर व्यवस्थित साफ केल्या जातात. हात वारंवार धुतो. दूध एकदा आणले की पंधरा दिवस पुरते. येथील मित्रांशी व्हिडिओ व मोबाईल कॉल करून चर्चा सुरू आहे. 

हेही बघा - Video:कोरोना हरेल...माझा देश जिंकेल...!

प्रश्न : अमेरिकेत भीती वाटते का व भारतीयांची मानसिकता कशी आहे? 
बनकर : लोकांमध्ये भीती आहे; पण त्याकडे जास्त लक्ष न देता आपण काय करू शकतो, यावरच सगळ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. म्हणजे घराबाहेर न पडणे, सकारात्मक वाचन, आरोग्यदायी आहार, सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन केले जात आहे. शाळा ऑनलाइन सुरू आहेत. टॉयलेट पेपर, मास्क, सॅनिटायझर अशा वस्तूंची मात्र कमतरता भासतेय. 

प्रश्न : कोणत्या सेक्टरच्या नोकऱ्यांवर परिणाम झालाय? 
बनकर : सध्या हॉटेल, ट्रॅव्हलिंग कंपन्यांवर मोठा परिणाम झाला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात. अमेरिकेने त्यांच्या मूळ नागरिकांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर केलेय. त्यामुळे अमेरिकनांना त्यांची जीवनशैली सांभाळण्याइतका पैसा मिळेल. बहुतांश भारतीय लोक हे आयटी कंपन्यांमध्ये नोकरी करतात. सध्या आयटी क्षेत्रावर अजून तरी काही परिणाम वाटत नाही. मात्र, परिस्थिती आटोक्यात आली नाही, तर अख्ख्या जगाला परिणाम भोगावे लागतील, हे निश्चित. 

हेही वाचा -  ‘हे’ माध्यम आहे एकाग्रता वाढविण्यासाठी झक्कास, कोणते? ते वाचाच   

प्रश्न : अमेरिकेतील भारतीय लोक सध्या भारताकडे कसे बघताहेत? 
बनकर : लोकसंख्या व उदरनिर्वाहाचा मुद्दा पाहता भारतात सोशल डिस्टन्सिंग पाळणे शक्य होताना दिसत नाहीय. गरज म्हणून अनेक लोक बाहेर पडत आहेत, तर काहीजण या संकटाकडे गंमत म्हणून बघताहेत. सध्या लॉकडाऊनशिवाय देशासमोर दुसरा कुठलाही चांगला पर्याय नाही. भारत सरकारने केलेल्या उपाययोजना प्रशंसनीय आहेत. अनेक भारतीय लोक सरकारला मनापासून साथ देताहेत. सोशल डिस्टन्सिंग गांभीर्याने घ्यायलाच हवे. मी स्वस्थ आहे आणि मला काही होणार नाही, असा अतिआत्मविश्वास काहीच कामाचा नाही. सध्याचे कोरोनाग्रस्तांचे आकडे पाहिले तर कुठलाही प्रदेश, वय यातून सुटलेले नाही. एकमेकांचा संपर्क टाळायलाच हवा. 

प्रश्न : भारतातील नातेवाईक, गावांत कोणती चर्चा होतेय? 
बनकर : माझे मूळ गाव औरंगाबाद जिल्ह्यातील हसनखेडा (ता. कन्नड). गावाकडचा मित्रपरिवार, नातेवाइकांशी संवाद वाढलाय. सगळ्यांनाच एकमेकांची काळजी वाटतेय. आम्ही दूर असल्याने गावाकडच्या कुटुंबीयांना चिंता आहे. एरवी फोनवर बोलणे जास्त वेळ शक्य होत नव्हते; पण आता वाढले आहे. दोन्ही देशांत वेळेचा फरक असल्याने भारतातील दिवसाची ठराविक वेळ ठरवून कुटुंबासोबत एकत्रित चर्चा केली जाते. कोरोना विषाणूच्या निमित्ताने अनेक सामाजिक, मानसिक बदल घडणार आहेत. कोरोनाने जीवितहानी केली; पण पूर्वीप्रमाणे जिव्हाळा वाढला तर कायमचा सकारात्मक विचार पेरला, असे म्हणावे लागेल. 

हेही वाचा - कोरोनाचे संकट - दिलपसंदच्या शेतात सोडल्या मेंढ्या! 

loading image