कोरोनाचे संकट धडकल्याने महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे आणि हिलस्टेशन लॉकडाउन

भाऊ म्हाळसकर - सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 23 April 2020

पर्यटक प्रवेश प्रतिबंधित झाल्याने पूर्ण पर्यटन व्यवसायच कोलमडून गेल्याची स्थिती सध्या निर्माण झाली आहे.लोणावळ्यात सुट्ट्यांच्या काळातील पर्यटकांची संख्या रोडावली आहे.सध्या सर्वत्र शुकशुकाट जाणवत आहे.

लोणावळा - लोणावळा आणि खंडाळा ही दोन्ही पर्यटनस्थळे नेहमी गजबजलेली असतात. मात्र, यंदा कोरोनाचे संकट धडकल्याने महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे आणि हिलस्टेशन लॉकडाउन झाली. येथील सर्वांत गजबजलेला भाग असणारा लायन्स पॉइंट, खंडाळा येथील राजमाची, सनसेट पॉइंटसह, कार्ला, भाजे लेणींसह, गड-किल्ल्यांसह सर्व पर्यटनस्थळे निर्मनुष्य झाली असून, सजलेली बाजारपेठही पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पर्यटक प्रवेश प्रतिबंधित झाल्याने पूर्ण पर्यटन व्यवसायच कोलमडून गेल्याची स्थिती सध्या निर्माण झाली आहे. लोणावळ्यात सुट्ट्यांच्या काळातील पर्यटकांची संख्या रोडावली आहे. सध्या सर्वत्र शुकशुकाट जाणवत आहे. पर्यटकांनी पाठ फिरविल्याने येथील सर्व व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

प्रमुख हंगाम 
लोणावळा, खंडाळ्यात साधारणपणे एप्रिल ते ऑगस्ट, ऑक्‍टोबर ते फेब्रुवारी हा येथील पर्यटनाचा हंगाम मानला जातो. पावसाळ्यातील जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांमध्ये पर्यटकांची दररोज सरासरी लाखाच्या घरात गर्दी असते. 

हॉटेल, रिसॉर्टस्‌ व्यवसायास फटका 
पुण्या-मुंबई, गुजरातसह देशभरातून लाखो पर्यटक मोठ्या संख्येने येतात. लोणावळा, खंडाळा परिसरात लहान मोठी जवळपास दोनशे हॉटेल आणि रिसॉर्टस्‌ आहेत. मार्चमध्ये परीक्षांचा हंगाम संपताना एप्रिल व मे महिन्यासाठी पर्यटक आगाऊ आरक्षण करतात. मात्र, कोरोनाच्या धसक्‍याने आतापर्यंत हॉटेल्समधील जवळपास अडीच हजारांहून अधिक खोल्यांचे बुकिंग एक मार्चपासून रद्द करण्यात आले आहे. हॉटेल व्यावसायिक व कर्मचारी मिळून जवळपास आठ ते दहा हजार जणांना याचा फटका बसला आहे. येणाऱ्या हंगामात पर्यटकांची शाश्वती नसल्याने हॉटेल व लॉज व्यावसायिक हैराण झाले आहेत. 

चिक्की उत्पादन ठप्प 
चिक्की व्यवसायाचे भवितव्य पर्यटनावर असते. पर्यटन वाढले तर चिक्की उत्पादकांसह व्यावसायिकांना आर्थिक फायदा होतो. लोणावळ्यात प्रामुख्याने पंधरा चिक्की उत्पादक असून, दुकानदार, विक्रेते असे जवळपास सहाशेच्या घरात आहेत. त्याचबरोबर केवळ पावसाळी हंगामात हंगामी स्वरूपात चिक्की विक्री करणाऱ्यांची संख्या शेकडोंच्या घरात आहे. मात्र, कोरोनामुळे चिक्की उत्पादन पूर्णपणे ठप्प झाले आहे. चिक्की खरेदीत जवळपास नव्वद टक्के वाटा मुंबई आणि इतर ठिकाणांहून आलेल्या पर्यटकांचा असतो. बाजारपेठ थंड झाल्याने चिक्की उत्पादकांसह विक्रेते आणि कामगारांवर संक्रांत आली आहे. व्यवसाय ठप्प झाल्याने पर्यटननगरीचा अर्थव्यवस्थेसह कामगार वर्गाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. 

रिक्षा, टॅक्‍सीचालकांवर उपासमार 
लोणावळा, खंडाळ्यात रिक्षा आणि टुरिस्ट टॅक्‍सी सेवा पुरविणाऱ्यांची संख्या जवळपास दीड हजार आहे. पर्यटकनगरीत शुकशुकाट असल्याने टॅक्‍सी सेवेवर पर्यायाने येथील स्थानिक नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यात बहुतांशी व्यावसायिकांनी कर्ज काढून गॅसवर चालणारी नवीन वाहने खरेदी केली आहे. त्यामुळे आगामी काळात कर्ज फेडायची कसे असा प्रश्न? या व्यावसायिकांपुढे आहे. 

""रिसॉर्टचे आगाऊ आरक्षण सध्या थांबलेले आहे. पर्यटक कोणताही धोका घेण्यास तयार नसल्याने लॉकडाउन काढल्यानंतर पुढील दोन महिने वाट पहावी लागणार आहे. नवीन हंगाम आणि आगाऊ आरक्षणाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. हॉटेल इंडस्ट्री पूर्ण ठप्प झाली असून, सरकारच्या वतीने मदतीचा बूस्टर देण्याची गरज आहे.'' 
- अल अजहर कॉन्ट्रॅक्‍टर, अध्यक्ष, लोणावळा हॉटेल असोसिएशन 

""लोणावळ्यात कोरोनाचा अद्याप एकही संशयित सापडलेला नाही, ही आशादायक बाब आहे. नगरपरिषदेच्या वतीने संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारी घेण्यात आली असून, दीड महिन्यांपूर्वी येथील सर्व पर्यटनस्थळे बंद करण्यात आली आहे. पुण्या-मुंबईहून येणाऱ्यांवर सध्या विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.'' 
- सुरेखा जाधव, नगराध्यक्षा, लोणावळा नगरपरिषद 

""कोरोनामुळे शहरात सध्या पर्यटक नसल्याने गाड्या जाग्यावर उभ्या आहेत. त्यामुळे खायचे वांदे झाले असून, आगामी काळात बॅंकांचे हप्ते फेडण्याचे मोठे आव्हान आहे.'' 
- शंकर लांघे, टॅक्‍सी चालक 

हॉटेल व्यवसाय 
- हॉटेल्स, रिसार्टस्‌ - 200 
- यंदाची रद्द केलेले बुकिंग - 2500 
- कर्मचारी - 8000-10000 
- रिक्षा, टॅक्‍सीचालक - 1500 

चिक्की व्यवसाय 
- प्रमुख चिक्की व्यावसायिक - 15 
- दुकानदार, विक्रेते - 600 
- किरकोळ विक्रेते - सुमारे 2000 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Corona crisis has led to lockdowns of tourist destinations and hill stations in Maharashtra