Coronavirus : पुणे जिल्ह्यात कोरोनाविरूद्धच्या लढ्यात १०० खासगी उद्योगांचे योगदान

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 April 2020

कोरोना विरूद्धच्या लढ्यात पुणे जिल्ह्याच्या परिसरातील सुमारे १०० खासगी उद्योग सीएसआर निधी, वस्तू किंवा देणगी स्वरुपात योगदान देत अाहेत. त्यामुळे, विविध रुग्णालयांना पीपीई कीट, मास्क यासारख्या अत्यावश्यक वस्तू पुरविणे शक्य होत आहे.

पिंपरी - कोरोना विरूद्धच्या लढ्यात पुणे जिल्ह्याच्या परिसरातील सुमारे १०० खासगी उद्योग सीएसआर निधी, वस्तू किंवा देणगी स्वरुपात योगदान देत अाहेत. त्यामुळे, विविध रुग्णालयांना पीपीई कीट, मास्क यासारख्या अत्यावश्यक वस्तू पुरविणे शक्य होत आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाग्रस्त रूग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिकांना वैयक्तिक सुरक्षा साधनांची गरज भासत आहे. त्यामध्ये, मुख्यत्वे पीपीई कीट, एन-९५ , थ्री प्ले मास्क यासारख्या बाबींचा समावेश आहे. हे लक्षात घेऊन खासगी उद्योगांच्या मदतीने या रूग्णालयांना कशा प्रकारे त्याचा पुरवठा करता येईल यावर जिल्हा प्रशासन भर देत आहे. 

उद्योग सहसंचालक (पुणे विभाग) एस.एस. सुरवसे म्हणाले, "रुग्णालयांसाठी अत्यावश्यक वस्तूंचा सुरळीत पुरवठा रहावा यादृष्टीने आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून पीपीई कीट उत्पादक कंपन्यांना परवानग्या दिल्या. त्यांच्या कामगारांना पासेस उपलब्ध करून देण्यात आले. त्यांच्या सर्व आवश्यक पूरक व्यवस्था सुरू केल्या. मास्क, सॅनिटाइजर संबंधित युनिट चालू केले आहेत. साखर कारखान्यांना ही सॅनिटाइजर निर्मिती साठी परवानग्या देण्यात आल्या. विविध खासगी उद्योगांशी संपर्क साधून त्यांच्या सीएसआर निधीतून रुग्णालयांच्या गरजांची पूर्तता करता येईल काय? हे पाहिले जात आहे. त्याला खासगी उद्योगांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे. सीएसआर निधीबरोबरच काही उद्योग देणगी आणि वस्तू स्वरूपात देखील मदत करत आहेत.'

सध्या सॅनिटाइजरचा भरपूर साठा उपलब्ध असल्याचे सांगून सुरवसे म्हणाले, "पूर्वी पीपीई, एन-९५ मास्क मिळण्यात अडचणी येत होत्या. परंतु, आता या वस्तू मिळू लागल्या आहेत. आतापर्यंत आम्ही विविध रूग्णालयांना १० हजार पीपीई कीट आणि ३५ हजार एन-९५ मास्क पुरविण्यात यश मिळविले आहे. आैंध उरो रूग्णालयांत मध्यवर्ती भांडार सुरू करण्यात आले असून त्यामार्फत वैद्यकीय उपचारासाठी गरजेच्या वस्तू स्विकारून जात आहेत. काही उद्योगांनी त्यांच्या कामगारांचे पोशाख, गॉगल्स, बूट देखील रूग्णालयांतील कामगारांसाठी दिले आहेत."


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Contributing to the Private Enterprise in the Fight Against Corona