Coronavirus : घरातून लढताना... : प्रतिकारशक्तीचा ‘योग’ साधूयात...

मनाली देव, योग प्रशिक्षक
रविवार, 22 मार्च 2020

सध्या संपूर्ण जगच कोरोनामुळे चिंताग्रस्त झाले आहे. अनेकांना घरामध्येच राहावे लागत असले, तरी कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढविण्याला पर्याय नाही. त्यामुळे आपापल्या क्षमतेनुसार योगाभ्यास करायलाच हवा. घरातच योगाभ्यासाच्या मदतीने शारीरिक व मानसिक क्षमता कशा वाढवायच्या, याबद्दल...

सध्या संपूर्ण जगच कोरोनामुळे चिंताग्रस्त झाले आहे. अनेकांना घरामध्येच राहावे लागत असले, तरी कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढविण्याला पर्याय नाही. त्यामुळे आपापल्या क्षमतेनुसार योगाभ्यास करायलाच हवा. घरातच योगाभ्यासाच्या मदतीने शारीरिक व मानसिक क्षमता कशा वाढवायच्या, याबद्दल...

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अशुभस्य कालहरणम्, शुभस्य शीघ्रं
चीनमधून संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरस ‘कोविड १९’बद्दल आपण सर्व ती काळजी घेत आहोत. उदा. वारंवार हात धुणे, खोकताना, शिंकताना तोंडावर रुमाल धरणे, कोणत्याही व्यक्तीशी हस्तांदोलन न करणे, बोलताना कमीत कमी एक मीटरचे अंतर ठेवणे. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालये, कार्यालये, मॉल, बागा आदी बंद ठेवल्याने आपल्याला घरातूनच आपली दैनंदिन कामे करावी लागत आहेत. अशा सर्व परिस्थितीत एक भाग प्रकर्षाने जाणवतो तो म्हणजे, आपण आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवू शकल्यास कोरोनाच काय कोणत्याही व्याधीला, त्या अनुषंगाने तयार झालेल्या परिस्थितीला आपण खंबीरपणे सामोरे जाऊ शकतो. त्यासाठी आता घरी असल्याचा सर्वतोपरी फायदा घेऊयात. योगाभ्यासाच्या सहाय्याने आपण मानसिक संतुलन व शारीरिक क्षमता वाढवूयात. लहान मुले, तरुण वर्ग, नोकरदार मंडळी, वृद्ध यांनी घरच्या घरी वय, प्रकृतीप्रमाणे सूक्ष्म व्यायाम, प्राणायाम, सूर्यनमस्कार, काही शुद्धिक्रिया, योगासने व ध्यान आदींचा सराव करावा.

मुलांसाठी...
लहान मुलांनी शाळेला सुटी मिळाल्याने साधारणत: तासभर घरात व्यायाम, योगाभ्यास नक्कीच करावा. त्यामुळे, दिवसभर तुम्ही उत्साही, तरतरीत राहू शकाल. प्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होईल. मुलांनी घरातच जॉगिंग, दोरीवरच्या उड्या, जोरबैठका यासारखा व्यायाम करावा. 

 • घरामध्येच दररोज १२ सूर्यनमस्कार घालावेत. 
 • भस्त्रिका प्राणायाम, जलदश्वसनाचा सराव करावा. यामुळे श्वसनमार्ग स्वच्छ राहण्यास मदत होईल.
 • ताडासन, अर्धकटी, चक्रासन, अर्धमत्स्येंद्रासन, चक्रासन, उष्ट्रासन, धनुरासन, मत्स्यासन, हलासन आदी आसने करावीत.
 • दीर्घश्वसन करावे. ध्यान करताना श्वासाकडे पूर्ण लक्ष द्यावे. सकारात्मक विचारच मनात असावेत.

तरुणांसाठी...
तरुण वर्ग, नोकरदारांनी दररोज निदान अर्धा तास योगाभ्यासासाठी काढावा. नियमित ओंकार म्हणावेत. 

 • कपालभाती शुद्धिक्रिया करावी. जलनेती, सूत्रनेती येत असल्यास तिचा अभ्यास करावा.
 • दररोज नियमित १२ सूर्यनमस्कार घालावेत.
 • फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढविणारी व मानसिक ताण कमी करणारी काही आसने करावीत. उदा. पर्वतासन, उष्ट्रासन, भुजंगासन, धनुरासन, उत्तानपादासन, मर्कटासन, जठरपरिवर्तनासन, सेतुबंधासन, चक्रासन, त्रिकोणासन इ.
 • आसन शक्य असेल तेवढाच वेळ टिकवावे. कसलीही जबरदस्ती करू नये.
 • अनुलोम-विलोम, नाडीशुद्धी, भ्रामरी हे प्राणायाम नक्की करावेत. 
 • स्वत:ला सकारात्मक सूचना देऊन ध्यान करावे. ‘आम्ही सर्वजण निरोगी, आनंदी आहोत,’ अशी भावना प्रस्थापित करून ध्यान करावे.

ज्येष्ठांसाठी...

 • ज्येष्ठ व्यक्तींनी घरातच चालावे. शक्य आहे त्यांनीच स्वत:च्या प्रकृतीला मानवेल इतपत सूक्ष्म व्यायामप्रकार, प्राणायाम, ध्यान, सोपी आसने करावीत. 
 • आहारावर विशेष लक्ष द्यावे.
 • नेहमी सकारात्मक विचार करा. ध्यान करतानाही सकारात्मकच भावना मनात ठेवा.

‘प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय’
या म्हणीप्रमाणेच आपण आजपासून, आपल्यापासूनच योगाभ्यासाची सुरुवात करूया. शुभस्य शीघ्रम. स्वत:वर विश्वास ठेवा. प्रेम करा. शांत राहा. योग करा. 

(लेखात काही आसनांची छायाचित्रे दिली आहेत. ती बहुतेक सर्वांना करणे शक्य आहेत. परंतु, काही जुने आजार, शस्त्रक्रिया झाली असल्यास योगतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: war to coronavirus in home