बारामती शहर आणि तालुका सीलबंद; पण...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 April 2020

- बारामती शहर व तालुका आजपासून सीलबंद करणार

- अत्यावश्यक सेवांना वगळणार

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार आजपासून बारामतीत कोरोनामुक्तीसाठी भिलवाडा पॅटर्ननुसार कामकाज करण्याचा निर्णय झाला. बारामतीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय झाला. बारामती शहरच आजपासून पोलिसांकडून सीलबंद करण्यात येणार असून, बारामती शहरात बाहेरून येणारे सर्व रस्ते अत्यावश्यक सेवांची वाहने वगळून इतरांसाठी सील करण्यात येणार आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अजित पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी हनुमंत पाटील, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, मुख्याधिकारी योगेश कडुसकर, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, डॉ. सुनील दराडे, डॉ. सदानंद काळे आदी या प्रसंगी उपस्थित होते. 

कोरोनामुळे एका भाजीविक्रेत्याचा मृत्यू झाल्यानंतर आता प्रशासनाने अजित पवार यांच्या सूचनेनुसार कडक उपाययोजना हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. रस्त्यावर विनाकारण फिरताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असून, पोलिसांकडून दिलेल्या पासेसचाही फेरआढावा घेतला जाणार असून, अनावश्यक पासेस रद्द केले जाणार आहेत. नागरिकांनी रस्त्यावर येऊ नये, यासाठी सर्व नियोजन केले जात आहे. 

औषधे, अन्नधान्य, दूध व जीवनाश्यक वस्तूंसाठी लोकांनी घराबाहेर पडण्यापेक्षा लोकांना ती घरपोच कशी देता येईल, या दृष्टीनेही नियोजन करण्यात आले असून, नगरपालिका क्षेत्रात वॉर्डनिहाय दुकानांची नावे व त्यानुसार जबाबदारीचे वाटप केले जाणार आहे. 

कोरोनाबाधित रुग्ण ज्या परिसरात आढळले आहेत. त्या भागातील सर्वांच्याच किमान तीनदा तपासण्या होणार आहेत. 161 व 89 पथके कार्यरत आहेत, त्यांच्यामार्फत या तपासण्या होतील. स्वस्त धान्य दुकानातून सर्वांना तीन महिन्यांचे धान्य पुरविण्याचेही नियोजन या बैठकीत केले गेले. या कामाचे समन्वयन तहसिलदार विजय पाटील करतील. कृषीविषयक बाबींचे नियोजन उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे करणार आहेत. 

होम कोरोटांईन केलेल्यांना कोणत्याही परिस्थितीत बाहेर जाता येणार नाही, याची जबाबदारी आरोग्य विभागावर सोपविण्यात आली आहे. ज्यांना निवारा नाही त्यांना सांस्कृतिक केंद्रात नेऊन त्यांची सोय करणे. मुलांनी रस्त्यावर क्रिकेट खेळण्यासह घराबाहेर पडण्यासही आता मनाई केली जाणार असून, नीरा डावा कालव्यावर पोहोण्यासाठी जाणाऱ्या युवकांनाही आता कारवाईला सामोरे जावे लागेल. अंत्यविधी करतानाही गर्दी होणार नाही. किमान लोकात ही प्रक्रीया पार पाडावी, असेही या बैठकीत ठरविण्यात आले. 

रस्त्यावरील मास्क विक्रेत्यांनाही आता हटविण्यात येणार आहे, या शिवाय अनावश्यक रितीने पेट्रोल भरणाऱ्यांचीही आता माहिती मागविली जाणार आहे. एटीएमच्या ठिकाणी सॅनिटायझर्सचा वापरही आता अनिवार्य केला जाणार आहे. ज्या बँकात गर्दी होणार आहे, त्या बँकेने गर्दी कमी होण्याचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांना देण्यात येणार आहे. शहरात सॅनिटायझर टनेल करण्याच्या दृष्टीनेही चर्चा झाली असून, त्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baramati City and Taluka will Seal from Today