coronavirus: राज्यातील एकूण रुग्ण संख्या 107; राज्यात 18 नवीन कोरोना बाधित रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

नवीन रुग्णांमध्ये मुंबईचे 6, सांगली, इस्लामपूरचे 4, पुण्यातील 3, सातारा जिल्ह्यातील 2 तर प्रत्येकी 1 रुग्ण नगर, कल्याण - डोंबिवली आणि ठाणे येथील आहे.

पुणे - राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेले नवीन 18 रुग्ण गेल्या चोवीस तासांमध्ये आढळले. त्यामुळे राज्यातील एकून कोरोना बाधित रुग्णांची संख्या 107 झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये मुंबईचे 6, सांगली, इस्लामपूरचे 4, पुण्यातील 3, सातारा जिल्ह्यातील 2 तर प्रत्येकी 1 रुग्ण नगर, कल्याण - डोंबिवली आणि ठाणे येथील आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या नवीन बाधित रुग्णांपैकी सर्वाधिक म्हणजे 8 रुग्णांनी मध्यपूर्वेतील देशांमध्ये प्रवास केला आहे. इतर काही जणांनी अमेरिका, इंग्लंड आणि पेरु या देशात प्रवास केला आहे. दोन जण पूर्वी बाधित आढळलेल्या रुग्णाचे निकट सहवासित आहेत.राज्यात आज एकूण 387 परदेशातून आलेले प्रवासी सर्वेक्षणाखाली दाखल झाले आहेत. राज्यात सध्या 11,097 लोक घरगुती विलगीकरणात ( होम क्वारंटाईन) आहेत. 18 जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत 2531 जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी 2144 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 107 जण पॉझिटिव्ह आले आहेत. 

नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन त्यातील लक्षणे असणा-या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे.याशिवाय भारत सरकारच्या सूचनेनुसार अतिजोखमीच्या देशातून येणा-या प्रवाशांना संस्थात्मक पातळीवर क्वारंटाईन करण्यात येत असून सध्या 880 प्रवासी क्वारंटाईन संस्थामध्ये आहेत. 

परदेशातून आलेल्या लोकांवर बहिष्कार टाकू नका - काही ठिकाणी परदेशाहून आलेल्या आणि होम क्वारंटाईनमध्ये असणा-या व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकणे अथवा त्यांना सोसायटीमधून निघून जाण्यास सांगणे, अशा घटना घडल्याच्या तक्रारी कॉल सेंटरला प्राप्त होत आहेत.परदेशहून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला होम क्वारंटाईन पूर्ण करण्यासाठी सहकार्य करणे, हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे. 

राज्यातील जिल्हा आणि मनपा निहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे - 
अ.क्र. जिल्हा / मनपाबाधित रुग्णमृत्यू 
पिंपरी चिंचवड मनपा :12 
पुणे मनपा :18 
मुंबई 413 मृत्यू 
नवी मुंबई, कल्याण डोंबिवली : 5 
नागपूर, यवतमाळ,सांगली प्रत्येकी : 4 
नगर, ठाणे प्रत्येकी :3 
सातारा : 2 
पनवेल, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, वसई विरार,पुणे ग्रामीण प्रत्येकी : 1 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: total number of corona patients in the maharashtra is 107