Coronavirus : रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी गरज प्रगत व्हेंटिलेटरची

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 April 2020

प्रगत व्हेंटिलेटरची गरज का?
कोरोनाच्या संसर्गाने अत्यवस्थ झालेल्या रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी प्रगत व्हेंटिलेटर हे प्रभावी अस्त्र आहे. उपचार करताना सामान्य व्हेंटिलेटरला मर्यादा येतात. व्हेंटिलेटर म्हणजे उपचार नाही, हे सर्वप्रथम लक्षात घ्यावे. निश्‍चित रोगनिदान होत असताना रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी ही एक प्रकारची सपोर्ट सिस्टिम आहे. त्यामुळे डॉक्‍टरांना अचूक रोगनिदान आणि त्यानुसार उपचाराची दिशा ठरविण्यासाठी काही वेळ मिळतो. ग्णाच्या शरीरातील प्राणवायूचे प्रमाण व्यवस्थित ठेवण्यासाठी प्रगत व्हेंटिलेटरची गरज असते, असे इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसीन संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. शिरीष प्रयाग यांनी सांगितले.

पुणे - कोरोना विषाणूंच्या संसर्गाने अत्यवस्थ झालेल्या रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी प्रगत व्हेंटिलेटरच्या पुरवठ्याकडे लक्ष देण्याची वेळ आता आली आहे. लॉकडाउनमुळे ठप्प झालेल्या आर्थिक व्यवस्थेप्रमाणेच प्रगत व्हेंटिलेटर रुग्णांना गरजेच्या वेळी उपलब्ध असावेत, असे मत वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

बातम्या ऐकण्यासाटी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येच्या दुपटीचा वेग मंदावल्याचे आशादायक चित्र गेल्या दोन दिवसांपासून दिसत आहे. मात्र, त्याच वेळी इराण, इटली, न्यूयॉर्क येथील थरकाप उडविणाऱ्या दृश्‍यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तेथील रुग्णालये कोरोनाबाधितांनी भरली आहेत. रुग्णांसाठी व्हेंटिलेटर कमी पडत आहेत. या पार्श्‍वभूमीवर अत्यवस्थ रुग्णांना उपचारांत उपयुक्त ठरतील, अशी प्रगत व्हेंटिलेटर सज्ज असतील, याकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला. 

व्हेंटिलेटरचे कार्य
आपण श्‍वास आत घेतो त्यावेळी फुप्फुसाचे स्नायू फुगतात. त्यातून आत घेतलेल्या हवेमुळे छातीच्या पोकळीत निगेटिव्ह प्रेशर तयार होते. याला व्हेंटिलेशन असे म्हणतात. सामान्य व्हेंटिलेटरमुळे फुप्फुसात हवा फक्त ढकलली जाते. त्यासाठी श्‍वसनमार्गात ट्यूब टाकून रुग्ण श्‍वासोच्छ्वास करतो.   

सामान्य व्हेंटिलेटरच्या मर्यादा
कोरोनाच्या संसर्गामुळे रुग्णाला ॲक्‍यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (एआरडीएस) तयार होतो. त्यातून फुप्फुसे कमकुवत होतात. सामान्य व्हेंटिलेटर निरोगी फुप्फुसांना यांत्रिक बळ देतात. ‘एआरडीएस’मध्ये अकार्यक्षम फुफ्फुसांचे कार्य करणाऱ्या व्हेंटिलेटरची गरज असते. त्यामुळे सामान्य व्हेंटिलेटरला मर्यादा पडते. कारण, या रुग्णाला फक्त ऑक्‍सिजन द्यायचा नसतो, तर फुप्फुसाचे कार्य करणाऱ्या व्हेंटिलेटरची गरज असते.

प्रगत व्हेंटिलेटरची वैशिष्ट्ये

  • व्हेंटिलेटरमध्ये इलेक्‍ट्रॉनिक सेन्सर 
  • फुप्फुसाचे कार्य दर्शविणारे मॉनिटर
  • रुग्णाच्या बदलत्या गरजांप्रमाणे मशिनमध्ये होणारे बदल
  • फुप्फुसांना व्हेंटिलेटरमुळे इजा होऊ नये याची दक्षता घेणारी अलार्म यंत्रणा
  • रुग्णाच्या फुप्फुसाचे कार्य नियंत्रित करण्याची सुविधा
  • व्हेंटिलेटरमधील व्हॉल्व्हच्या माध्यमातून श्‍वासोच्छ्वासास मदत होते

अत्यवस्थ रुग्णाला व्हेंटिलेट करण्यासाठी सर्वांत अवघड असतो. कोरोनामुळे होणारी गुंतागुंत ही या प्रकारातील आहेत. त्यामुळे साधे व्हेंटिलेटर कोरोनाबाधिताला उपयुक्त ठरणार नाही. कारण, यात रुग्णाच्या फुफ्फुसाला संसर्ग झालेला असतो. 
- डॉ. शिरीष प्रयाग, माजी अध्यक्ष, आयएससीसीएस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Advanced ventilators needed to save patients lives