Coronavirus : इंदापूर तालुक्यातील तब्बल पाच हजार जण...

राजकुमार थोरात
Thursday, 2 April 2020

इंदापूर तालुक्यामध्ये पुणे, मुंबई व परदेशातून आलेल्या ५ हजारांपेक्षा जास्त नागरिकांना सक्तीने होम क्वारंटाईन केले असून, या नागरिकांवर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे.

वालचंदनगर : कोरोनाचा वाढता प्रार्दुभावाच्या पाश्‍र्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील प्रशासनाने  इंदापूर तालुक्यामध्ये तीन ठिकाणी स्वतंत्र विलगीकरण कक्ष सुरु केले आहेत. राज्यामध्ये विशेषत: मुंबईमध्ये कोरोना च्या रुग्णामध्ये झपाट्याने वाढ झाल्याने प्रशासनाने ग्रामीण भागामध्ये उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे.

इंदापूर तालुक्यामध्ये पुणे, मुंबई व परदेशातून आलेल्या ५ हजारांपेक्षा जास्त नागरिकांना सक्तीने होम क्वारंटाईन केले असून, या नागरिकांवर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. तालुक्यामध्ये कोरोना रुग्ण आढळल्यास किंवा संशयित रुग्णावर उपचार करण्यासाठी इंदापूर शहरामध्ये दोन ठिकाणी विलगीकरण कक्ष सुरु केले असून, यामध्ये ८० रुग्णांवर उपचार करणे शक्य आहे. तसेच इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये वालचंदनगरमध्ये विलगीकरण कक्ष आज गुरुवार (ता.२) पासून सुरु केले. यामध्ये ४० रुग्णांची व्यवस्था करणे शक्य होणार आहे. हा कक्ष सुरु करण्यासाठी वालचंदनगर कंपनीने हॉस्पिटलची इमारत उपलब्ध करुन दिली असून, लालचंद हिराचंद मेडिकल सेंटरमध्ये विलगीकरण कक्ष सुरु झाला आहे.

शासकीय डॉक्टरांच्या अधिपत्याखाली विलगीकरण कक्षाचे काम सुरु राहणार असून, गरज पडल्यास खासगी डॉक्टरांची ही मदत घेण्यात येणार आहे. राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी विलगीकरण कक्षाची पाहणी करुन तालुक्यातील आरोग्य विभागाचा आढावा घेतला. यावेळी भरणे यांनी सांगितले की, कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी घरीच थांबणे गरजे आहे.

अतिमहत्वाचे काम असले तरच घराबाहेर पडावे. प्रशासनावर ताण येईल असे कृत्य करु नये. तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला जंतुनाशक फवारणी करण्यासाठी सोडियम क्लाराईड व इतर औषधे उपलब्ध करुन दिली आहेत.  

प्रत्येकाने कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन केले. यावेळी इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी, गटविकासधिकारी विजयकुमार परीट, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेखा पोळ, साहय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार, वालचंदनगर कंपनीचे  धीरज केसकर, आनंद नगरकर , आशुतोष मिश्रा, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील,उपसरपंच हर्षवर्धन गायकवाड,राजेश जामदार,शैलेश फडतरे,सुनिल खुडे उपस्थित हाेते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 5 Thousand Peoples of Indapur are Home Quarantine