वटवाघळांमधील कोरोनाचा मानवाला धोका नाही

सुनील माळी
Thursday, 30 April 2020

भारतात १२८ प्रकारची वटवाघळे
वटवाघळांमधील कोरोनाच्या बातमीमुळे माणसाने वटवाघळांकडे आपली वक्रदृष्टी वळवली आणि निसर्गातील त्यांची संख्या कमी झाली तर ते मानवजातच संकटात सापडेल, असे या निबंधात स्पष्ट करण्यात आले आहे. जगात आढळणाऱ्या १४०१ जातींपैकी १२८ जातींची वटवाघळे भारतात सापडतात. वटवाघळे हजारो वर्षांपासून माणसांच्या सानिध्यात केवळ राहातच नाहीत, तर माणसाला उपयोगी पडत आहेत. परागीभवनाने फळांचे उत्पादन, झाडांच्या बिया दुसरीकडे नेऊन जंगलवाढ आणि उपद्रवी किटकांवर नियंत्रण या त्यांच्या बाबी माणसाला आवश्यक ठरतात. ही वाघळे डासांना खात असल्याने मलेरिया, डेंगी, चिकुनगुनिया यांसारख्या रोगांना अटकाव होतो.

वटवाघळे धोक्यात
मानवजातीवर वटवाघळे उपकार करीत असली तरी माणसाच्या कृतींमुळेच ती  संकटात सापडली आहेत. त्यांची थेट शिकार करणे, त्यांच्या राहण्याच्या जागा नष्ट करणे, प्रदूषण पसरवणे, त्यांच्या  अन्नपुरवठ्यात बाधा आणणे, कीटकनाशकांचा अतिरेकी वापर करणे यांमुळे माणसांकडून वटवाघळांवर संक्रात येत आहे. भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याने या जातींना संरक्षण देण्यात येऊनही त्यापैकी काही जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यात पूर्वापार चालत आलेल्या गैरसमजुतींमुळे या प्राण्यांंभोवती गूढ वलय पसरले आहे आणि या अंधश्रद्धाही त्यांच्या मुळावर उठत आहेत. त्यामुळेच वन्य जीवांचा खाण्यामध्ये समावेश न करणे, त्यांच्याविषयी आदरभाव बाळगत त्यांना योग्य अंतरावर ठेवणे आणि नैसर्गिक वनसंपदा जपणे याकडे माणसाने लक्ष दिले पाहिजे, असेही या शास्त्रज्ञांनी नमूद केले आहे.

पुणे - भारतीय वटवाघळांमध्ये सापडलेला कोरोना विषाणू आणि सध्या धुमाकूळ घालणारा विषाणू वेगवेगळे असल्याने त्यापासून माणसाला धोका नसल्याचे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चेलमला श्रीनिवासुलू आणि संजय मोल्यूर या संशोधकांनी जगभर झालेल्या संशोधनांचा संदर्भ देत याबाबत अभ्यास केला आणि त्या आधारे नुकताच एक निबंध प्रसिद्ध केला. पुण्याच्या मॉडर्न महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक डॉ. हेमंत घाटे यांनी या निबंधाची माहिती ‘सकाळ’ला दिली.

भारतीय वटवाघळांमध्ये कोरोना विषाणू सापडल्याने त्यांच्यापासून माणसाला कोरोनाची लागण  होईल का, अशी भीती व्यक्त होत असून वटवाघळांना नष्ट करा, असा संदेश दिला जात  आहे, मात्र माणसाच्या अस्तित्त्वासाठी उपयोगी असलेल्या य जातीला संपवणे हे माणसाच्याच पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे ठरणार आहे.

भारतीय उपखंडामधील वटवाघळांच्या फळे खाणाऱ्या  दोन जातींमध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले असून त्यातील एका जातीचे वास्तव्य दक्षिण भारत, तसेच हिमाचल प्रदेशात तर दुसऱ्या जातीचे श्रीलंकेत आहे. अशा जातींकडून माणसांमध्ये विषाणूची लागण व्हायची असेल तर त्या विषाणूच्या रचनेत बदल होण्याची आवश्यकता असते. 

कोरोनाचा संसर्ग केवळ माणसांकडूनच माणसांना होतो आणि वटवाघळांमध्ये सापडलेला कोरोना हा पूर्णपणे वेगळा आहे. हे दोन्ही विषाणू एकाच गुणसूत्रातील असले तरी त्यांच्यामधील जनुकीय साम्य ८० ते ९६ टक्के एवढे आहे. त्यामुळे वटवाघळातील कोरोना माणसांमध्ये येण्याची शक्यता नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्याचा कोरोना विषाणू माणसांमध्ये संक्रमित होण्याच्या साखळीत वटवाघळांचा संबंध असू शकेल, पण त्या साखळीत खवले मांजरासारख्या आणखी काही प्राण्यांचाही समावेश असण्याची शक्यता शास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत.

संशोधन काय सांगते...

  • डासांना नियंत्रित ठेवणे आणि त्यायोगे मलेरिया, डेंगीला आळा घालणे यांसाठी वाघळांची माणसाला मदत
  • वटवाघळांमधील कोरोना संपूर्णपणे वेगळा, त्याचा माणसाला संसर्ग नाही
  • वन्य प्राणी न खाणे, वनसंपदेची जपणूक आवश्यक

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The corona in tigers is not a threat to humans