उपाय आपल्या हाती आहे! 

सचिन तेंडुलकर 
गुरुवार, 19 मार्च 2020

कोरोना विषाणूच्या साथीने जगाला हादरा दिला आहे. याला कोणत्याही देशाचीच काय; खंडांचीही मर्यादा राहिली नाहीये. मला वाटते की चूक कोणाची, ही चर्चा करण्याचा हा काळ नसून, एकजुटीने संकटाला सामोरे जाण्याचा आहे. 

सुनामी असो वा भूकंप, किंवा ज्वालामुखीचा उद्रेक असो वा वणव्याची धग... इतके दिवस नैसर्गिक संकट किंवा गंभीर समस्या प्रांतापुरत्या, देशापुरत्या मर्यादित होत्या. सगळ्या संकटांना मागे टाकणारे जागतिक संकट आजच्या घडीला आपल्या सगळ्यांसमोर उभे ठाकले आहे. कोरोना विषाणूच्या साथीने जगाला हादरा दिला आहे. याला कोणत्याही देशाचीच काय; खंडांचीही मर्यादा राहिली नाहीये. मला वाटते की चूक कोणाची, ही चर्चा करण्याचा हा काळ नसून, एकजुटीने संकटाला सामोरे जाण्याचा आहे. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

शहरात राहणारे आपल्यासारखे लोक रोजच्या घडीला किती धकाधकीचे आयुष्य जगत असतात. रहाटगाडग्यात आपण असे काही अडकलेलो असतो, की बोलायची सोय नाही. किती धावपळ आपण सगळे करत असतो किंवा किती दडपण रोज घेत असतो हे समजतच नाही, असे ते अंगवळणी पडलेले असते. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळत असताना मी सतत व्यग्र आहे, हे सगळ्यांना समजत होते. त्या वेळी कोणतेही बोलावणे आले आणि जर ते नकोसे असले तर मी क्रिकेट खेळण्यात किंवा पुढच्या सामन्याच्या तयारीत व्यग्र असल्याचे सांगून टाळता यायचे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर बऱ्याच लोकांना वाटू लागले, की ‘आता काय काम आहे सचिनला... आता त्याच्याकडे भरपूर वेळ असेल.’ त्यांना वाटणे स्वाभाविक होते; पण मी निवृत्तीनंतरही कामात किती व्यग्र असतो हे माझे मलाच माहीत. बऱ्याच वेळा मी घरी जरी असलो, तरी सतत कामाचे - विविध जबाबदाऱ्यांचे विचार मनात सुरूच राहतात. ‘गरज नसेल तर बाहेर पडू नका’, असे सरकारने कोरोना विषाणूच्या साथीमुळे सांगितले, तेव्हा मी विचार करू लागलो, की असे कोणतेही काम डोक्यात न घेता घरी कसे बसता येईल? मलाच काय, रोजच्या कामात गुंतलेल्या आपल्या सगळ्यांनाच असे कामाशिवाय घरी बसणे किती कठीण जात आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही. दोन दिवस याच विचारात गेले आणि आता जाणवू लागले आहे, की अशी शांतता महानगरात राहणाऱ्या आपल्या सगळ्यांकरिताच किती गरजेची आहे. 

कुटुंबासाठी वेळ देतो का? 
जरा विचार करून बघा, की आपण कुटुंबीयांना पुरेसा वेळ खरंच देतो का? घरातील ज्येष्ठांबरोबर पुरेसा वेळ घालवतो का? मुलांसोबत सकारात्मक वेळ घालवतो का? त्यांच्याशी संवाद साधतो का? बऱ्याच जणांची या प्रश्नांची उत्तरे नकारात्मक असतील, इतके आपले रोजचे जीवन धकाधकीचे झाले आहे. मला वाटते की कोरोना विषाणूच्या साथीने आपल्याला जी घरात बसण्याची सक्ती झाली आहे, त्याचा ‘वाइटात चांगले’ या विचाराने सकारात्मक उपयोग कसा करता येईल? 
देशाकरिता क्रिकेट खेळत असल्याने मला सारा आणि अर्जुनला लहानाचे मोठे होताना जास्त अनुभवता आले नाही. वेळ मिळेल तसा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला; पण खूप वेळ देणे जमले नाही. लक्षात घ्या की नंतरच्या काळात मुले मोठी झाल्यावर आपल्याला कदाचित वेळ असतो; पण ती शिक्षणात, कामात आपल्यापेक्षा व्यग्र होतात. मग एकत्र वेळ घालवणे परत बाजूला राहते. 

सकारात्मक विचार करा 
कोरोना विषाणूच्या साथीमुळे उद्‍भवलेल्या प्रसंगाचा उपयोग करून घेऊन कुटुंबाबरोबर वेळ कसा घालवता येईल याचा कलात्मक विचार मी करत आहे. सारा - अर्जुनबरोबर मी आणि अंजली पत्ते किंवा कॅरम खेळणार आहोत. पाय पसरून मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. नवे पदार्थ स्वतः करून खायला घालायचा माझा प्रयत्न असणार आहे. माझी विनंती आहे, की तुम्हीपण हे एकदम साधे प्रयत्न करून बघा. 
या काळात आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींची काळजी घेणे जास्त महत्त्वाचे आहे. त्यांचा जनसंपर्क मर्यादित ठेवणे गरजेचे आहे. या काळात आपण सगळ्यांनीच नेहमीची सवय बाजूला ठेवून कमीतकमी लोकांना भेटले पाहिजे. 

सरकारला साथ द्या 
कोरोना विषाणूची साथ आटोक्यात यावी म्हणून सरकार आणि प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. डॉक्टर अहोरात्र मेहनत करून देशसेवा करत आहेत. त्या सगळ्यांना साथ देणे आपले कर्तव्य आहे. घरी बसून किंवा मित्र- मैत्रिणींना, नातेवाइकांना न भेटून चुकल्या चुकल्या सारखे होणार आहे; पण तो संपर्क टाळणे आपल्याकरिताच नाही, तर समाजात ही साथ पसरू नये याकरिता नितांत गरजेचे आहे. आताच्या घडीला आपण ही शिस्त पाळताना आपला नव्हे तर समाजाचा, देशाचा विचार करणे महत्त्वाचे आहे. 

काळजी घ्या, उपचार करून घ्या! 
कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पुसटशी शंका ज्यांना आहे, त्यांनी प्रशासनाला कळवून योग्य उपचार करून घेणे गरजेचे आहे. जे नागरिक परदेशातून नुकतेच आले आहेत, त्यांनी किमान १४ दिवस स्वतः घरात एकांतवासात राहून योग्य देखरेख करणे महत्त्वाचे आहे. ज्यांना कोणतीही बाधा झाली नाही त्यांनी शक्यतो घरी थांबून जनसंपर्क टाळणे अत्यंत गरजेचे आहे. आपण या सर्व प्रयत्नात सातत्य ठेवून सरकार आणि प्रशासनाला मदत करायलाच हवी. 

सरतेशेवटी मी इतकेच म्हणेन, की कोरोना विषाणूची साथ सुरू ठेवणे किंवा संपवणे नागरिक म्हणून आपल्या हाती आहे. म्हटले तर या संकटावर मात करायचा उपाय आपल्या हाती आहे. नियम आणि शिस्त मनापासून पाळली तर कोरोना विषाणूच्या साथीवर मात करणे अशक्य नक्कीच नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sachin tendulkar article on Coronavirus

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: