रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट कोरोनासाठी नाही

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 12 April 2020

राज्यात कोरोनाचा वेगाने फैलाव होत आहे. रोगनिदानाचा वेग वाढविण्यासाठी जागतिक पातळीवर आरडीटीच्या वापराबद्दल आग्रह धरला जात आहे. याबद्दल सर्व राज्यांच्या आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे साधलेल्या संवादातून हा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.
कोरोनाचे लवकर निदान होण्यासाठी आरडीटीचा विचार केंद्रीय पातळीवर सुरू आहे.

पुणे - कोरोनाचे निदान करण्यासाठी रॅपिड डायग्नोस्टिक टेस्टचा (आरडीटी) वापर सध्या राज्यात होणार नाही. आरडीटी किटची निवड केंद्रीय आरोग्य खाते निश्‍चित करणार असून, त्यांच्याकडूनच त्याचा पुरवठा राज्याला होईल, असा धोरणात्मक निर्णय शनिवारी घेण्यात आला.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात कोरोनाचा वेगाने फैलाव होत आहे. रोगनिदानाचा वेग वाढविण्यासाठी जागतिक पातळीवर आरडीटीच्या वापराबद्दल आग्रह धरला जात आहे. याबद्दल सर्व राज्यांच्या आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे साधलेल्या संवादातून हा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.
कोरोनाचे लवकर निदान होण्यासाठी आरडीटीचा विचार केंद्रीय पातळीवर सुरू आहे.

त्यासाठी देशभरातून अँटिबॉडीजच्या आधारावर रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट किट निर्माण करण्याऱ्या १६ कंपन्या पुढे आल्या आहेत. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतर्फे (एनआयव्ही) या सर्वांची पडताळणी पूर्ण झाली आहे. त्यापैकी आठ कंपन्यांची गुणवत्ता समाधानकारक असल्याचा अहवाल देण्यात आला आहे, अशी माहिती एनआयव्हीमधील शास्त्रज्ञांनी दिली.

एनआयव्हीच्या अहवालाच्या आधारावर निवडलेल्या कंपन्यांना ड्रग्ज कंट्रोलर जनरल आँफ इंडिया (डीसीजीआय) हे डायग्नोस्टिक कीटच्या उत्पादनाला परवानगी देतील. त्यानंतर त्याचे उत्पादन सुरू होईल, असेही आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोरोनाच्या रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. राज्यातील रुग्ण तपासणीची यंत्रणा वाढविण्यात आली असून, सरकारी आणि खासगी प्रयोगशाळांची संख्या वाढविण्यात येत आहे. या दरम्यान, आरडीटी बद्दल लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही केंद्रीय आरोग्य खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

रॅपीड डायग्नोस्टिक टेस्ट कीटचा पुरवठा केंद्राकडून होणार आहे. त्यानंतरच राज्यात रॅपिड डायग्नोस्टिक टेस्टींग सुरू करणार, अशा स्पष्ट सूचना केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिल्या आहेत.
- डाँ. अर्चना पाटील, संचालक, सार्वजनिक आरोग्य खाते.

रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट कीटच्या माध्यमातून मोठ्या जनसमुहाची तपासणी करणे योग्य ठरू शकते. त्यातून त्या शहरात रोगाचा प्रसार किती, कुठे आणि कुणाला झाला आहे याबरोबरच त्याचा कल समजण्यास मदत होते. पण, रुग्णाच्या रोगनिदानासाठी या चाचणीला जागतिक आरोग्य संघटनेने अद्यापपर्यंत परवानगी दिलेली नाही. 
- हसमुख रावळ, व्यवस्थापकीय संचालक, मायलॅब फार्मास्युटिकल्स कंपनी

अशी होते तपासणी 
रुग्णाच्या घशातील स्त्राव प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठवला जातो. विषाणूमध्ये आरएनए (रायबोन्यूलिक ॲसिड) आहे. त्या आधारावर ‘रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेड पॉलिमरेज चेन रिॲक्‍शन’मध्ये (आरटी-पीसीआर) नेमका कोणता विषाणू आहे, हे ओळखता येते. 

रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट (अँटिजेन)

  • विषाणूंच्या संसर्गाने रुग्णाच्या शरीरात विषाणूजन्य प्रथिने (अँटिजेन) तयार होतात. 
  • श्वसनमार्गातील नमुने घेतल्यानंतर अँटिजेनची माहिती मिळते. 
  • श्वसनमार्गात इन्फ्लुएंझासारख्या विषाणूंचाही संसर्ग असल्यास कोरोनाचे निदान तंतोतंत येण्याची शक्‍यतेवर अभ्यास सुरू

रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट (अँटिबाँडीज)

  • विषाणूच्या संसर्गानंतर प्रतिकार करण्यासाठी रुग्णाच्या रक्तात अँटिबाँडीज तयार होतात
  • अँटिबाँडीजच्या आधारावर कोरोनाचे अचूक निदान करता येते
  • अँटिबाँडीज तयार होण्यासाठी संसर्गापासून आठ ते दहा दिवस लागते असल्याने रोगनिदानाला उशीर

आरोग्य संघटना काय म्हणते

  • प्रयोगशाळांमधील चाचणीला पर्याय म्हणून आरडीटी 
  • आरडीटी अँटिजेन आणि अँटिबाँडीजच्या आधारावर
  • जागतिक आरोग्य संघटनेची (डब्ल्यूएचओ) अँटिबाँडीजच्या आधारावरील टेस्टला रोगनिदासाठी परवानगी नाही 
  • रोगाचा प्रसार किती, हे तपासण्यासाठी आणि साथीच्या संशोधनासाठी वापराची अनुमती

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rapid diagnostic test is not for the corona