चिंताजनक : राज्यात मृतांची संख्या वाढतीय; वाचा सविस्तर बातमी

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 9 April 2020

राज्यात कोरोना संसर्गाचा फैलाव वाढत चालला असून गेल्या चोवीस तासात २५ जणांचा मृत्यू झाला आहे. यात पुण्यातील १४, मुंबईतील ९  तर मालेगाव आणि रत्नागिरी येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील मृतांची संख्या ९७ वर पोचली आहे.

पुणे / मुंबई - राज्यात कोरोना संसर्गाचा फैलाव वाढत चालला असून गेल्या चोवीस तासात २५ जणांचा मृत्यू झाला आहे. यात पुण्यातील १४, मुंबईतील ९  तर मालेगाव आणि रत्नागिरी येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील मृतांची संख्या ९७ वर पोचली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, आज कोरोनाच्या २२९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून सध्या ११४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राजेश टोपे म्हणाले, राज्यात रुग्णांची संख्या १३६४ झाली आहे. तसेच १२५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. विविध ठिकाणी ११४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आजपर्यंत ३० हजार ७६६ नमुन्यांपैकी २८ हजार ८६५ जणांचे प्रयोगशाळा नमुने  निगेटिव्ह आले आहेत.  सध्या राज्यात ३६ हजार ५३३ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४७३१  जण संस्थात्मक क्वारंटाइन मध्ये आहेत.  आज झालेल्या मृत्यूंपैकी १५ पुरुष तर १० महिला आहेत. आज झालेल्या २५ मृत्यूपैकी १२ जण हे ६० वर्षांवरील आहेत तर मुंबईत निधन झालेल्या एका महिलेचे वय १०१ वर्षे आहे. ११ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत तर दोघेजण ४० वर्षांपेक्षा लहान आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या २१ रुग्णांमध्ये (८४ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus maharashtra update 9th april 2020 marathi