Coronavirus : ऑनलाइन अभ्यासावर भर द्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

हे करा 

  • ऑनलाइन साहित्य, व्हिडिओचा अभ्यासासाठी वापर करा
  • मोफत साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे
  • प्रश्‍नपत्रिका सोडविण्यावर भर द्या
  • परीक्षांच्या संकेतस्थळावरील परीक्षा तारखांवर लक्ष ठेवा
  • सशुल्क ऑनलाइन अभ्यास साहित्य घेताना त्याची खातरजमा करा 

सर्वच क्‍लासकडे ऑनलाइन शिकविण्याची सुविधा नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना इतर पर्यायांचा विचार करावा लागेल. महाराष्ट्रातच क्‍लास बंद आहे, इतर राज्यांत क्‍लास सुरू आहेत. हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी तयारी करावी.
- दुर्गेश मंगेशकर, व्यवस्थापकीय संचालक, आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्र

पुणे - ‘कोरोना’मुळे अभियांत्रिकीसह इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे क्‍लास बंद केल्याने आता विद्यार्थ्यांवर घरी बसून स्वयंअध्ययन करण्याची वेळ आली आहे. या परिस्थितीत विद्यार्थ्यांनी निराश न होता इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात अभ्यासाचे साहित्य उपलब्ध असून, त्यावरून अभ्यास करावा, प्रश्‍नपत्रिका सोडविण्याचा सराव केल्यास चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होता येईल, असा मोलाचा सल्ला मार्गदर्शकांनी दिला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बारावीनंतर आयुष्याचा टर्निंग पॉइंट असणाऱ्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा तोंडावर आलेल्या असताना ‘कोरोना’मुळे राज्यातील सर्व खासगी क्‍लासेस बंद झाले आहेत. १२वीची परीक्षा संपल्यानंतर परीक्षांच्या तयारीला वेग येतो, क्‍लासमध्ये जाण्याचे विद्यार्थ्यांचे प्रमाणही वाढते. मात्र, यंदा कोरोनामुळे विद्यार्थ्यांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. ‘जेईई मेन्स’ची परीक्षा ५ ते ११ एप्रिलच्या दरम्यान होणार होती. मात्र, कोरोनामुळे या परीक्षेची नवी तारीख ३१ मार्च रोजी जाहीर केली जाईल. महाराष्ट्रात सीईटी सेलकडून एप्रिल महिन्यात नियोजित असलेल्या अभियांत्रिकीच्या प्रवेश परीक्षेसह इतर परीक्षांसंदर्भात ३१ मार्च नंतर  कोरोनाची स्थिती कशी असेल याचा आढावा घेऊन निर्णय होणार आहे. 

१२वीची परीक्षा संपली की त्यानंतर बहुतांश क्‍लासमध्ये क्रॅश कोर्स सुरू होतो, त्यासाठी राज्यभरातून विद्यार्थी पुण्यात येतात. तसेच गेल्या दोन वर्षांपासून जेईई, सीईटी, नीटचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही हाच कालावधी महत्त्वाचा असतो. पण क्‍लासेस बंद झाल्याने विद्यार्थ्यांपुढे अभ्यास करून चांगले गुण कसे घ्यायचे, असा प्रश्‍न पडला आहे. 
डीपरचे संस्थापक सचिव हरीश बुटले म्हणाले, ‘‘क्‍लासेस बंद झाल्याने विद्यार्थ्यांनी निराश होण्याची गरज नाही. प्रवेश परीक्षांच्या सर्व विषयांचे साहित्य ऑनलाइन मोफत व सशुल्क उपलब्ध आहे. त्याचा वापर विद्यार्थ्यांनी करावा. तसेच या काळात विद्यार्थ्यांनी ऑनलाइन व ऑफलाईन परीक्षांच्या प्रश्‍नपत्रिका सोडविण्यावर भर दिला तर त्यांना परीक्षेत चांगला फायदा होईल. क्‍लास बंद असले तरी शिक्षकांच्या संपर्कात राहून आपले प्रश्‍न त्यांना विचारावेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Emphasize online study by coronavirus