राज्यातील खासगी रुग्णालये रूग्णांना का दाखल करून घेत नाहीत?

Covid-19-Certificate
Covid-19-Certificate

पुणे - ‘कोविड 19’ निगेटिव्हचे प्रमाणपत्र असल्याशिवाय राज्यातील खासगी रुग्णालये रूग्णांना दाखल करून घेत नाहीत, हे धोरण त्यांनी परस्पर स्वीकारले आहे. मात्र, हे प्रमाणपत्र रुग्णाने घ्यावेच, असा कोणताही आदेश सरकारने रुग्णालयांना दिलेला नाही, असेही सार्वजनिक आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्याच्या खासगी रुग्णालयांमधील वैद्यकीय सेवेचे दरवाजे बंद होत असल्याच्या अनेक तक्रारी पुढे येत आहेत. रुग्णालयात आलेल्या रुग्णांना रुग्णसेवा द्यावी, असे फतवेही सरकारी अधिकाऱ्यांनी काढले. पण, त्यानंतरही राज्यातील खासगी रुग्णालयांमध्ये दाखल होण्यासाठी ‘कोविड 19’ निगेटिव्हचे प्रमाणपत्राचा आग्रह धरला जात असल्याचे दृष्य राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये दिसते.

हृदय विकार असो की, थॅलिसेमियाचा रुग्ण या प्रत्येकाला कोरोना निगेटिव्ह असल्याचे सुरुवातीला प्रयोगशाळांच्या तपासण्यांमधून सिद्ध करावे लागते. थॅलिसेमियाच्या रुग्णाला नियमित रक्त संक्रमण आवश्यक असते. मात्र, त्यासाठीही आता काही रुग्णालये या प्रमाणपत्राची मागणी करत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.

असे मिळते रुग्णाला प्रमाणपत्र
रुग्णालयात दाखल होण्यासाठी आलेल्या रुग्णाची कोरोना निदान चाचणी केली जाते. त्यासाठी रुग्णालयातील डॉक्टर प्रयोगशाळेला विहीत नमुन्यात अर्ज भरून देतो. रुग्णाच्या घशातील द्रव पदार्थाचे नमुनेही पाठविले जातात. पुढील सात-आठ तासांनंतर रुग्णाला प्रमाणपत्र मिळते.

रुग्ण काय म्हणतात...
एकाच रुग्णालयातून गेले काही वर्षे मी रक्त संक्रमण करत आहे. मात्र, या वेळी कोरोना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र मागितले. त्यासाठी कोरोनानिदान चाचणी करायला लावली. प्रयोगशाळा अहवाल येईपर्यंत रक्त संक्रमण करता येणार नव्हते.

रुग्णालये काय म्हणतात...
कोरोना विषाणूंचा फैलाव बेसुमार वेगाने होतो. रुग्णांवर उपचार सुरू करण्यापूर्वी तो निगेटिव्ह असल्याचा खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना चाचणी करण्यास सांगितली जाते. मात्र, त्यात रुग्ण, रुग्णालय आणि डॉक्टर या तिघांची सुरक्षितता असते.

डॉक्टर काय म्हणतात...
आपत्कालीन वैद्यकीय स्थिती आलेल्या रुग्णावर सर्वप्रथम उपचार करण्यास प्राधान्य दिलेच पाहिजे. पण, त्याच वेळी  डॉक्टरांची सुरक्षितताही महत्त्वाची आहे. सुरक्षितता आणि उपचार यात प्रत्येक वेळी समन्वय साधणे ही सध्याच्या काळाची गरज आहे.

1237 लोकांमागे एक डॉक्टर
पदवीनंतर अँलोपॅथीच्या डॉक्टरांची नोंदणी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे होते. डिसेंबर 2019 पर्यंत राज्यात एक लाख 56 हजार 71 (त्यापैकी 69 हजार 122 पदव्युत्तर अँलोपॅथी ) डॉक्टरांनी नोंदणी केली असून, 99 हजार 522 ) डॉक्टरांनी नोंदणीचे नूतनीकरण केले आहे. राज्यातील नोंदणीकृत परवाना नूतनीकरण केलेल्या ) डॉक्टरांच्या आकडेवारीनुसार एक हजार 237 लोकांमागे एक ) डॉक्टर आहे.

खासगी आरोग्य व्यवस्था
राज्यात सरकारी आरोग्य व्यवस्थेच्या तुलनेत खासगी वैद्यकीय सेवेत उपचारांसाठी जाणाऱ्या रुग्णांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे कोरोनाच्या उद्रेकातही सरकारी रुग्णांएवजी खासगी रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी रुग्ण प्राधान्य देत असल्याचे दिसते.

रुग्णालयांनी उपचारापूर्वी कन्सेंट फाॅर्ममध्ये कोरोनानिदान चाचणीचा स्पष्ट उल्लेख करावा. त्या मागची कारणेही रुग्णालयातर्फे नातेवाईकांना स्पष्ट करावीत.  डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी हे आवश्यक आहे.
- डॉ. अविनाश भोंडवे, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य

ज्याच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे अशा रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झालेला आहे की नाही, याची निश्‍चित माहिती डॉक्‍टरांना नसते. त्यामुळे त्यांना संसर्गाचा धोका असतो. तसेच, असा रुग्ण शस्त्रक्रियेनंतर पॉझिटिव्ह झाल्यास त्याला जबाबदार कोण, या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. पण, आपत्कालीन स्थितीत कोरोनानिदान चाचणीत शस्त्रक्रियेला उशीर होणार नाही, याची काळजी घेणे अत्यावश्‍यक आहे.
- डॉ. संजय पाटील, अध्यक्ष, आयएमए हॉस्पिटल बोर्ड

पुण्यातील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करताना कोविड 19 निगेटिव्ह प्रमाणपत्र मागितले जात नाही. सर्व प्रकारची वैद्यकीय सुविधा रुग्णालयांमधून दिली जात आहे. कोरोनाचे रुग्ण दाखल केले जातात. त्यांच्यासाठी अतिदक्षता विभाग सज्ज ठेवले आहेत,
- मंजूषा कुलकर्णी, सचिव, असोसिएशन आँफ हाँस्पिटल्स पुणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com