रक्तदात्यांनी घेतली "कोरोना'ची धास्ती ! रुग्णालयात रक्ताचा तुटवडा...

राजेंद्र हजारे
रविवार, 22 मार्च 2020

आठ दिवसांपासून रक्तपेढीत रक्त देण्यासाठी रक्तदाते येण्यास धजत नाहीत. तालुक्‍यामध्ये दररोज वीस ते पंचवीस रक्ताच्या पिशव्याची गरज आहे.

निपाणी - दरवर्षी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सण-समारंभ जयंत्यासह विविध कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात होते. मात्र यावर्षी रक्तदात्यांनी कोरोना विषाणूची धास्ती घेतली आहे. त्यामुळे रक्तदानाचा धर्म पाळण्यापासून अनेक रक्तदाते दूर जात आहेत. परिणामी चिक्कोडी तालुक्‍यातील रुग्णालये आणि रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. याशिवाय प्रामुख्याने निगेटिव्ह रक्तगटाच्या रक्तपिशव्या दुर्मिळ होत चालल्या आहेत. तर शस्त्रक्रियागृहात रक्त वेळेवर उपलब्ध होत नाही. त्याचा रुग्णावर परिणाम होत आहे. 

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग निपाणी शहरातून गेला आहे. त्याशिवाय मुधोळ-फोंडा आंतरराज्य महामार्गही येथूनच आहे. त्यामुळे काही वर्षांपासून अपघातांचे प्रमाण वाढल्याने अत्यवस्थ रुग्णांना रक्ताची गरज भासते. निपाणी, चिक्कोडी येथील रक्तपेढीतून दर आठवड्याला 40 पेक्षा अधिक रक्ताच्या पिशव्यांचा पुरवठा केला जातो. यापुढे रक्तपेढीमध्ये दररोज रक्ताचा पुरवठा होणे आवश्‍यक आहे. परंतु आठ दिवसांपासून रक्तपेढीत रक्त देण्यासाठी रक्तदाते येण्यास धजत नाहीत. तालुक्‍यामध्ये दररोज वीस ते पंचवीस रक्ताच्या पिशव्याची गरज आहे. पण रक्तपेढीमध्ये रक्ताचा साठा संपत आल्याने भविष्यात रक्तटंचाई निर्माण होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक सेवाभावी संस्थांना रक्तपेढीतर्फे रक्तदानाचे आवाहन केले जात आहे. पण कोरोनामुळे अनेकजण रक्त देण्यास नकार देत आहेत. रक्तदान रक्तसंक्रमणाने कोरोनाची लागण होत नाही. रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी सामाजिक, धार्मिक संस्थांनी रक्तदान शिबिर घेतल्यास अनेकांचे प्राण वाचू शकणार आहेत. 

रक्तदानामुळे कोरोना विषाणूचे संक्रमण होऊ शकत नाही. केवळ सर्दी-खोकला आणि शिंकल्यामुळे त्याचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे रक्तदात्यांनी अनाठायी भीती मनातून काढून रक्तदानासाठी पुढे येण्याची गरज आहे. 
- डॉ. सी. बी. कुरबेट्टी
अध्यक्ष, रोटरी रक्तपेढी, निपाणी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A blood bank has been created in the blood bank because of corona