Coronavirus : पाच हजार जण कोरोना बाधीतांच्या संपर्कात - राजेश टोपे

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 2 April 2020

जगभर थैमान माजवलेल्या कोरोना साथीची राज्यातील परिस्थिती चिंता वाढवणारी आहे. या कोरोनाबाधितांच्या सहवासात सुमारे पाच हजार जण आल्याची धक्कादायक माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुंबई महापालिकेच्या वॉर रुमला भेट दिल्यानंतर राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

मुंबई - जगभर थैमान माजवलेल्या कोरोना साथीची राज्यातील परिस्थिती चिंता वाढवणारी आहे. या कोरोनाबाधितांच्या सहवासात सुमारे पाच हजार जण आल्याची धक्कादायक माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुंबई महापालिकेच्या वॉर रुमला भेट दिल्यानंतर राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यातील पाच हजार जणांना विलगीकरण केंद्रात भरती करण्यात करण्यात आले आहे. हे सर्व जण करोनाबाधीत रुग्णांच्या जवळून संपर्कात आले होते. राज्यात मुंबईत सर्वाधिक म्हणजे १६२ करोनाबाधीत झाले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. त्यातच आता या बाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा आकडाही धाकधूक वाढवणारा आहे.

राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मुंबईत सध्या एकूण १६२करोनाबाधित आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांची संख्या ५३४३ एवढी आहे. या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आले असून त्यांच्याही चाचण्या सुरू आहेत. 

कोरोनाची साथ वेगाने पसरत असून महाराष्ट्रात हा आकडा ३२० हून अधिक झाला आहे. तर, या आजारामुळे आत्तापर्यंत तेरा जणांना प्राण गमवावे लागले आहेत. सर्व प्रकारची खबरदारी घेऊनही साथ वाढत असल्याने प्रशासनासह नागरिकांच्या चिंतेतही भर पडली आहे. ३२० पैकी आत्तापर्यंत ४१ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.

..तर खैर नाही - अजित पवार
इटली, अमेरिका, स्पेनमधील ‘कोरोना’ बळींपासून धडा शिकून जनतेने आतातरी शहाणे व्हावे. जीवाची जोखीम पत्करुन ‘कोरोना’विरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, पोलिस, सफाई कामगार, या सर्वांच्या त्यागाचा सन्मान करावा. भाजीखरेदीसाठी गर्दी करणे बंद करावे. घरातच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान द्यवे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची, नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. जनतेने घराबाहेर पडून अनावश्यक गर्दी करणं सुरूच ठेवले तर सद्यःस्थितीचा पुनर्विचार करून कठोर उपाय योजावे लागतील, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five thousand people in contact with Corona obstacles rajesh tope