पुणे शहरासह जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी समित्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

शहर आणि ग्रामीण भागात अन्नधान्याचा व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होणे आवश्यक आहे.

पुणे - पुणे शहरासह जिल्ह्यात अन्नधान्याचा आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी तसेच साठेबाजी रोखण्यासाठी जिल्हा आणि तालुका पातळीवर अन्नधान्य वितरण नियंत्रण समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात जमावबंदी जाहीर केली आहे. त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागात अन्नधान्याचा व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्हा तालुका आणि गाव पातळीवर कृती समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. शहरी भागासाठी अन्नधान्य वितरण अधिकारी तर ग्रामीण भागासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी हे या कृती समितीचे अध्यक्ष असतील. या समितीमध्ये उपविभागीय कृषी अधिकारी, पुणे महापालिकेचे विभागीय अधिकारी , पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव, गॅस वितरक संघ, पेट्रोल-डिझेल संघ, भुसारी व्यापार संघ आणि उपनिबंधक सहकारी संस्था यांचा समावेश करण्यात आला आहे. 

कोरोनाशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

समितीवरील जबाबदारी 
शहरासह ग्रामीण भागातील किराणा तसेच रेशन धान्य दुकाने, मेडिकल दुकाने सुरू राहतील तसेच भाजीपाला आणि दूध विक्री चालू राहिल याबरोबरच नागरिकांना आवश्यक सुविधा मिळण्यास अडचण येणार नाही या दृष्टीने समित्यांकडून तपासणी करण्यात येईल. 
अनावश्यक खासगी वाहने रस्त्यावर फिरण्यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. 
प्रभागातील सार्वजनिक ठिकाणी निर्जंतुकीकरण करून घेण्यासाठी प्रशासनाच्या सहकार्याने कार्यवाही करणे, 
तसेच, कार्यक्षेत्रात परदेशातून आलेले प्रवासी आणि बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत विलगीकरण कक्षात ठेवून तपासणी करण्यासाठी स्थानिक यंत्रणा उभी करण्याची जबाबदारीही या समित्यांवर राहणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Committees to regulate the supply of essential goods