#Lockdown2.0 : लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात वडगाव मावळमध्ये १०५ जणांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 April 2020

लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात वडगाव पोलिसांनी नियमांचा भंग करणाऱ्या १०५ जणांवर कारवाई करून गुन्हे दाखल केले. ७६ गाड्याही जप्त केल्या. अवैध दारू विक्रीचे दहा गुन्हे नोंदवले. वडगाव न्यायालयाने १८ जणांना पाचशे ते हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

वडगाव मावळ - लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात वडगाव पोलिसांनी नियमांचा भंग करणाऱ्या १०५ जणांवर कारवाई करून गुन्हे दाखल केले. ७६ गाड्याही जप्त केल्या. अवैध दारू विक्रीचे दहा गुन्हे नोंदवले. वडगाव न्यायालयाने १८ जणांना पाचशे ते हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लॉकडाऊन काळात वडगाव पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेऊन तीन ठिकाणी नाकाबंदी केली आहे. पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात दोन अधिकारी व ३३ कर्मचारी तसेच  पोलीस अधिक्षक यांचेकडून मिळालेले एक अधिकारी व २० कर्मचारी असे एकूण ४ अधिकारी व ५३ कर्मचारी असा बंदोबस्त लावून लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी केली. पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी  गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली कारवाई केली. 

पोलीस निरीक्षक निंबाळकर यांनी  सर्व अधिकारी व कर्मचारी यांना रोटेशन प्रमाणे ड्युटी वाटप करून तसेच त्यांचे आरोग्य व इतर अडीअडचणी यांचा विचार करून त्यांच्या कर्तव्य क्षमतेचा वापर करून घेतला. कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, सॅनिटायझर व मास्क वाटप तसेच पोलीस स्टेशन समोर प्रवेश करताना सॅनिटायझर रूम अशी व्यवस्था केली आहे. 

नाकाबंदी मध्ये उमरगा ( उस्मानाबाद ) येथे होम क्वारंटाईन केलेले व अवैध प्रवास करत असलेले सोळा प्रवासी पकडण्यात आले. तपासणी करत असताना परदेशातून आलेली व सातारा येथे गेलेल्या महिलेची माहिती सातारा पोलिसांना कळविली तेव्हा तिची तपासणी केल्यावर ती करोना पॉझिटिव्ह निघाली.

पोलिस ठाण्याच्या हद्दीत कामगार विषयक, जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबद्दल अथवा कंपन्या संदर्भात  कोणत्याही अडचणी निर्माण झाल्या नाहीत अथवा हद्दीतून कोणीही अवैध स्थलांतर केले नाही.

महसूल, नगरपंचायत, आरोग्य विभाग, गावपातळीवर ग्रामपंचायत व शासनाच्या इतर विभागांबरोबर समन्वय राखण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action against 105 persons in Wadgaon Maval in the first phase of lockdown