Coronavirus : संरक्षण मंत्रालयही कोरोनाच्या लढाईत

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 April 2020

मास्कची निर्मिती
चेन्नई, हजरातपुर, कानपूर व शहाजहानपूर येथील आयुध कारखान्यांच्या वतीने विषाणू विरोधी पोषाख आणि मास्कची निर्मिती केली जात आहे. अगदी थोड्याच कालावधीत यांचे उत्पादन पूर्ण करण्यासाठी विशेष ’हिट सिलिंग मशिन’ची सोय या कारखान्यांमध्ये करण्यात आली आहे.

विषाणू विरोधी पोषाख आणि मास्कची चाचणी
ग्वाल्हेरच्या संरक्षक संशोधन आणि विकास संस्थेच्या वतीने या संरक्षण साधनांची चाचणी करण्यात आली असून, सध्या कोईम्बतूरच्या साऊथ इंडिया टेक्‍स्टाईल असोसिएशनमध्ये (एसआयटीएआरए) मास्कचे परिक्षण सुरूच आहे. दरम्यान ओएफबीतर्फे प्रत्येक आठवड्याला सुमारे सहा हजार संरक्षण साधनांचा उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तसेच या संरक्षण साधनांची कार्यक्षमतेचे परिक्षण करण्यासाठी तीन मशिन विकसित करण्यात आल्या आहेत.

पुणे - संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या संरक्षण सार्वजनिक एकक (डीपीएसयु) आणि आयुध निर्माण बोर्ड (ऑर्डनन्स फॅक्‍टरी बोर्ड- ओएफबी) यांच्या वतीने आरोग्य प्रशासनाला मदत करण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा व संसाधनांच्या निर्मितीवर भर देण्यात आला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशसेवेसाठी नेहमी तत्पर असलेल्या आयुध निर्माण कारखाने कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी कोरोना विषाणू विरोधी पोषाख, मास्क, सॅनिटायझर, व्हेंटिलेटर आदींचे निर्माण करत आहे. नुकतेच अरुणाचल प्रदेश सरकारच्या विनंतीवरून अतिशय थोड्या कालावधीत ओएफबीने कोरोनाबाधित रुग्णांसाठी पन्नास विशेष तंबूंची निर्मिती करुन ते रुग्णालयात पाठवले आहेत.

आयुध निर्माण कारखान्यांचा वतीने देशाच्या सहा राज्यातील दहा रुग्णालयांमध्ये २८० विलगीकरण कक्ष उभारण्यात येणार आहेत. यामध्ये जबलपूर, खडकी, इशापूर, कोसीपूर, कानपूर, कमारिया, अंबाझरी, चेन्नईजवळील आवडी, हैद्राबाद येथील मेढक व अंबरनाथ या १० ठिकाणी या वैद्यकीय सोयी करण्यात येतील. त्याचबरोबर बंगळुरूच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्‍स लिमिटेड (एचएएल) येथे तीन बेड्‌सचा अतिदक्षता कक्षासह ३० बेडच्या विलगीकरण कक्षांची सोय आहे. याशिवाय ३० खोल्या असलेली एक स्वतंत्र इमारत तयार करण्यात आली आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार आयुध निर्माण कारखान्यांमध्ये हॅंड सॅनिटायझरचे उत्पादन केले जात आहे. ’एचएलएल’ने नुकतीच तेरा हजार लिटर सॅनिटायझरची मागणी ओएफबीकडे केली आहे. याच अनुषंगाने तामिळनाडूतल्या अरुवनकुडूच्या विस्फोटक फॅक्‍टरीकडून एक हजार ५०० लिटर सॅनिटायझर पाठवण्यात आले आहे. दरम्यान मध्यप्रदेशातील इटारसी आणि महाराष्ट्रातील भंडारा या दोन्ही आयुध कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सॅनिटायझरचे उत्पादन होत असून, दोन्ही कारखान्यांची मिळून एकूण उत्पादन क्षमता दर दिवशी तीन हजार लिटर सॅनिटायझर एवढी आहे. त्यानुसार देशातील सॅनिटायझरची मागणी दोन्ही कारखाने मिळून पूर्ण करु शकतील. 

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा वतीने येत्या दोन महिन्यात तीस हजार व्हेंटिलेटर्सची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍स लिमिटेडने या कामात सहभाग घेतला असून, व्हेंटिलेटर्सची संरचना संरक्षक संशोधन आणि विकास संस्थेकडून देण्यात आली. मेदकच्या आयुध कारखान्याने व्हेंटिलेटर्सच्या दुरुस्तीची जबाबदारी स्विकारली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Ministry of Defense also fought in the Corona