गुड न्यूज : 1 एप्रिलपासून वर्तमानपत्र येणार तुमच्या घरात

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 26 मार्च 2020

मुंबईत महत्त्वाची बैठक

- वर्तमानपत्रातून व्हायरस पसरत नाही

मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून वर्तमानपत्रांची विक्री बंद झाली आहे. पण, आता पुन्हा वाचकांच्या हातात वर्तमानपत्र मिळणार आहे. येत्या 1 एप्रिलपासून वर्तमानपत्र विक्री पुन्हा सुरू होणार असून, मुंबईत झालेल्या बैठकीत या संदर्भात निर्णय झाला आहे. त्यामुळं केवळ मुंबईच नव्हे तर, संपूर्ण महाराष्ट्रात वर्तमानपत्र विक्री सुरू होणार आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुंबईत महत्त्वाची बैठक

वर्तमानपत्र हा सर्वसामान्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे. रोज सकाळी वर्तमानपत्र हाती घेतल्याशिवाय अनेकांचा दिवस सुरू होता. नाही पण, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात करण्यात आलेला लॉक डाऊन आणि वर्तमानपत्रातून कोरोना व्हायरस पसरण्याची उठलेली अफवा यामुळं गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात विक्री बंद होती. परंतु, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पुढाकार घेत या प्रश्न मार्गी लावला आहे. मुंबईत मंत्री सुभाष देसाई यांनी वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात 1 एप्रिलपासून पुन्हा वर्तमापत्र विक्री सुरू करण्यावर निर्णय झाला आहे. त्यामुळं आता मुंबई पाठोपाठ महाराष्ट्रात इतर ठिकाणीही वर्तमानपत्र विक्री सुरू होण्याची शक्यता आहे. 

वर्तमानपत्रातून व्हायरस पसरत नाही

वर्तमानपत्राद्वारेही कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका आहे, अशी अफवा सोशल मीडियावर पसरली होती. त्यामुळं वर्तमानपत्र विक्रेत्यांनी विक्रीला नकार दिला. पण, या संदर्भात गेल्या आठवड्यातच जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्टीकरण दिले होते. वर्तमानपत्राद्वारे कोरोना पसरत नसल्याचे संघटनेने म्हटले होते. भारतातली दिल्लीतील एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलैरिया यांनी तसेच कस्तुरबा हॉस्पिटलचे डॉ. ओम श्रीवास्तव यांनीही वर्तमापत्रद्वारे कोरोना पसरणं अशक्य असल्याचं म्हटलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाला त्यांनी प्रतिक्रिया दिली होती. व्हायरस कागदावर फार काळ टिकत नाही, त्यामुळं तो वर्तमानपत्राद्वारे पसरत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Circulation of Newspaper will again start from 1st April 2020