बातमी पलीकडे : हेही दिवस जातील...!

संभाजी पाटील
Sunday, 12 April 2020

वुहानमधील ७६ दिवसांचे लॉकडाउन संपल्याच्या रात्री चीनमधील शेन्झेन शहरात एक हजार ड्रोन्सने आकाशात एकत्र सादरीकरण करून कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्‍टर, नर्सेस, पोलिस आदी यंत्रणांचे आभार तर मानले, पण सोबतच ‘विंटर हॅज पास्ड, स्प्रिंग इज कमिंग’ या शब्दांनी जगभरातील कोरोनाशी लढणाऱ्या प्रत्येकाला सकारात्मकतेचे बळ दिले. हा आनंद साजरा करण्यासाठी आपल्याला निश्‍चितच वाट पहावी लागणार आहे. संयमाचा बांध ढळू न देता घरात राहून अगदी ‘डट के सामना’ करावा लागेल.

वुहानमधील ७६ दिवसांचे लॉकडाउन संपल्याच्या रात्री चीनमधील शेन्झेन शहरात एक हजार ड्रोन्सने आकाशात एकत्र सादरीकरण करून कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्‍टर, नर्सेस, पोलिस आदी यंत्रणांचे आभार तर मानले, पण सोबतच ‘विंटर हॅज पास्ड, स्प्रिंग इज कमिंग’ या शब्दांनी जगभरातील कोरोनाशी लढणाऱ्या प्रत्येकाला सकारात्मकतेचे बळ दिले. हा आनंद साजरा करण्यासाठी आपल्याला निश्‍चितच वाट पहावी लागणार आहे. संयमाचा बांध ढळू न देता घरात राहून अगदी ‘डट के सामना’ करावा लागेल.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लॉकडाउन संपल्यानंतर वुहानमधील नागरिकांनी आता रोज रस्त्यावर होणारे ‘ट्रॅफिक जॅम’ सेलिब्रेट करायला सुरवात केली आहे. चीनमधल्या इतर शहरांनी वुहानच्या या आनंदात सहभागी होत, पुन्हा एकदा नव्याने जगू पाहणाऱ्या आपल्या देशाचं मनोबल वाढवायला सुरवात केली आहे. वुहानचे हे कौतुक एवढ्यासाठीच की, आपल्यापैकी प्रत्येक जण ‘लॉकडाउन’ संपवून सर्वसामान्य जीवन जगण्यासाठी उत्सुक आहे. पण, वुहानला हे यश मिळाले ते ७६ दिवसांच्या चीनी प्रशासनाच्या कडक लॉकडाउनच्या परिश्रमानंतर. आपले २१ दिवसपूर्ण व्हायला अजून दोन दिवस बाकी आहेत. प्रत्येकाने स्वत:लाच प्रामाणिक प्रश्‍न विचारा आपण पाळलेले ‘लॉकडाउन’ खरोखरच चीनसारखे होते का? मार्केट यार्डात भाजी खरेदी असो किंवा किराणामाल, आपण मोठमोठ्या रांगा लावून खरेदीसाठी सरसावलो होतो.

पुण्यातील परिस्थिती खरोखरच गंभीर अशीच आहे. गेल्या रविवारी कोरोना बाधितांची संख्या ८२ होती तर केवळ दोघांचा मृत्यू झाला होता. आज बाधितांचा आकडा २४१ तर मृतांची संख्या २८ वर पोचली आहे. आठ दिवसांत आपण कुठे पोचलो आहोत, याची बेरीज-वजाबाकी करा. ही वाढ गुणाकार पद्धतीने होत आहे. याच कारणासाठी पुण्यातील पेठा आणि कोंढवा पूर्ण सील केला आहे. तरीही बाधितांची आणि मृतांची संख्या वाढतच आहे, त्यामुळेच लॉकडाऊन वाढविण्याची वेळ आपल्यावर येऊन ठेपली आहे.

दोन दिवसांपूर्वी ‘सकाळ’ने आपल्या बातमीदारांच्या माध्यमातून एक सर्व्हे केला. लॉकडाऊनच्या काळात नागरिक घराबाहेर का पडतात?, याची तपासणी केली. सोसायट्यांनी ठेवलेल्या नोंदवह्या पाहिल्या तर त्यात ९० टक्के नागरिक हे भाजीपाला, किराणा, औषधे या नावाखाली बाहेर पडलेली दिसली. मेडिकल दुकानांत चौकशी केली तर बी १२ पासून रोगप्रतिकार शक्‍ती वाढविणारी औषधे, टॉनिक घेणाऱ्यांची संख्या अधिक होती. थोडक्‍यात अजूनही आपण कोरोनाला एकदम लाईटली घेतले आहे. तो माझ्या घरात येऊच शकत नाही, असा फाजील आत्मविश्‍वास बाहेर पडणाऱ्या प्रत्येकात आहे. कोरोनाची बाधा ज्येष्ठ नागरिकांमध्ये किंवा ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, अशांना होत असल्याचा आतापर्यंतचा निष्कर्ष आहे, पण शुक्रवारी पुण्यात एका ३० वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला, जो श्रीरामपूरहून आला होता. याचा अर्थ सरळ आहे, कोरोनाबाबत अद्यापही कोणतेही ठोस निष्कर्ष मांडता आलेले नाहीत, आतापर्यंतचे केवळ ठोकताळे आहेत, त्यामुळे कोरोना आपल्याला होणार नाही, असे गृहीत धरून चालणार नाही. 

दूध, भाजीपाला, किराणा, औषधे नक्कीच लागणार आहेत, पण हे साहित्य आठ-दहा दिवसांचे एकदम आणण्याचा पर्याय निवडला पाहिजे. आता या गोष्टी कधी मिळणारच नाहीत, असे समजून भीतीपोटी केली जाणारी खरेदी खूप आहे. या भीतीचा गैरफायदा किमती वाढवून दलालांनी घेतला आहे. रेशनवरील धान्य असेल किंवा बाजारातील धान्य, भाजीपाला, दुधाचा पुरवठा ही साखळी व्यवस्थित राखण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. पण स्वत:हून बाहेर न पडण्याची जबाबदारी कोणाची? त्यामुळे येत्या १५ दिवसांत वुहानसारखे खरेखुरे ‘लॉकडाउन’ पाळूयात आणि पुन्हा एकदा नवी सुरवात, नवे सेलिब्रेशन करण्याची तयारी करूयात !


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article sambhaji patil on lockdown