Coronavirus : आता आव्हान मृत्युदर कमी करण्याचे!

मृणालिनी नानिवडेकर
Friday, 17 April 2020

मृत्यूचे प्रमाण
मुंबईतील मृत्युचा अभ्यास केला असता ५० पैकी १४ रुग्ण दाखल होताच मरण पावले. २६ रुग्ण हे २४ तासांतच मृत्युमुखी पडले. ११ जणांचा कोरोना चाचणी अहवाल त्यांच्या मृत्यूनंतर आला. त्यात ते पॉझिटिव्ह निघाले. १४ जण हे अहवालानंतर दुर्दैवाने लगेचच मृत्युमुखी पडले. बहुतांश मृतांना मधुमेह, उच्च रक्‍तदाब आदी आजार होते. मात्र, हे प्रमाण कमी कसे करता येईल याचा आढावा घेणे सुरू आहे.

मृत्युसंख्या कमी करण्याला प्राधान्य 
मुंबईत मृत्युदर कमी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष डॉक्‍टर संजय ओक दररोज उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांची बैठक घेत असून योग्य ती काळजी घेण्याबरोबरच अतिदक्षता वॉर्ड वाढवून दोन ते तीन दिवसांत ५०० खाटा तयार करण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे. मृत्युसंख्या कमी करण्याला सरकारचे प्राधान्य आहे. कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असताना आता अत्यवस्थ रुग्णांना बरे करण्याचे आव्हान आहे, असे महापालिका आयुक्‍त प्रवीण परदेशी यांनी सांगितले.

मुंबई - मुंबई आणि पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी मृत्यूचे प्रमाण अजूनही सरकारची पाठ सोडायला तयार नाही. सरकारच्या चिंतेत त्यामुळे भर पडत आहे. पुण्याच्या ससून रुग्णालयात आणि मुंबईत होणारे मृत्यू अत्यंत अत्यवस्थ अवस्थेत रुग्ण दाखल झाल्यानंतर झाले आहेत, असे प्राथमिक निदान आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आजार लपवत असल्याने किंवा रुग्णालयात जाण्याचे टाळत असल्याने मृत्यू होत आहेत काय, याकडे लक्ष देण्याबरोबरच वस्ती-वस्तीतील दवाखाने सुरू झाले तर सर्दी-पडसे झालेले रुग्ण कोरोनाबाधित आहेत काय हे शोधता येईल, असे तज्ज्ञ समितीने सुचवले आहे.

कोरोनाने मृत्यू झाला तर संसर्ग रोखण्यासाठी शवविच्छेदन बंद करण्यात आले असल्याने भारतातील विषाणू काही वेगळा परिणाम तर करत नाही ना याकडेही लक्ष देणे आवश्‍यक मानले जात आहे. मुंबई महापालिकेचे कस्तुरबा रुग्णालय अत्यवस्थ रुग्णांवरील उपचारांसाठी तयार झालेले नव्हते. मात्र, प्राप्त परिस्थितीत तेथेच बाधितांवर उपचार करणे आवश्‍यक असल्याने तेथील सुविधा तातडीने कशा वाढवता येतील यावरही विचार सुरू आहे.

महाराष्ट्रातील कोरोना मृतांपैकी ६२ टक्‍के घटना मुंबईतील आहेत. पुण्यात तब्बल ४४ मृत्यू झाले आहेत. ससून रुग्णालयात मृत्यू होण्यामागची नेमकी कारणे काय, याचाही वेध घेतला जात आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील डॉक्‍टर डी. बी. कदम यांनी बीजे मेडिकल कॉलेज येथील रुग्णांसाठी मेडिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉल तयार केला होता. आता त्यांचा समावेश असलेली समिती पुण्यातील मृत्यूच्या कारणांचा अभ्यास करणार आहे. 

दरम्यान, ससूनचे प्रमुख डॉ. अजय चंदनवाले यांची आज तडकाफडकी बदली करण्यात आली. मृत्यूदर आटोक्यात येत नसल्याने ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात येते. मुंबईबाबतही असाच निर्णय होण्याची शक्यता असून मुख्य सचिव अजोय महेता यांना या महानगरात लक्ष घालण्यास सांगण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The challenge now is to reduce mortality