कोरोनाचे सावट : विषाणूंचा ‘दंश’काळ

Corona Virus
Corona Virus

मुंबई/नवी दिल्ली - कोरोना विषाणूंचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होऊ लागल्याने देशाची वाटचाल टाळेबंदीच्या दिशेने सुरू झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये धुमाकूळ घालत जगाचे अर्थचक्र ठप्प करणाऱ्या या संसर्गाने आता देशामध्येही भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, मध्य प्रदेश, ओडिशा आणि छत्तीसगड यांनी सरकारी आणि  शैक्षणिक संस्था, सिनेमागृहे, नाट्यगृहे आणि व्यायामशाळा बंद करण्याचा निर्णय घेत सार्वजनिक कार्यक्रमांना कात्री लावली आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण पुणे शहरात आढळल्याने पुण्यातील  शाळा-महाविद्यालये तूर्तास ३० मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतला. याशिवाय मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड,  ठाणे आणि नागपूर या सहा शहरांत खबरदारीचा उपाय म्हणून जिम, स्विमिंग पूल, चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे आज शुक्रवारी रात्रीपासून बंद ठेवण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मात्र दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार होणार आहेत.

देशभरात दहशत माजवणारा कोरोना महाराष्ट्रातही हातपाय पसरत असल्याने त्याला रोखण्याची सर्व तयारी राज्य सरकारने केली आहे. त्याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली. मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे आणि नागपूर या शहरांत साथीचे रोगप्रतिबंधक कायदा लागू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आज १८  झाल्यानंतर सरकारने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. सर्वाधिक रुग्ण पुणे शहरात असल्याने या शहरातील शाळा-महाविद्यालये ३० मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मॉल्समधील गर्दी टाळावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार परदेशातून येणाऱ्या नागरिकांवर सरकारचे लक्ष असून चीन, दक्षिण कोरिया, इटली, फ्रान्स, जर्मनी आणि इराण या देशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांना १४ दिवस निगराणीखाली ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या देशातून जे रुग्ण येतील त्यांना मात्र विमानतळावरच विलगीकरण करून त्यांच्यावर १४ दिवस उपचार करण्यात येणार आहेत. 

मात्र महाराष्ट्रात आलेले रुग्ण हे अमेरिका आणि दुबईतून आले असल्याने या दोन देशांचा समावेश देखील कोरोना प्रतिबंधक उपाय योजनांच्या तरतुदीत करण्यात यावा यासाठी केंद्र सरकारला विनंती केल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली. 

सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी
राज्यात विविध ठिकाणी होणाऱ्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर सरकारने बंदी घातली आहे. यामध्ये धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांचा समावेश असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. ज्या सार्वजनिक कार्यक्रमांना यापूर्वी परवानगी दिली असेल त्यांची परवानगी रद्द करण्यात येऊन नव्याने कुठलीही परवानगी दिली जाणार नाही, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

देश टाळेबंदीच्या दिशेने!
देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने फोफावू लागल्याने आता केंद्राप्रमाणेच विविध राज्यांनीही टाळेबंदीचा मार्ग अवलंबायला सुरुवात केली आहे. कोरोनाचा पहिला बळी गेलेल्या कर्नाटक सरकारने आज राज्यातील मॉल्स, सिनेमागृहे, पब्ज आणि नाइट क्लब आठवडाभरासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेश, हरियाना, ओडिशा, छत्तीसगड, दिल्ली या राज्यांनीही शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेत सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. केरळमध्ये विधिमंडळाचे कामकाज तहकूब करण्यात आले असून, राज्यातील नऊशे जणांना विलगीकरण कक्षांमध्ये ठेवण्यात आले आहे.

कोरोनाग्रस्त इराणमध्ये सहा हजार भारतीय अडकून पडले असून त्यांना मायदेशी आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. आज ४४ भारतीयांचा दुसरा जत्था मायदेशी परतल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले. दुसरीकडे देशातील विषाणूबाधितांची संख्या ८१ वर पोचली आहे. इटलीमधून मायदेशी परतलेल्या एका नागरिकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून, त्याला लष्कराच्या मानेसर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विविध उपाययोजनांची घोषणा केली. राज्यातील शैक्षणिक संस्था आणि शाळा २२ मार्चपर्यंत बंद करण्यात आल्या असून प्रत्येक जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. जम्मू- काश्‍मीरमध्येही सर्व क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. छत्तीसगडमध्ये व्यायामशाळा, जलतरण तलाव बंद करण्यात आले असून, वॉटर पार्क आणि अंगणवाड्यादेखील ३१ मार्चपर्यंत बंद राहतील. राजधानी दिल्लीमध्ये खासगी शाळा आणि महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद केली ठेवली जाणार असून, सिनेमागृहे महिनाभरासाठी बंद ठेवण्यात येतील. पंजाबमध्ये भारत- पाकिस्तान दरम्यानच्या अटारी- वाघा सीमेवरून कोणत्याही परदेशी नागरिकास आता देशात सोडले जाणार नसून, पाकमधील भारतीयांनाही त्यांच्या व्हिसाची मुदत संपण्यापूर्वीच मायदेशी परतावे लागले.

मास्क, सॅनिटायझर यांना अत्यावश्‍यक वस्तूंचा दर्जा
विषाणू संसर्गाच्या भीतीमुळे देशभरातील नागरिकांची मास्क आणि सॅनिटायझरच्या खरेदीसाठी धावाधाव सुरू असतानाच अनेक समाजविरोधी घटकांनी त्याचाही काळाबाजरही सुरू केल्याने सरकारने पावले उचलायला सुरुवात केली. मास्क आणि सॅनिटायझरचा अत्यावश्‍यक वस्तूंमध्ये समावेश करण्यात आला असून याचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

परीक्षा वेळापत्रकानुसारच 
पुणे व पिंपरी-चिंचवडमधील शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात येणार असली, तरी दहावी-बारावीच्या परीक्षा मात्र वेळापत्रकानुसारच होतील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. याशिवाय राज्य लोकसेवा आयोगामार्फत आरटीओ या पदासाठी परीक्षा होत आहे तीदेखील ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होईल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. शाळा-महाविद्यालयीन परीक्षांबाबत ३० मार्च नंतरची स्थिती पाहून नियोजन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

देशभरात

  • कर्नाटकात मॉल्स, सिनेमागृहे, पब्ज, नाईट क्लब बंद
  • ‘यूपी’त सार्वजनिक कार्यक्रम रद्द
  • केरळ, ओडिशात विधिमंडळ कामकाज तहकूब
  • बिहारमध्ये शैक्षणिक संस्था बंद
  • दिल्लीत शाळा, महाविद्यालये बंद
  • तमिळनाडूत शाळांना सुटी
  • पंतप्रधान मोदींचा गुजरात दौरा रद्द
  • आयआयटी कानपूरमधील लेक्चर्स २९ मार्चपर्यंत बंद
  • विद्यार्थ्यांनी वसतिगृहे रिकामी करावी : आयआयटी दिल्ली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com