एका मंत्र्याला कोरोनाची लागण;फोर्टिस रूग्णालयात उपचार सुरू, प्रकृती स्थिर 

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 22 April 2020

 राज्य मंत्रिमंडळातील एका मंत्र्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले असून त्यांच्यावर फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे . 

मुंबई - राज्य मंत्रिमंडळातील एका मंत्र्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले असून त्यांच्यावर फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे . मात्र संबंधित मंत्र्याने सोमवारी ( ता. २१ ) ला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावल्याने मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांमध्ये धास्तीचे वातावरण आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याशिवाय सदरील मंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांनाही ही विलगीकरणात राहण्याची सूचना करण्यात आली असल्याचे सांगण्यात येते. संबंधित मंत्री मागील अनेक दिवसापासून संशयास्पद रूग्ण असल्याची चर्चा होती. मात्र सुरुवातीला त्यांची कोरोना चाचणी नकारात्मक आली होती. मात्र मंगळवार (ता.२१) ला त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्यांची कोरोना चाचणी घेतली असता ती पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात येते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या मंत्र्यांसोबत चर्चा केली असून डॉक्टरांशी देखील त्यांनी सल्लामसलत केली आहे. 

मतदारसंघात कामे 
सदरील मंत्र्याने लॉकडाउनदरम्यान आपल्या मतदार संघात अनेक प्रकारच्या सोयी आणि सुविधा सुरू केल्या होत्या. गरजूंना दररोज जेवणाचे वाटप करणे आणि लॉक डाउनची आचारसंहिता पाहण्यासाठी हे स्वतः रस्त्यावर उतरून आवाहन करत होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या सोबतीत असलेल्या काही कर्मचाऱ्यांना आणि सुरक्षारक्षकांना कोरोनाची बाधा झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर तातडीने सर्वांच्या चाचण्या करण्यात आल्या असून जे लोक मंत्र्यांसोबत कार्यरत होते त्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे. पुढील आठ दिवस त्यांना स्वतंत्रपणे उपचारासाठी रुग्णालयात ठेवले जाणार असून त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona infection to a minister