Coronavirus : बारामतीवरही घोंगावू लागलंय कोरोनाचे संकट!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 March 2020

शहरातील एका रिक्षाचालकामध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर त्याची रवानगी नायडू रुग्णालयात करण्यात आली आहे.

बारामती : शहरातील एका रिक्षाचालकामध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर त्याची रवानगी नायडू रुग्णालयात करण्यात आली आहे. मात्र, तो कोरोनाबाधित आहे की नाही याचे रिपोर्ट अद्याप प्राप्त झाले नाहीत, अशी माहिती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरातील एका रिक्षाचालकाला कफ, सर्दी, खोकला असा त्रास होता, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्याला पुण्याच्या ससून व तेथून नायडू रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्याचे नमुने कोरोनाच्या तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. मात्र, त्याचा अहवाल अजून प्राप्त झाला नाही. त्यामुळे तो रुग्ण कोरोनाबाधित आहे, असे आता म्हणणे योग्य नाही, असे कांबळे म्हणाले. 

दरम्यान, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पोलिसांनी श्रीरामनगर, त्रिमूर्तीनगर व आसपासचा परिसर आज सील केला. या ठिकाणी राहणा-या सर्व कुटुंबियांची तपासणी बारामती नगरपालिका व आरोग्य विभागाच्या वतीने तातडीने सुरु करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी योगेश कडुसकर व डॉ. सदानंद काळे यांनी दिली. जोपर्यंत संबंधित रिक्षाचालकाचा नायडू रुग्णालयाकडून अहवाल प्राप्त होत नाही, तो पर्यंत संबंधित रुग्ण हा कोरोनाग्रस्त आहे असे म्हणता येणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, तरीही बारामती नगरपालिकेच्या वतीने या भागात तातडीने निर्जंतुकीकरणाची प्रक्रीया सुरु करण्यात आली असून, नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील, फौजदार पद्मराज गंपले व पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने या भागात स्पीकरवरुन घोषणा करीत नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले. 

लोकांनी काळजी घेणे गरजेचे असून, अत्याश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नका, असे आवाहन प्रशासन वारंवार करीत असूनही अनेक नागरिक रस्त्यांवर फिरताना दिसत असल्याचे चित्र बारामतीतही पाहायला मिळाले. 

खात्री झाल्याशिवाय मेसेज पुढे पाठवू नका

कोरोनासंदर्भात कोणीही मेसेज खात्री असल्याशिवाय पुढे फॉरवर्ड करु नयेत, अफवा पसरविणा-यांविरोधात कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. अधिकृत व्यक्ती याबाबत नागरिकांना माहिती देतील. मात्र माहिती न घेता मेसेज पुढे टाकणा-यांचा शोध घेऊन पोलिस कारवाई करणार असल्याचेही सांगितले गेले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Suspected Peoples Found in Baramati