पिंपरी-चिंचवडची महत्त्वाची बातमी; वाचा कोणत्या वाहनांना असेल शहरात सवलत 

टीम ई-सकाळ
मंगळवार, 24 मार्च 2020

इतर सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये सार्वजनिक वाहतुकीची सर्व वाहने, खासगी प्रवासी वाहतूक सेवा पुरविणाऱ्या सर्व वाहनांना मनाई आहे.

पिंपरी Coronavirus : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस बंदी घातली आहे. याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी मंगळवारी (24 मार्च) दिले आहेत. सध्या राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू आहे.  त्यानुसार पोलिस आयुक्तांनी जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा पुरविणारी व वस्तूंची वाहतूक करणारी वाहने वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांना  बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये सार्वजनिक वाहतुकीची सर्व वाहने, खासगी प्रवासी वाहतूक सेवा पुरविणाऱ्या सर्व वाहनांना मनाई आहे.  तर अत्यावश्यक सेवेसाठी वाहतूक व प्रवासी वाहतूक करणाऱ्यांना या आदेशात सवलत दिली आहे. मात्र, सवलत दिलेले अधिकारी, कर्मचारी व खासगी व्यक्ती यांनी त्यांचेसाठी दिलेले ओळखपत्र, नेमणुकी बाबतचे आदेश तसेच रुग्णांनी आवश्यक कागदपत्रे जवळ बाळगणे आवश्यक आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या वाहनांना असेल सूट

  • पोलिस, आरोग्य विभाग, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित 
  • तातडीची रुग्ण वाहतूक व रुग्णालयातील डॉक्टर व पॅरामेडिकल आरोग्यसेवा
  • तात्काळ वैद्यकीय उपचार आवश्यक असलेल्या रुग्णांना व प्रवाशांना
  • वीज, पाणीपुरवठा, अग्निशामक , बँक व एटीएम, टपाल, प्रसारमाध्यमे
  • अत्यावश्यक सेवा सुविधा पुरविणाऱ्या संस्था
  • परवाना प्राप्त टॅक्सी त्यामध्ये चालक व दोन प्रवासी तसेच परवानाप्राप्त रिक्षा त्यामध्ये चालक व एक प्रवासी (केवळ अत्यावश्यक सेवेसाठी)

कोरोनाशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई 
संचारबंदी लागू असतानाही शहरात विनाकारण  फिरणाऱ्यांवर पोलिसांनी  कारवाई केली. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. या वेळी आढळून आलेल्या वाहनचालकांना पोलिसांनी चोप दिला. त्यामुळं दुपारनंतर अकारण बाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी झाली. उद्या गुढीपाडवा असल्यामुळं अनेकांनी पाडव्याच्या निमित्तानं थोडीफार खरेदी करण्यासाठी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्यामुळं अनेकांनी किरकोळ खरेदीही करता आली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus pimpri chinchwad vehicles rules information marathi