Coronavirus : लॉकडाउनचे भवितव्य जनतेच्या हाती - उद्धव ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 5 April 2020

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी जात, धर्म, भाषा, प्रांतवाद बाजूला ठेवून एकत्र यायला हवे. सोमवारी येणारी महावीर जयंती, बुधवारची हनुमान जयंती व त्याच रात्री असलेल्या शब्बे बारातसाठी लोकांनी घराबाहेर पडू नये. यंदा लोकांनी पुजाअर्चना,  घरामध्येच करावी.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री

मुंबई - देशव्यापी लॉकडाउन चौदा तारखेला संपत आहे, त्यानंतर काय करायचे? हे फक्त जनतेच्या हातात आहे. आपण किती कडक शिस्त पाळतो. त्यावर सगळे काही अवलंबून आहे असे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्रातील नागरिक आत्मविश्वासाने कोरोना विषाणुविरुद्ध लढत आहेत.पण समाजात आणखी एक समाजविघातक विषाणू पसरत आहे. सध्याच्या परिस्थितीचा दुरुपयोग करून जर कुणी महाराष्ट्राला अडचणीत आणत असेल तर अशा समाजविघातक वृत्तींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही ठाकरे यांनी दिला. आज मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमांवरील थेट प्रसारणाच्या माध्यमातून जनतेला संबोधित केले. प्रारंभी त्यांनी सोलापूरच्या ७ वर्षाच्या आराध्या नावाच्या मुलीने वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत केल्याचा उल्लेख केला व तिला शुभेच्छा दिल्या.राज्यात पाडवा, रामनवमी, पंढरपुरची यात्रा यासारखे सर्व मोठे सण अगदी घरगुती स्वरूपात आयोजित झाले, कोणतेही मोठे उत्सव वा कार्यक्रम झाले नाहीत.

ज्याप्रमाणे हे कार्यक्रम झाले त्याचप्रमाणे इतर धर्मियांनी सुद्धा आपले सण, समारंभ आणि कार्यक्रम करावेत, एकत्र येणे, गर्दी करणे टाळावे. कारण राज्यात कोणत्याही धर्माच्या, राजकीय पक्षाच्या कार्यक्रमांना, खेळाच्या स्पर्धांना परवानगी दिली जाणार नाही. या विषाणुशी सगळे एकजुटीने लढत आहेत. याला कुणी गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये, ते सहन केले जाणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The future of lockdown is in the hands of the public uddhav thackeray