इकडे ना हरकत पत्र मिळेना अन् तिकडे गावकरी गावात घेईना...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

इकडे ना हरकत पत्र मिळेना आणि तिकडे गावकरी गावात घ्यायला तयार नाहीत, त्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. सध्या रुग्णालयातील तपासणी केलेली चिठ्ठी दाखवून प्रवेश मिळविला जात आहे.

खानापूर (बेळगाव) - परप्रांतातून खानापुर तालुक्यातील ग्रामिण भागात येणाऱ्यांना गावात घेण्यास मज्जाव केला जात आहे. यापार्श्वभूमीवर स्वत:ची तपासणी करण्यासाठी आज मंगळवारी रांगा लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे येथील सरकारी रुग्णालयात तोबा गर्दी झाली. गर्दी वाढत असल्याने तालुका प्रशासन हादरले आहे.

 गेल्या पाच दिवसांपासून गोवा, पुणे-मुंबईसह इतर प्रांतातून येणाऱ्यांची संख्या दिवसेदिवस वाढत चालली आहे. ग्रामिण भागात कोरोनाची धास्ती असल्याने स्थानिक परप्रांतातून आलेल्यांना गावात घेण्यास तयार नाहीत. तपासणी करून ना हरकत पत्र घेऊन या असे सुनावले जात असल्याने परप्रांतीय स्वत:ची तपासणी करण्यासाठी येथील सरकारी रुग्णालयात गर्दी करीत आहेत. सकाळपासून रूग्णालयात रांगा लागल्या आहेत, सुमारे 200 जणांनी गर्दी केली आहे. 

ना हरकत पत्र मिळविण्यासाठी धडपडत

दरम्यान, अशा पध्दतीने गर्दी होत असल्याने तालुका प्रशासन हादरले आहे. तहशिलदार रेश्मा तालिकोटी यांनी त्यांच्या पथकासह रुग्णालयाला भेट देऊन त्यांची तातडीने तपासणी करून त्यांना घरी जाण्यासह आवश्यक काळजी घेण्याच्या सूचना केल्या. कुणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, परप्रांतातून येणारे ना हरकत पत्र मिळविण्यासाठी धडपडत आहेत. प्रशासनाकडून मात्र तसे पत्र दिले जात नसल्याचे सांगण्यात येत असल्याने मोठी गोची झाली असल्याचे परप्रांतीयांचे म्हणणे आहे. 

इकडे ना हरकत पत्र मिळेना आणि तिकडे गावकरी गावात घ्यायला तयार नाहीत, त्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. सध्या रुग्णालयातील तपासणी केलेली चिठ्ठी दाखवून प्रवेश मिळविला जात आहे. पण, त्यांना घराबाहेर पडणार नसाल तरच गावात घेऊ असे सुनावले जात आहे. परप्रांतातून येणाऱ्यांनी आवश्यक काळजी घ्यावी, गावकऱ्यांनी त्यांच्या संपर्कात येऊ नये असे तालुका प्रशासनाने कळविले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The government hospital is rushing to inspect itself in belgum