'दूध हळद प्यायला लोकांना प्रोत्साहन द्या'; दूध संघाला करावं लागतंय आवाहन

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 April 2020

शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्यातील नागरिकांना हळद टाकून दूध पिण्यासाठी प्रोत्साहित करावे,अशी मागणी पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.

 

पुणे -लॉकडाऊनमुळे दुधाच्या विक्रीत निम्म्याने घट झाल्याने सध्या दूध अतिरिक्त होऊ लागले आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्यातील नागरिकांना हळद टाकून दूध पिण्यासाठी प्रोत्साहित करावे, अशी मागणी पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्यावतीने (कात्रज डेअरी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यामुळे दुधाची विक्री वाढेल. पर्यायाने दूध शिल्लक राहणार नाही आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाच्या विक्रीतून चांगला आर्थिक आधार मिळेल. शिवाय त्यांचे दुधामुळे होणारे नुकसान टळू शकेल, अशी अपेक्षाही कात्रज डेअरीचे कार्यकारी संचालक डॉ. विवेक क्षीरसागर यांनी व्यक्त केली आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

लॉकडाऊनमुळे दूध व्यावसाय अडचणीत आला आहे. दूध अत्यावश्यक सेवेत येत असूनही, त्याची विक्री करता येत नाही. दररोज फक्त  दोन तासात दूध विक्री करणे अशक्य आहे. शिवाय दूध भुकटी आणि बटरचेही भाव पडले आहेत. त्यामुळे अतिरिक्त दुधाची विल्हेवाट लावणे अवघड झाले असल्याचे अजित पवार यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

यानुसार राज्यातील प्रत्येक नागरिकाला सकाळी १५० मिली आणि संध्याकाळी १५० मिली दूध हळद टाकून पिण्याबाबत प्रोत्साहित करावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus drink milk with turmeric katraj dairy insist for awareness